१२. दुसरी एक गोष्ट पार्श्वमुनीनें केली ती ही कीं, अहिंसेची सांगड सत्य, अस्तेय व अपरिग्रह या तीन नियमांशी घालून दिली. म्हणजे पूर्वीं जीं अहिंसा केवळ रानांवनांत रहाणार्‍या ऋषिमुनींच्या आचरणांत होती, व व्यवहारांत जिला फारशी किंमत नव्हती, तीच अहिंसा ह्या तीन नियमांच्या सहवासानें सामाजिक बनली; तो व्यवहार्य झाली.

१३. तिसरी गोष्टी  म्हटली म्हणजे ही कीं, पार्श्व मुनींनें आपल्या ह्या नवधर्माच्या प्रसारासाठीं संघ बनवला. बौध्द वाङ्‌मयावरून असें दिसून येतें कीं, बुध्दाच्या वेळीं जे कांहीं संघ अस्तित्वांत होते, त्या सर्वांत जैन साधूंचा व साध्वींचा संघ मोठा होता.

१४. पार्श्वापूर्वीं ब्राह्मणांचे मोठमोठाले समुदाय होतेच. पण ते यज्ञयागाच्या प्रचारासाठीं. यज्ञयागांचा तिटकारा येऊन जे जंगलांत जाऊन तपस्या करीत असत त्यांचेहि संघ होते. तपस्येचें एक अंग ह्या दृष्टीनें ते अहिंसा पाळीत असत; परंतु सामान्य जनतेला अहिंसेचा उपदेश करीत नसत. ते क्वचितच लोकांत मिसळत असत.

१५. बुध्दकालापूर्वीं अस्तित्वांत असलेल्या चार प्रकारच्या श्रमणब्राह्मणांचे सोदाहरण वर्णन निवापसुत्तांत सांपडतें. त्याचा थोडक्यांत सारांश असा – “बुध्द भगवान् श्रावस्तीमध्यें अनाथ पिंडिकाच्या आश्रमांत रहात असतां भिक्षूंना उद्देशून म्हणाला, ‘भिक्षुहो, कुरण लावणारा मनुष्य मृगांच्या कल्याणासाठीं कुरण लावीत नाहीं. त्याचा हेतु असा असतो कीं, या कुरणांतील गवत खाऊन मृगांनी प्रमत्त व्हावें व आपल्या ताब्यांत यावें.’

१६. “अशा एका कुरणामध्यें एका कळपांतील मृग येऊन यथास्थित गवत खाऊन प्रमत्त झाले, व त्यामुळें कुरणाच्या मालकाच्या पाशांत सांपडले. तें पाहून दुसर्‍या कळपांतील मृगांनी असा विचार केला कीं, या कुरणांत शिरणें सर्वथैव अनिष्ट आहे. त्यांनी तें कुरण सोडून दिलें, व ते ओसाड अरण्यांत शिरले. परंतु उन्हाळ्याचे दिवस आल्यावर तेथें चारापाणी मिळेनासें झाल्यामुळें त्यांच्या शरीरांत बळ राहिलें नाहीं. उदरपीडेनें त्रस्त होऊन ते त्या कुरणांत शिरले, व प्रमत्त होऊन कुरणाच्या मालकाच्या पाशांत सांपडले. तिसर्‍या  कळपांतील मृगांनी हे दोन्ही मार्ग सोडनू देऊन कुरणाच्या जवळच जंगलाचा आश्रय केला, व ते मोठया सावधगिरीनें कुरणांतील गवत खाऊं लागले. बराच काळपर्यंत ते त्या कुरणाच्या मालकाच्या ताब्यांत गेले नाहींत. पण त्याला जेव्हां त्यांचें आश्रय स्थान समजलें, तेव्हां त्यानें त्याभोंवतीं जाळीं पसरून त्या मृगांना आपल्या हस्तगत केलें. हें पाहून चौथ्या कळपांतील मृगांनी कुरणापासून दूर अंतरावर गहन अरण्यांत वस्ती केली, व ते मोठया सावधगिरीनें कुरणांतील गवत खाऊं लागले. कुरणाच्या मालकाला त्यांच्या आश्रयस्थानाचा पत्ता लागला नाहीं.

१७. “हें रूपक आहे. कुरण म्हणजे उपभोग्य वस्तु. कुरणाचा मालक मार. पहिल्या कळपांतील मृग म्हणजे उपभोग्य वस्तूंचा यथास्थि उपभोग घेणारे श्रमण-ब्राह्मण. उपभोग्य वस्तूंचें भय वाटून त्यांपासून विरत होऊन ज्यांनी अरण्यवास पतकरला ते श्रमण-ब्राह्मण दुसर्‍या कळपांतीळ मृगांसारखे होत. ते कांही काळपर्यंत गवत, गोमय, फलमूलादिक भक्षण करून अरण्यांत राहिले. पण त्यांचीं शरीरें दुर्बळ झालीं; विचार करण्याचें सामर्थ्य राहिलें नाही; व ते त्याच कुरणांत शिरले. तिसर्‍या वर्गांतील श्रमण-ब्राह्मणांनी अशा रीतीनें जंगलाचा आश्रय केला नाहीं. ते उपभोग्य पदार्थांचा अत्यन्त सावधगिरीनें उपभोग घेउं लागले. पण ते अशा वादांत पडले कीं, हें जग शाश्वत आहे, हें जग शाश्वत नाहीं; या जगाचा अंत होणार, या जगाचा अंत होणार नाहीं; जीव आणि शरीर एक आहे, जीव आणि शरीर भिन्न आहे; तथागत मरणानंतर रहातो, तथागत मरणानंतर रहात नाहीं, इत्यादि. अशा वादांनी हे श्रमण-ब्राह्मणहि तिसर्‍या कळपांतील मृगांप्रमाणें मारपाशांत सांपडले. चौथ्या वर्गांतील श्रमण-ब्राह्मणांनी या सर्व गोष्टी वर्ज्य केल्यामुळें चौथ्या कळपांतील मृगांप्रमाणे ते मारपाशांत सांपडले नाहींत.”
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel