आर्यसमाजाचा उगम

३२. ब्राह्मसमाजाच्या प्रसाराला आळा बसण्याचें मुख्य कारण म्हटलें म्हणजे इंग्रजी भाषेच्या द्वारें इंग्लिश इतिहासाचा अभ्यास हें होय. येथील इंग्रजी मुत्सद्दयांत भवति न भवति होऊन शेवटीं मेकॉले साहेबाच्या आग्रहास्तव इंग्रजी शिक्षण सर्वत्र सुरू करावें असा त्या काळच्या अधिकार्‍यांनी ठराव केला. त्याचा परिणाम हिंदुस्थानांतील वरिष्ठ वर्गावर असा झाली कीं, जो तो नोकरीच्या आशेनें इंग्रजी शिकूं लागला. ख्रिस्ती झाल्याशिवाय नोकरी द्यावयाची नाहीं, असा इंग्रजी राज्यांत निर्बंध नव्हता. किंबहुना वरिष्ठ जातींत इंग्रजी शिक्षणानें भांबावून गेलेले लोक इंग्रजी राज्याचा पाया सुदृढ करण्याला फार उपयोगी होते. पोर्तुगीजांनी लोकांना बाटवून ख्रिस्ती केल्याचा परिणाम कसा झाला, हें इंग्रजांना चांगलें अवगत होतें. तो धडा ते कधींहि विसरले नाहींत. ख्रिस्ती करून मग नोकर्‍या दिल्या असत्या, तर त्या नोकरांचा त्यांना मुळींच उपयोग झाला नसता. हिंदु समाजाच्या आंत काय चाललें आहे, हें ह्या बाटवलेल्या ख्रिस्ती लोकांकडून त्यांना समजून घेतां आलें नसतें. कां कीं, ह्या बाट्या लोकांना हिंदु समाजानें फार दूर ठेवलें असतें. त्यांच्यापेक्षां हिंदूंतील सुशिक्षित वर्ग किती तरी चांगला!  केवळ नोकरीसाठी कां असेना, कोठें काय चाललें आहे हें जाऊन साहेबाला सांगणें जणूं काय त्याचें कर्तव्यच होतें!

३३. हिंदुसमाज जसा ख्रिस्ती लोकांना वागवी, तसाच ब्राह्मोंनाहि वागवूं लागला. कारण ब्राह्मो होण्यापासून कशाचाहि फायदा नव्हता. या नव्या परमेश्वराचें नवें मन्दिर काढून त्यांत ब्राह्मण पुजार्‍यांची सोय झाली असती, तर महादेव, काली इत्यादि देवतांप्रमाणें त्याचीहि पूजा झाली असती. तसा कांहीं प्रकार नसल्यामुळें ब्राह्मणांना हा नवा देव सर्वथैव त्याज्य वाटला. नोकर्‍या जशा ब्राह्मोंना मिळत तशा जुन्या चालींच्या हिंदूंनाहि मिळत. तेव्हां त्यांच्यासाठींहि या नवीन देवाचा कांहीं विशेष उपयोग नव्हता. जे लोक त्या काळीं विलायतेला जाऊन येत, व ज्यांना उघडपणें ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याचें धैर्य नव्हतें, त्यांना मात्र हा ब्राह्म धर्म उपयोगी पडला. ते विलायतेहून परत आल्यावर बहिष्कृत होत, व ब्राह्म धर्माचा आश्रय धरीत. परंतु असे लोक फारच थोडे असावयाचे. तेव्हां ब्राह्म धर्माचा विशेष प्रसार होण्याला सबळ कारणें नव्हतीं हें उघड आहे.

३४. नोकरीसाठीं हिंदु लोकांना इंग्रजी विद्या शिकावी लागली. त्यावरून त्यांना असें दिसून आलें कीं, इंग्रजांचा उत्कर्ष बायबलवर अवलंबून नसून स्वदेशाभिमानावर अवलंबून आहे. इंग्रज आपल्या देशासाठीं वाटेल ती झीज सोशील. पण हिंदूंचें तसें नाहीं. फार झालें तर आपल्या धर्मासाठीं म्हणजे आपल्या जातीच्या रक्षणासाठीं हिंदु लोक स्वार्थत्याग करतील. पण देशाची कल्पना त्यांना मुळींच नाहीं. जर हिंदु लोकांत देशाभिमान जागृत केला, तर आम्हालाहि इंग्रजांप्रमाणेंच राज्य करतां येणें शक्य आहे, ही समजूत सुशिक्षित वर्गांत बळावत चालली. देशाची एकी घडवून आणण्याला एक धर्म व एक भाषा यांचीहि आवश्यकता वाटूं लागली. तेव्हां अशा परिस्थितींतून आर्यसमाज निघाला. एक देव पाहिजे आहे ना? त्याची स्थापना वेदांतूनच कां करूं नये? जातिभेद नको? त्यालाहि आधार वेदांत सांपडेलच. जें काय एक राष्ट्र बनवण्याला तुम्हाला पाहिजे आहे, तेवढेंच नव्हे तर तारायंत्र, वीज, वाफ, या सर्वांची व्युत्पत्ति वेदांतून काढतां येणें शक्य आहे. जें बायबलांत नाहीं तें सर्व वेदांत आहे. आणि वेद आमचा आहे. बायबलचा इतिहास तो काय, अवघा सहा हजार वर्षांचा! पण आमच्या वेदाला आजला १९७२९४९०११ इतकीं वर्षें झालीं!  त्याच्यावर जर तुम्हाला देशाभिमानाची इमारत उभारतां आली नाहीं, तर तुमच्यासारखे निरुपयोगी प्राणी कोण?
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to हिन्दी संस्कृति आणि अहिंसा


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
झोंबडी पूल
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
सापळा
गांवाकडच्या गोष्टी
मराठेशाही का बुडाली ?
श्यामची आई
खुनाची वेळ
कथा: निर्णय
लोकभ्रमाच्या दंतकथा
गावांतल्या गजाली
मृत्यूच्या घट्ट मिठीत
पैलतीराच्या गोष्टी