बुद्धाच्या व पार्श्वाच्या उपदेशाची तुलना

६८. वर जे श्रमणांचे सहा पंथ सांगितले त्यांच्या तत्त्वज्ञानापासूनच हा बुद्धाचा मध्यम मार्ग निघाला आहे. वैदिक ब्राह्मण यज्ञयागांमुळेंच मोक्ष मिळतो असें प्रतिपादन करीत. यज्ञ करून मांसाहार करणें व सोमरस पान करणें हाच त्यांचा प्रधान मार्ग होता. त्या मार्गाला कंटाळून जे परिव्राजक रानांवनांतून रहात असत ते देह दंडनांतच सर्वस्व आहे असें समजत. अशा परिव्राजकांतूनच वरील मोठमोठाले सहा पंथ निघाले असले, तरी उच्छेदवादी अजित केसकंबली तपश्चर्येला मुळींच मानीत नसे. यज्ञांत पशुहिंसा करणें हें अत्यंत अडाणीपणाचें असलें, तरी शरीर पुष्ट करण्यासाठीं मद्यमांसादिकांचें सेवन करण्यास हरकत नाहीं असें त्याचें म्हणणें असावें. बुद्ध भगवंतानें वैदिक ब्राह्मणांचा आणि केसकंबलीसारख्या देहात्मवादी तत्त्वज्ञांचा पहिल्या अंतांत समावेश केला आहे. यज्ञयागादिकांनी असो, अथवा यज्ञयागांवाचून असो, चैनीच्या पदार्थांत सुख मानणें हा मार्ग (अंत) हीन व ग्राम्य आहे. त्याचप्रमाणें निर्ग्रंथांचा व मक्खलि गोसालादिकांचा तपश्चर्येचा मार्ग (अन्त) जरी हीन आणि ग्राम्य नसला, तरी दु:खकारक व अनर्थावह आहे. म्हणजे त्याच्यापासून कोणालाच कांहीं फायदा नाहीं. अर्थात् हे दोन्ही अंत त्याज्य ठरतात.

६९. आचरणांत जसा मध्यम मार्ग दोन अंतांच्या मधून जातो तशी तत्त्वज्ञानांत चार आर्यसत्यांची विचारसरणी दोन अंतांच्या मधून जाणारी आहे. एक बाजूला देह हा आत्मा समजून त्याची पुष्टी करणें हेंच परमश्रेयस्कर मानणारें तत्त्वज्ञान, व दुसर्‍या बाजूला आत्मा अमर आहे, तो कशानेंहि भ्रष्ट होत नाहीं, किंवा देहदंडनादिकांनी त्याला मुक्त केलें पाहिजे इत्यादिक तत्त्वज्ञानें, या दोन्ही अंतांच्या मधला मार्ग म्हटला म्हणजे चार आर्यसत्यें  होत. (१) जगांत दु:ख आहे, आणि (२) तें आत्म्यानें किंवा दुसर्‍या कोणीतरी उत्पन्न केलेलें नसून मनुष्याच्या तृष्णेनें उत्पन्न झालेलें आहे. (३) या तृष्णेचा सर्वथैव त्याग करणें हाच मोक्ष. (४) तो त्याग इतरांशीं समत्वानें वागल्यानेंच होणार आहे. इतरांशीं समत्वानें कसें वागावें हेंच अष्टांगिक मार्ग शिकवतो, व हेंच चौथें आर्यसत्य आहे.

७०. पार्श्वाच्या चातुर्यामांत आणि बुद्धाच्या अष्टांगिक मार्गांत थोडा फरक आहे. अहिंसेच्या योगानें मानवजातींशीं तादात्म्य पावणें हें दोघांचेंहि ध्येय आहे. तथापि पार्श्वाचे चारीहि नियम निषेधात्मक आहेत; व ते देखील तपश्चर्येंत मिसळून गेले आहेत. बुद्धाचे आठ नियम विधायक आहेत, व तपश्चर्येपासून मोकळे आहेत. सम्यक् कर्म ह्यांत अहिंसेचा अन्तर्भाव होतो एवढेंच नव्हे, तर अस्तेय आणि अव्यभिचार यांचाहि त्यांत समावेश होतो; व पुन: हिंसा करावयाची नाहीं एवढेंच नव्हे, तर हिंसेपासून जनतेला मुक्त करण्याच्या प्रयत्‍नाचाहि त्यांत समावेश होतो. चोरी करावयाची नाहीं एवढेंच नव्हे, तर इतरांनाहि चोरीपासून निवृत्त करण्याचा प्रयत्‍नाचा, व्यभिचारापासून निवृत्त व्हावयाचें एवढेंच नव्हे, तर त्यापासून इतरांनाहि निवृत्त करण्याच्या प्रयत्‍नाचा सम्यक् कर्मांत समावेश होतो. ह्यांत पार्श्वाच्या अहिंसा आणि अस्तेय या दोन यामांचा समावेश होतो, हें सांगावयास नकोच.

७१ असत्य भाषण स्वत: करावयाचें नाहीं व दुसर्‍यालाहि त्यापासून निवृत्त करावयाचें, चहाडी करावयाची नाहीं व इतरांनाहि तिजपासून निवृत्त करावयाचें, शिवीगाळ करावयाची नाहीं व इतरांनाहि तिजपासून निवृत्त करावयाचें, वृथाप्रलाप करावयाचा नाहीं व इतरांनाहि त्यापासून निवृत्त करावयाचें, ह्याला सम्यक् वाचा म्हणतात. ह्या अंगांत पार्श्वाच्या असत्यविरतीचा समावेश होतो हें स्पष्टच आहे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel