१५४. ब्राह्मी स्थितीच्या किंवा स्थितप्रज्ञाच्या वर्णनांतील कांहीं श्लोकांचें भाषांतर विस्तारभयास्तव गाळलें आहे. तें मुळांत पहातां येण्याजोगें आहेच. हें सर्व वर्णन बौद्ध ग्रंथांच्या आधारें लिहिलें आहे, असें बहुतेक पाश्चात्य विद्वानांचें मत आहे; आणि तें ‘ब्रह्मनिर्वाणमृच्छति’ या शेवटल्या श्लोकाच्या वाक्यावरून योग्य ठरतें. यांत स्मृतिविभ्रम, निराहार वगैरे शब्दांचे अर्थ बौद्ध परिभाषा जाणल्याशिवाय बरोबर समजणार नाहींत. ह्या बौद्ध तत्त्वज्ञानाचा आणि लढाईचा अर्थाअर्थीं कांहीं संबंध नाहीं. असें असतां तें ह्याच अध्यायांत घुसडून देण्यांत आलें आहे.

१५५. या परस्परविरोधाची उपपत्ति लावावयाची असली, तर हा ग्रंथ कोणासाठीं लिहिला, हें प्रथमत: समजून घ्यावें लागेल. वसुबंधूचा पुरगुप्त मित्र होता. त्यानें आपल्या मुलाला व महाराणीला वसुबंधूपासून बौद्ध तत्त्वज्ञान शिकावयास लावलें. पुरगुप्त निवर्तल्यानंतर बालादित्यानें वसुबंधूला आणवून आपल्या राजधानींत ठेवलें; व त्याची तो वारंवार सल्ला घेत असे. बालादित्याला आपल्याच नातलगांशी आणि दुसर्‍या अनेक राजांशीं लढण्याचा प्रसंग आला असावा. तेव्हां त्याच्या मनांत वारंवार अशी शंका येणें साहजिक होतें कीं, केवळ राज्यलोभासाठी मी माझ्या आप्तमित्रांशीं कां लढावें ? वसुबंधूसारख्या बौद्ध पंडिताचें त्याच्यावर बरेंच वजन असल्याकारणानें बौद्धांचें जें प्राप्तव्य-ज्याला येथें ब्राह्मी स्थिति म्हटलें आहे - त्याच्याविषयींहि त्याच्या मनांत फार आदर होता. तेव्हां एका बाजूला आप्तमित्रांशीं लढाई करण्याचा प्रसंग, व दुसर्‍या बाजूला वसुबंधूसारख्या बौद्धपंडिताचा उपदेश, ह्या दोहोंमध्यें त्याचें मन एकसारखें हेलकावे खात असल्यास मुळींच नवल नाहीं. अशा परिस्थितींत बालादित्यानें एकाद्या ब्राह्मणाला यांतून मार्ग काढण्यासाठीं एकादा ग्रंथ निर्माण करण्यास सांगितलें, व त्यानें ही भगवद्‍गीता महाभारतांत घातली असावी.

१५६. येथें असा प्रश्न उद्‍भवतो कीं, गीता बालादित्याच्या वेळीं लिहिली याला आधार काय ? वसुबंधु विज्ञानवादाचा उत्पादक; व त्या विज्ञानवादावर टीका खुद्द ब्रह्मसूत्रभाष्याच्या दुसर्‍या अध्यायाच्या दुसर्‍या पादांत खालील सूत्रांत केलेली आढळते. नाभाव् उपलब्धे: || २८|| वैधर्म्याच्च न स्वप्नादिवत् || २९ || न भावोsनुपलब्धे: ||३०|| क्षणिकात्वाच्च ||३१|| अर्थात् वसुबंधु ब्रह्मसूत्रकाराच्या पूर्वीं असावयास पाहिजे. फार झालें तर वसुबंधु व ब्रह्मसूत्रकार हे दोघेहि समकालीन ठरतील. ‘ब्रह्मसूत्रपदैश्चैव हे तुमद्‍भिर्विनिश्चितै: (अ. १३, श्लो. ४) ‘या वाक्यावरून गीता ब्रह्मसूत्रानंतरची आहे, यांत कांहीच शंका रहात नाहीं. ती ब्रह्मसूत्राच्या कर्त्यानेंच किंवा कोणी तरी त्याच्या भक्तानें रचली असली पाहिजे. या दृष्टीनें ती बालादित्यानंतरहि लिहिली असावी, असें समजण्यास हरकत नहीं. तथापि सर्व गुप्त राजांचा कुलदेव वासुदेव, चातुर्वर्ण्याविषयीं त्यांचा पक्षपात, सार्वभौमत्व संपादण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा, व खास बालादित्याचा वसुबंधूविषयीं असलेला आदर, या सर्व गोष्टींचा विचार केला असतां गीता बालादित्याच्याच वेळीं लिहिली असावी, ह्या अनुमानाला विशेष बळकटी येते.

१५७. वसुबंधूला समुद्रगुप्ताचा गुरु ठरविण्याचा जो विन्सेन्ट स्मिथ यांनी पेरीच्या आधारें प्रयत्‍न केला आहे तो अप्रस्तुत दिसतो. प्रो. पाठक यांच्या लेखाचा, परमार्थ यानें लिहिलेल्या वसुबंधूच्या चरित्राचा, ह्युएन् त्संगनें दिलेल्या वसुबंधूच्या कथेचा, व तिबेटियन परंपरेचा विचार केला असतां वसुबंधु बालादित्याचाच गुरु होता असें सिद्ध होतें. १  तेव्हां बालादित्याच्या वेळीं बादरायणानें किंवा त्याच्या एकाद्या शिष्यानें भगवद्‍गीता लिहिली असावी, असें गृहीत धरणें योग्य वाटतें.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१ Political History of Ancient India, p. 363. वसुबंधूच्या काळाचा ऊहापोह वि. स्मिथ यांनी Early History of India pp. 346-47 मध्यें केला आहे. त्यांच्या मताप्रमाणें वसुबंधु समुद्रगुप्ताचा गुरु होता. तसें धरलें तरी गीता गुप्तकालांतीलच ठरते परंतु हेमचंद्र रायचौधरी यांनी निर्देशिलेला बालादित्यच वसुबंधूचा शिष्य असणें अधिक संभवनीय आहे. बालादित्य इ.स. ४६७ सांत गादीवर आला असें वि. स्मिथ यांचे म्हणणें. हाच वसुबंधूचा काळ धरला, तर परमार्थ, ह्यूएन् त्संग व तिबेटियन ग्रंथकार या सर्वांनी लिहिलेल्या वसुबंधूच्या कथानकांची ह्या काळासंबंधीं एक वाक्यता होईल असें वाटतें.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel