रशियन क्रान्तीचा प्रभाव

६५. बोल्शेव्हिकांच्या विजयाचा परिणाम हिंदुस्थानावरच काय तर सर्व जगावर घडून आलेला आहे. त्यांच्याविषयीं मजूर वर्गाचीं मनें कलुषित करण्याचा आटोकाट प्रयत्‍न भांडवलवाल्यांनी आपल्या ताब्यांतील वर्तमानपत्रांच्या द्वारें एकसारखा चालविला आहे. तेवढ्यानें क्रान्ति थांबणार नाहीं, याच भीतीनें कीं काय भांडवलवाल्यांनी इटलींत मुसोलिनी व जर्मनींत हिटलर यांना पुढें आणलें. चिनांत चांग केशेक सारख्या भाडोत्री सेनापतींना पुढें करून तद्वारा बोल्शेव्हिक क्रान्ति थोपवून धरण्याचा युरोपियन आणि अमेरिकन भांडवलवाल्यांचा प्रयत्‍न चालूच आहे. हिंदुस्थानांत बोल्शेव्हिझमचें नांव क्वचितच ऐकूं येतें. तरी पण केवळ त्याच्या छायेला भिऊन सर सॅम्युअल होरसारख्या कँझरव्हेटिवांनी तयार केलेल्या नवीन घटनेंत राजेरजवाडे, जमीनदार वगैरे लोकांना गोवून तद्वारा बोल्शेव्हिझमच्या विरुद्ध बळकट कोट उभारण्याचें काम चालू आहे. परंतु त्याचा उपयोग विचारकान्तीविरुद्ध होईल कीं नाहीं याची खुद्द विचारी इंग्रजांनाहि शंका वाटते.

६६. हिंदुस्थानांतील हिंदु मध्यमवर्ग स्वतंत्रतेला हपापलेला आहे. अहिंसेच्या द्वारें असो किंवा हिंसेच्या द्वारें असो, स्वतंत्रता मिळत असली, तर ती त्याला हवी आहे. रोगानें पीडलेला मनुष्य औषधांत पवित्र वनस्पति आहेत कीं अपवित्र मांसादिकांचे अर्क आहेत, याचा विचार थोडाच करीत असतो. त्याला पाहिजे असतें आरोग्य; आणि तें जितक्या लवकर मिळवितां येणें शक्य असेल तितकें चांगलें. आर्यसमाजाचें, लोकमान्यांच्या गणपतिउत्सवाचें आणि महात्मा गांधींच्या अहिंसात्मक विधायक कार्यक्रमाचें औषध घेऊन पाहिलें; पण गुण येत नाहीं. मग उत्कंठित झालेल्या तरुणांचीं मनें बोल्शेव्हिकी औषधाकडे वळावींत हें अगदीं साहजिक आहे. सगळ्या जगाविरुद्ध लढून आपल्या सरदारांचा आणि जमीनदारांचा नि:पात करून बोल्शेव्हिकांना रशियन साम्राज्यांतील सर्व मजूरवर्गाला स्वतंत्र करतां आलें, तर त्याच मार्गानें आम्हाला ह्या गांजलेल्या हिंद देशाला स्वतंत्र कां करतां येऊं नये?

६७. शेवटल्या सत्याग्रहांत जवळ जवळ एक लाख लोक तुंरुगांत गेले. अर्थांतच हे सर्व मध्यमवर्गांतील तरुण होते. तेथें काम जरी करावें लागत असे, तरी ह्या तरुण मंडळीला वाचन आणि विचार करण्याला पुष्कळच सवड सांपडली; व ज्या ग्रंथांमुळें बोल्शेव्हिझमचा उगम झाला, ते कार्ल मार्क्स, फ्रेडरिक एंगल्स इत्यादिकांचे ग्रंथ वाचण्यास त्यांच्यापैकीं पुष्कळ जणांनी सुरुवात केली. त्याचा परिणाम असा झाली कीं, गेल्या (१९३४) सालच्या मे महिन्यांत पाटना येथें अशा लोकांची एक सभा भरून त्यांनी एक नवीन ‘काँग्रेस समाजवादी पक्ष’ स्थापन केला, व तेव्हांपासून ह्या पक्षाची एकसारखी प्रगति होत चालली आहे. हिंदुस्थानांत कम्युनिस्ट पक्ष बेकायदेशीर ठरवला गेला आहे. त्यामुळें त्या पक्षाला उघड रीतीनें आपल्या मतांचा प्रसार करतां येत नाहीं. गुप्तपणें हे लोक काय करीत असतील, तें गुप्त पोलिसांना तेवढें माहीत. तेव्हां आम्हाला जी काय माहिती आहे ती ह्या नवीन सोशॅलिस्ट पक्षाची. याचा संबंध जरी मास्कोशी नाहीं, तरी रशियन क्रांतीचा परिणाम त्याच्यावर फारच झाला आहे. किंबहुना रशियन क्रान्ति झाली नसती, तर ह्या पक्षांतील बहुतेक पुढार्‍यांनी मार्क्सकडे ढुंकूनहि पाहिलें नसतें.

