२०३. तेथें सर्व मांडलिक राजांनी त्या पाखंड्याला एकदम ठार मारावें अशी सल्ला दिली. पण शीलादित्यानें त्याला ठार न मारतां आपल्यावर हल्ला करण्याचें कारण काय तें विचारलें. त्याच्या जबानीवरून दिसून आलें कीं, त्या कटांत पुष्कळ पाखंडी सामील होते, व तो मनुष्य केवळ त्यांच्या हातांतलें बाहुलें होतें. त्यानंतर राजानें त्या सर्व पाखंड्यांना आणि त्यांच्या भक्तांना आणून चौकशी केली. तिजवरून असें दिसून आलें कीं, या कटांत पांचशें विद्वान् ब्राह्मण सामील होते. राजा बौद्ध श्रमणांना इतका मान देतो, हें त्यांना आवडलें नाहीं. बाणाला जळके काकडे लावून त्यांनी ते मनोर्‍यावर फेकले, व मनोर्‍याला आग लागली. ह्या गडबडींत लोक धांवपळ करतील, व ती संधि साधून शीलादित्याचा खून करावा, असा त्यांचा बेत होता. पण मनोर्‍याची आग विझल्यामुळें गडबड झाली नाहीं. मग त्यांनी ह्या पाखंड्याला राजाचा खून करण्यास पुढें केलें. या रीतीनें हा कट उघडकीला आल्यावर मांडलिक राजांनी मागणी केली कीं, सर्व पाखंड्यांचा एकदम उच्छेद करावा. श्रीहर्षाला ही मागणी पसंत पडली नाहीं. कटाच्या पुढार्‍यांना त्यानें दंड केला व इतरांना हद्दपार केलें. त्यांत पांचशें ब्राह्मण होते. १
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१ Buddhist Rocords, i., pp. 218-221.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
२०४. शशांक राजा कट करून राज्यवर्धनाचा खून करवतो, व बुद्ध गयेचे विहार मोडून भिक्षूंचा छळ करतो. श्रीहर्ष त्याच्यावर हल्ला करून त्याची शक्ति संपुष्टांत आणतो. पण त्यामुळें दुसरा कट उपस्थित होऊन श्रीहर्षाचा खून करण्याचा प्रयत्‍न केला जातो; आणि त्या खुनाच्या मागें कोण, तर पुष्कळसे पाखंडी व ब्राह्मण. ह्या घडामोडींवरून शशांकाच्या राजकारणांमागें ब्राह्मणांचें आणि पाशुपतांचें कारस्थान होतें, असें समजणें गैरवाजवी होणार नाहीं. शशांकापूर्वींचे गुप्त राजे सर्वांना समानतेनें वागवणारे होते. त्यामुळें त्यांच्या कारकीर्दींत बौद्धांचा छळ झाला नाहीं. त्यांचें साम्राज्य मोडकळीला आल्याबरोबर पाशुपतांनी व श्रमणद्वेष्टया ब्राह्मणांनी हीं कारस्थानें चालविलीं.

२०५. हा संकटकाळ बौद्ध श्रमणांना मननीय व्हावयास पाहिजे होता. सामान्य जनतेंत मिळून मिसळून वागून रंजल्या गांजल्या लोकांना हितोपदेश करण्याचा बुद्धानें घालून दिलेला कित्ता पुन्हा गिरवण्याची ही संधि होती. पण बौद्ध श्रमणांना त्या कित्यांतील अक्षरओळख देखील राहिली नव्हती. विहारांत बसून वरिष्ठ वर्गाला चकवणारे न्यायादिक उत्तमोत्तम ग्रन्थ निर्माण करणें, हा त्यांचा धंदा होता. त्यामुळें वरिष्ठ वर्गाकडून त्यांना इनामें मिळत असत, व त्यांच्या संघारामांचा योगक्षेम सुखरूपपणें चाले; मग सामान्य जनतेसाठीं खटपट करण्याचें कारण काय उरलें?

२०६. विनय पिटकांतील चुल्लवग्गांत दोघां ब्राह्मण बंधूंची गोष्ट आहे ती अशी – “यमेळु व तेकुल” १  ह्या नांवाचे ब्राह्मण जातीचे विद्वान् भाऊ भिक्षु झाले होते. ते एकदां भगवंताला वंदन करून म्हणाले, ‘सध्या निरनिराळे भिक्षु आपापल्या भाषेंतून बुद्धोपदेश लोकांना सांगतात. तेव्हां आम्हाला तो वैदिक भाषेंत तयार करण्यास परवानगी द्या.’ त्याबद्दल भगवन्तानें त्यांना दोष दिला; व तो भिक्षूंना म्हणाला, ‘बुद्धोपदेशाचें वैदिक भाषेंत भाषान्तर करूं नये; पण आपापल्या भाषेंतून बुद्धोपदेश शिकण्यास मी परवानगी देतों.” ही कथा बुद्धाच्या वेळची असणें शक्य नाहीं. ती बुद्धाच्या परिनिर्वाणानन्तर तीन चार शतकांनी, किंबहुना महायान पंथाच्या प्रसाराच्या आरंभीं रचून चुल्लवग्गांत घालण्यांत आली असवी. तरी पण त्या काळच्या भिक्षूंना आपल्या कर्तव्याची थोडी बहुत तरी जाणीव राहिली होती असें म्हणावें लागतें. बुद्धाचा उपदेश वैदिक भाषेंत न घालतां चालू भाषेंत असावा, हें या गोष्टीचें सार आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१ ‘यमेळु-तेकुला’ हा ओल्डेनबर्गचा (H. Oldenberg’s ) पाठ; परन्तु सयामसंस्करणांत ‘मेठ्ठ-कोकुट्ठा’ असा घेतला आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel