६५. अथर्व वेदानंतर शतपथ ब्राह्मणाच्या वेळीं सरहद्दीवरील या सगळ्या देवांना अग्नीचें स्वरूप देण्याचा प्रयत्‍न दिसतो. “प्रजापतीला उषोदेवीपासून एक कुमार झाला, व तो रडायला लागला. प्रजापति म्हणाला, ‘कां रडतोस?’ ‘मला नांव नाहीं म्हणून; मला नांव ठेवा.’ तेव्हां तो रडतो म्हणून त्याला रुद्र हें नांव ठेवण्यांत आलें. पुन्हा त्यानें आणखी एक नांव देण्यास सांगितलें. तेव्हां त्याला सर्व (शव) असें नांव देण्यांत आलें. सर्व म्हणजे पाणी. कां कीं, त्याच्यापासून सर्व उत्पन्न होतें. त्यानंतर त्याला पशुपति हें नांव देण्यांत आलें. पशुपति म्हणजे वनस्पति. त्या मिळाल्या म्हणजे पशु जगतात. त्यानंतर त्याला उग्र हें नांव देण्यांत आलें. उग्र म्हणजे वायु. तो जेव्हां जोरानें वाहतो तेव्हां उग्र वाहतो असें म्हणतात. त्यानंतर त्याला अशनि हें नावं देण्यांत आलें. अशनि म्हणजे पाऊस. त्यापासून सर्व होतें (भवति). नंतर त्याला महान्देव असें नांव देण्यांत आलें. महान्देव म्हणजे चंद्र. नंतर ईशान हें नांव देण्यांत आलें. ईशान म्हणजे सूर्य... हीं आठहि अग्नीचीं रूपें आहेत; आणि नववा कुमार.” (शत.ब्रा. ६|१|३) कुमार, भव, शर्व इत्यादि ज्या देवता सरहद्दीवरील प्रांतांत पुजल्या जात असतात त्यांना यज्ञांमध्यें दाखल करून यज्ञांचे प्रस्थ वाढविण्याचा हा प्रयत्‍न आहे.

६६. त्यानंतर आश्वलायन-गृह्यसूत्रांत या देवतांना रुद्ररूपी समजून त्यांच्या नांवांनी शूलगव नांवाचा यज्ञ कसा करावा याचें वर्णन सांपडतें. “शूलगव शरत्कालांत किंवा वसंतकालांत करावा. तो आर्द्रा नक्षत्रांत करावा. आपल्या गोठ्यांतील सगळ्यांत उत्तम बैल निवडून घ्यावा. तो पृषद्वर्ण असावा. चित्रवर्ण असेंहि कोणी म्हणतात. उंच वशिंड असलेला काळा असला तर उत्तमच. त्याला तांदळांच्या किंवा यवांच्या पाण्यानें अभिषेक करावा. तो अशा तर्‍हेनें की, ‘रुद्राय महादेवाय जुष्टो वर्धस्व’ नंतर त्याला मारून आहुति द्याव्या त्या अशा – ‘हराय कृपाय शर्वाय शिवाय भवाय महादेवायोग्राय पशुपतये रुद्राय शंकरायेशानायाSशनये स्वाहा|’ त्याचें शेंपूट, चामडें, डोकें व पाय अग्नींत टाकावे. पण शांबव्य आचार्य म्हणतो कीं, चामड्याचा उपभोग घ्यावा.” (अ ४, खंड १०).

६७. याच्यावरून असें दिसतें कीं, गृह्यसूत्रांच्या वेळी महादेव हिंसक होता, व शर्वादिक देवतांचा समावेश त्याच्यांतच झाला होता. हा महादेव अहिंसक कसा बनला हें सांगणें कठीण आहे. येथें अनुमानाशिवाय दुसरा मार्ग नाहीं. कां कीं, त्या काळचा इतिहास अद्यापि उपलब्ध झाला नाहीं.

६८. बुद्धाच्या हयातींत त्याची कीर्ति सरहद्दीपर्यंत पसरल्याचा दाखला पालि ग्रंथांत सांपडतो. महाकप्पिन सरहद्दीवरील राजकुलांत जन्मला व पित्याच्या मरणानंतर राजा झाला. श्रावस्तीहून आलेल्या व्यापार्‍यांकडून भगवंताची कीर्ति ऐकून भिक्षु होण्यास तो उत्सुक झाला, व आपल्या उद्यानांतून आपल्या अमात्यांसह परस्पर श्रावस्तीला जाण्याला निघाला. त्याची पट्टराणी अनोजादेवी हें वर्तमान ऐकून त्याच्या मागोमाग आपल्या परिवारासह श्रावस्तीला जाण्यास निघाली. भगवंताची व त्या सर्वांची गांठ चंद्रभागा नदीच्या कांठीं पडली. कप्पिनाला आणि त्याच्या अमात्यांना भगवंतानें भिक्षु केलें, व उप्पलवण्णा भिक्षुणीकडून अनोजादेवीला व तिच्या स्त्रीपरिवाराला भिक्षुणी करविलें.

६९. ही दंतकथा मनोरथपूरणी व सारत्थपकासिनी ह्या दोन अट्टकथांत सांपडते. संयुक्त निकायाच्या मूळ सुत्तांत कप्पिनासंबंधाने मजकूर आहे तो असा. “भगवान् श्रावस्ती येथे रहात होता. त्यानें आयुष्मान् महाकप्पिनाला येतांना दुरून पाहिलें; आणि तो भिक्षूंना म्हणाला, ‘भिक्षुहो, ह्या इकडे येणार्‍या गोर्‍या, सडपातळ, उंच नाकाच्या भिक्षूला तुम्ही पहात अहां काय ? याला सर्व प्रकारची समाधि प्राप्त झाली आहे; आणि ज्यासाठीं कुलपुत्र गृहत्याग करतात, त्या निर्वाणाचा ह्यानें साक्षात्कार करून घेतला आहे.” १
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
( १ निदानवग्ग, भिक्खुसंयुत्त, सुत्त ११.)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
७०. महाकप्पिन राजकुलांत जन्मला होता कीं नाहीं, हें जरी सांगतां आलें नाहीं, तरी ह्या सुत्तांतील वर्णनावरून तो काबूल किंवा कंदहार ह्या प्रांतांतील रहाणारा असावा असें दिसतें. येथें आम्हाला एवढेंच दाखवावयाचें आहे कीं, बुद्ध भगवंताच्या हयातींतच त्या प्रांतांतील लोकांवर त्याच्या धर्माचा प्रभाव पडूं लागला होता. कुरु देशांत ब्राह्मणांचे प्रस्थ फार होतें, तरी सरहद्दीवरील प्रांतांत बुद्धाचा अहिंसावादी धर्म लोकांना प्रिय होत चालला होता. त्याचा परिणाम असा झाली कीं, ज्या पशुपति महादेवाला मोठ्या बैलाचा बलि देऊन आळवावें लागत असे, तोच महादेव गाईबैलांचा संरक्षक बनला; बैल त्याचें वहान झालें, व त्याच्या मंदिरासमोर नंदीची स्थापना होऊं लागली. वेमा कदफिसेस (Wema Kadphises)  याच्या नाण्यांवर महेश्वराची मूर्ति व नंदीबैल सांपडतात. याचा काळ अद्यापि निश्चित झाला नाहीं; तरी तो इ.स. पहिल्या शतकाच्या आरंभीं धरण्यास हरकत नाहीं. त्या पूर्वीं दोन तीन शतकें तरी महादेवाचें परिवर्तन गोरक्षक महेश्वरदेवांत झालें असावें.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to हिन्दी संस्कृति आणि अहिंसा


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
झोंबडी पूल
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
सापळा
गांवाकडच्या गोष्टी
मराठेशाही का बुडाली ?
श्यामची आई
खुनाची वेळ
कथा: निर्णय
लोकभ्रमाच्या दंतकथा
गावांतल्या गजाली
मृत्यूच्या घट्ट मिठीत
पैलतीराच्या गोष्टी