६८. पाश्चात्यांच्या संस्कृतीचा उदय, तिचा हिंदुस्थानांत प्रवेश आणि हिंदु समाजावर परिणाम कसा झाला, याचें त्रोटक विवेचन येथवर करण्यांत आलें आहे. त्याच्यावरून असें दिसून येईल कीं, पाश्चात्यांच्या सहवासानें उत्पन्न झालेल्या देशाभिमानामुळें पौराणिक संस्कृति लोपत चालली आहे. कोणत्याहि देशकार्यासाठीं संप्रदायाची किंवा कोणत्याहि देवतेच्या उत्सवाची आवश्यकता नाहीं, हा विचार सर्वसामान्य होत आहे. पण ह्या देशाभिमानाला सगळ्यांत मोठा शत्रु म्हटला म्हणजे मुसलमानी अभिमान आहे. दुसरें एक याला भय आहे तें हें कीं, यदाकदाचित् हिंदुस्थान स्वतंत्र झाला, तर बंगाली हिंदूंचा, महाराष्ट्रीय हिंदूंचा, गुजराथी हिंदूंचा आणि रजपूत हिंदूंचा अभिमान, असे अनेक अभिमान उभे राहून ते एकमेकांशीं टक्कर देऊं लागतील; व पुन्हा इंग्रजी किंवा अशाच दुसर्‍या बलाढ्य राष्ट्राला शरण जाऊन हिंदुस्थानांत शांतता स्थापन करावी लागेल. बंगाली आणि बिहारी, मराठी आणि गुजराथी, आंध्र आणि तामीळ इत्यादि लोकांतील सध्या चालू असलेली चुरस पाहिली असतां हें भय अकारण आहे, असें म्हणतां येत नाहीं.

६९. यावर समाजवाद्यांचें म्हणणें कीं, ‘ह्या राष्ट्रीयत्वाचा कांटा काढण्यासाठींच आमचा प्रयत्‍न आहे. आम्हाला बंगाली काय कीं बिहारी काय, किंवा महाराष्ट्रीय काय कीं गुजराथी काय, श्रमजीवी मजूर वर्ग येथून तेथून सारखाच. आम्ही या मजूर वर्गाच्याच बळावर स्वतंत्रतेची इमारत उभारूं पहात आहोंत. रशियन साम्राज्यांत अनेक देश व अनेक भाषा आहेत. त्या सर्वांचें संघटन जर समाजवादाच्या तत्त्वावर करतां आलें, तर तसें तें हिंदुस्थानांत कां करतां येऊं नये?’ समाजवाद्यांची ही विचारसरणी योग्य वाटते. परंतु जातिभेदांनी व वर्गभेदांनी ग्रासलेल्या या देशांत तिचा प्रसार कितपत होईल, अशी विचारी लोकांस शंका येत आहे.

७०. देशाभिमानाचा आणि समाजवादाचा एक सुपरिणाम आम्हास दिसतो तो हा कीं, त्यांच्यायोगें पौराणिक संस्कृतीच्या तमोयुगांतून आम्ही बाहेर पडत आहोंत; सरळ विचार करण्याची आम्हाला सवय लागत चालली आहे; सांप्रदायिक आडरानांत शिरण्याची आवश्यकता वाटत नाहीं. एवढ्यापुरते तरी पाश्चात्यांचे आम्ही आभार मानले पाहिजेत.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
समाप्त
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel