७७. सामाजिक विकासाचें उत्कृष्ट ज्ञान असलेला तत्त्ववेत्ता कार्ल मार्क्ससारखा दुसरा क्वचितच झाला असेल.परन्तु त्याला देखील युरोपियनांची संकुचित वृत्ति भोंवली. सगळ्या जगांतील पीडितांच्या संघटनेनें पीडकांना दूर सारून एक अत्यन्त सुखावह सामाजिक संघटना तयार करतां येईल, असें त्यानें शास्त्रीय पद्धतीनें सिद्ध करून दाखविलें. परन्तु ह्या कार्यांत अहिंसेचा उपयोग करतां येईल, असें त्यास मुळींच वाटलें नाहीं. सर्व जगांतील पीडित लोकांनी एक होऊन पीडकांचा संहार केला पाहिजे, असें त्याचें म्हणणें होतें. आणि त्यास अनुसरूनच रशियन क्रान्ति घडून आली आहे.

७८. सगळे पीडित किंवा मजूर जर एकवटले, तर पीडकांना मारण्याची जरूरच रहाणार नाहीं. परंतु मार्क्स ज्या संस्कृतींत जन्माला तिची परंपराच अशी आहे कीं, कोणी तरी विरोधी असल्याशिवाय तिला चैनच पडत नाहीं. पाश्चात्य संस्कृतीचे आद्य प्रवर्तक ग्रीक. त्यांची सगळी संस्कृति आपल्या शहरापुरती होती. अर्थात् इतर शहरांतील लोकांशीं त्यांचा पूर्ण विरोध होता. आधुनिक युरोपांत त्या संस्कृतीचें पर्यवसान राष्ट्रीयत्वामध्यें झालें. आपल्या राष्ट्रासाठीं कोणतेंहि कुकृत्य करणें योग्य आहे, अशी युरोपियन राष्ट्रांतील लोकांची समजूत. ग्रीक लोकांना इतर शहरें जशीं विरोधी वाटत, तशीं ह्या राष्ट्रांना इतर राष्ट्रें विरोधी वाटतात; व अशा चढाओढीशिवाय संस्कृतीची उन्नति होणार नाहीं, असें त्यांतील पुढारी लोक प्रतिपादन करतात. याच्यावर कार्ल मार्क्सनें जो तोडगा काढला तो हा कीं, सर्व मजूर वर्गाला एकवटून त्याला भांडवलवाल्यांवर घालावें. म्हणजे हा जो राष्ट्रां-राष्ट्रांमध्यें विरोध आहे तो भांडवलवाले आणि मजूर यांच्यावर नेऊन टाकावा. एकदां भांडवलशाही नष्ट झाली कीं, मग हा विरोध आपोआपच लय पावणार. कांट्यानें कांटा काढण्यासारखी ही युक्ती आहे.

७९. परंतु ह्या युक्तींत एक भय आहे, तें हें कीं, कांट्यांनें कांटा काढीत असतांना पहिला कांटा निघण्यापूर्वी दुसरा कांटा मोडला आणि त्याचें टोंक आंत राहून गेलें, तर पहिल्यापेक्षां जास्ती दुःख व्हावयाचें. ही स्थिति आज इटलींत आणि जर्मनींत उत्पन्न झाली आहे. राष्ट्रीयतवाचा कांटा काढण्यासाठीं समाजवादाच्या कांट्यांनें प्रयत्न केला. पण पहिला कांटा न निघतां हा दुसरा कांटाहि त्यांतच जाऊन सामील झाला.

८०. सशस्त्र क्रान्ति करून भांडवलवाल्यांना मारा, असें म्हणण्यापेक्षां ‘भांडवलवाल्यांसाठीं शस्त्र ग्रहण करूं नका,’ हा तॉलस्तॉयचा उपदेश अधिक हितावह होता. रशियन क्रान्तीला यश येण्यास कांहीं अंशीं हाच उपदेश कारण झाला. झार लोकांना जबरदस्तीनें समरांगणांत पाठवूं शकला. पण जेव्हां लोक लढूं इच्छीनात, तेव्हां झारशाही आपोआपच कोलमडून पडली. महायुद्धारंभींच जर सर्व पाश्चात्य राष्ट्रांतील मजुरांनी अशा प्रकारें सत्याग्रह केला असता, तर तें युद्ध एका आठवड्यांतच आटपलें असतें; व भांडवलवाल्या सत्ताधिकार्‍यांचा वर्ग झारशाहीप्रमाणें आपोआपच ढांसळला असता. कार्ल मार्क्सच्या प्रज्ञेला महात्मा गांधींच्या अहिंसेची जोड मिळाली असती, तर पाश्चात्य राष्ट्रें महायुद्धाच्या घोर संकटांत सांपडलींच नसतीं.

८१. आमच्या इकडे पार्श्व आणि बुद्ध यांनी अहिंसेचा प्रवाह बहुजनहिताकडे वळविला. परंतु राजकीय क्षेत्रांत त्याचा प्रवेश न झाल्यामुळें  तो सांप्रदायिकतेच्या डबक्यांमध्यें कोंडला गेला, व त्याच्या सभोंवतीं पुराणांचें जंगल माजलें. त्या प्रवाहाला गति देऊन राजकीय क्षेत्राकडे वळविण्याचा महात्मा गांधींचा प्रयत्‍न खरोखरच अभिनंदनीय आहे. परंतु दिशाभूल झाल्यामुळें तो मध्येंच खोळंबला. हें एका अर्थीं बरें झालें. कारण तो तसाच पुढें जाता, तर राष्ट्रीयतेच्या गर्तेत पडून अपायकारक झाला असता. अहिंसेला समाजवाद्यांच्या प्रज्ञेची जोड मिळाली, तरच हा तिचा प्रवाह योग्य दिशेकडे वळेल, व मानवजातीच्या कल्याणाला कारणीभूत होईल.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
समाप्त
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel