७१. येनाक्षरसमाम्नायमधिगम्य महेश्वरात् |
कृत्स्नं व्याकरणं प्रोक्तं तस्मै पाणिनये नम: ||

हा पाणिनीय शिक्षेच्या आरंभी सांपडणारा श्लोक आहे. त्याच्यावरून असें दिसतें कीं, पाणिनि महेश्वराचा भक्त होता. ह्या दंतकथेला ह्युएन् त्संगच्या प्रवासवर्णनांतहि आधार सांपडतो. तो गांधार देशांत प्रवास करीत असतां शलातुर ह्या गांवीं आला. येथें पाणिनि जन्मला होता. व्याकरणाचे नियम शुद्ध करण्याचा त्यानें बेत केला, व तो ईश्वरदेवाला सांगितला. ईश्वरदेवानें पाणिनीला मदत करण्याचें वचन दिलें. महेश्वराकडून पाणिनि ऋषीनें शास्त्र समजावून घेतलें, आणि मोठ्या प्रयत्‍नानें व्याकरण रचलें. त्याची श्लोकसंख्या एक हजार; व दर श्लोकाचीं अक्षरें बत्तीस. १
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
( १ Buddhist Record, i. 114-115.)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
७२. आतां एवढेंच ठरवावयाचें कीं, ज्या महेश्वराचा किंवा महादेवाचा भक्त पाणिनि होता तो महादेव पाणिनीच्या वेळीं वर दिलेल्या शूलगवाचा स्वीकार करीत होता कीं काय ? आमच्या मतें पाणिनीच्या वेळीं महादेव महेश्वर झाला, आणि महेश्वर झाल्यापासून तो अहिंसक बनला. गांधार देशांतील राजांनी व्यवहारापुरतें बौद्धधर्माला उत्तेजन दिलें. परन्तु कुलपरंपरेनें आलेल्या महादेवाला सोडण्याला ते तयार नव्हते. त्यांच्यांतील एखाद्यानें अशोकाप्रमाणें बौद्ध धर्माचा पूर्णपणें अंगीकार केला असता, तर इतर देव खोटे ठरून अशोकानें म्हटल्याप्रमाणें एक बुद्ध तेवढाच खरा ठरला असता; आणि ताबडतोब बौद्ध श्रमणांनी ब्रह्मदेवाप्रमाणें महादेवाचेंहि परिवर्तन करून त्याला बुद्धाच्या शाखेंत आणलें असतें.

७३. शक राजांच्या राज्याचा जसजसा विस्तार होत गेला, तसतसें महादेवाचेंहि प्रस्थ माजत गेलें. दक्षिणेकडील शालिवाहन कुलांतील राजांचें आणि शकांचें युद्ध झाल्याचें शिलालेखांवरून दिसून येतें. तथापि शालिवाहन वंशांतील राजांनीहि महेश्वराचा अंगीकार केला. म्हणजे त्या काळीं राजेरजवाड्यांत महादेवाची पूजा करणें ही एक फ्याशनच बनली म्हणावयाची. महाराष्ट्रांत मुसलमानांची कारकीर्द नष्ट होऊन मराठ्यांचें राज्य स्थापन झालें तरीहि मराठे सरदारांच्या बायका मुसलमानांकडून घेतलेला पडदा पाळीत असत, व आजलाहि तो कित्येक सरदारांच्या घराण्यांत पाळला जातो. तद्वत् शकांचा प्रभाव कमी होत गेला, तरी महेश्वरदेवाचा प्रसार जिकडे तिकडे वाढत गेला.

७४. अशा वेळीं ब्राह्मणांची स्थिति फार विचित्र झाली. दक्षिणेंत कांही राजांनी मधून मधून एकादा यज्ञ केल्याचा उल्लेख सांपडतो. पण त्यामुळें ब्राह्मणांना सतत राजाश्रय मिळणें शक्य नव्हतें. गृह्यसंस्कारांत भाग घेऊन सामान्य जनतेकडून अल्पस्वल्प दक्षिणा मिळविण्याचा मार्ग त्यांना खुला होता. पण तेथेंहि बौद्ध धर्माची अडचण होतीच. कां. कीं, सामान्य जनतेवर त्या धर्माचेंच वजन जास्त होतें. तेव्हां ब्राह्मणांना सतत राजाश्रय मिळविण्याचा धोपट मार्ग एकच होता; तो हा कीं, महेश्वर देवाचे पुजारी व्हावें; आणि त्यांनी तो पतकरला. वराहमिहिरानें म्हटल्याप्रमाणें ब्राह्मण भस्मभूषित होऊन महेश्वराची पूजा करूं लागले. १
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१(बृहत्संहिता अ० ६०।१९.)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
७५. शक राजांनी दुसर्‍या एका कल्पनेला फार महत्त्व आणलें. यहुदी लोक आपल्या जेहोवा देवाला जसा जगाचा कर्ता समजत असत, तसा महादेवहि जगाचा कर्ता आहे, अशी शक राजांची समजूत असावी. ही कल्पना त्यांनी यहुदी लोकांकडून घेतली असणें शक्य आहे. कारण पश्चिमेकडे यहुदी लोकांशीं त्यांचा निकट संबंध होता. बायबलमधील जुन्या करारांतील जेहोवा म्हणजे महासंहारक देव; तो क्रुद्ध होऊन कार करील याचा नेम नाहीं. ख्रिस्तानें त्याला सौम्य स्वरूप दिलें. तरी पण नवीन करारामध्यें त्याची प्रार्थना आहे कीं, ‘हे देवा, तूं आम्हाला वाईट मार्गाला लावूं नकोस.’ २ म्हणजे जेहोवाचें लोकांना संकटांत पाडण्याचें सामर्थ्य ख्रिस्तानंतरहि कायम होतें म्हणावयाचें!
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
( २ ‘ And Iead us not into temptation’. Luke 1,4.)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel