इंग्रजांचा विजय

१७. इतिहासकारांचें म्हणणें असें कीं, डुप्लेला जर फ्रेंच सरकारचा पाठिंबा मिळाला असता, तर इंग्रजांना हिंदुस्थान सोडून जावें लागलें असतें, व येथें फ्रेंचांचेंच राज्य स्थापन झालें असतें. तुपांत तळलें किंवा तेलांत तळलें, तरी तें माशाला सारखेंच. त्याप्रमाणें फ्रेंचांचें राज्य झालें काय, कीं इंग्रजाचें राज्य झालें काय, हिंदुस्थानाला तें सारखेंच होतें. अर्थात् हिंदी जनता त्याबद्दल बेफिकीर राहिली. उत्तरोत्तर फ्रेंच व इंग्लिश यांमधील चुरस वाढत जाऊन प्लासीच्या लढाईनंतर (१७५७) हिंदुस्थानांत इंग्रजी राज्याचा पाया सुदृढ झाला. कधीं या राजाची तर कधीं त्या राजाची तरफदारी करतां करतां सर्व हिंदुस्थान इंग्रजांना लाभला. तरी त्यांची राज्यतृष्णा तृप्त होईना. त्यांचें सार्वभौमत्व कबूल करणारीं संस्थानें खालसा करण्याचाहि त्यांनी सपाटा चालविला; व त्यांच्या ह्या लोभाचें पर्यवसान १८५७ सालच्या बंडांत झालें.

१८. इंग्रजांना हीं सगळीं संस्थानें ताब्यांत घेतां आलीं असतीं, तर हिंदुस्थानचा फार फायदा झाला असता. अर्धमेले संस्थानिक जाऊन त्या ठिकाणीं इंग्रजांची सत्ता स्थापित झाल्यानें व्यापारउद्योगाची वाढ होऊन पाश्चात्य संस्कृतीची माहिती हिंदुस्थानांतील सर्व नागरिकांना एकसारखी होण्यास फार मदत झाली असती. आजला हिंदुस्थानच्या प्रगतीच्या मार्गांत हीं संस्थानें म्हणजे मोठे धोंडे आहेत, असें सर्व सुशिक्षितांना वाटत आहे; आणि सोशॅलिस्ट तर त्यांच्या निर्मूलनासाठीं उत्सुक दिसत आहेत. परंतु लॉर्ड डलहौसीच्या वेळीं ‘संस्थानें म्हणजे हिंदी संस्कृति आहे.’ असें लोकांस वाटत होतें; व त्यामुळें हिंदी शिपाई मोडकळीस येत चाललेल्या या संस्थेसाठीं लढण्यास तयार झाले. त्याचा परिणाम असा झाला कीं, इंग्रज घाबरून गेले; व ह्या मरत चाललेल्या संस्थेला तशाच अर्धवट मृतावस्थेंत ठेवणें त्यांना इष्ट वाटलें!  ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार आटोपला, आणि सत्ता व्हिक्टोरिया महाराणीच्या हातीं गेली ( म्हणजे तिच्या नांवानें पार्लमेंट कारभार पाहूं लागलें.) व सरते शेवटीं तिला १८७७ सालीं हिंदुस्थानची सम्राज्ञी बनवून शिल्लक राहिलेल्या संस्थानिकांना इंग्रजांनी कायमचें आपल्या राज्ययंत्राला जखडून टाकलें. संस्थानिक नामधारी महाराजे, त्यांनी आपल्या प्रजेला पाहिजे तर वाटेल तसें वागवावें; पण जरा वर डोकें काढण्यास आरंभ केला, तर तें ठेंचण्यास रेसिडेंट टपलेलाच असावयाचा !

१९. क्लाइव्ह आणि हेस्टिंग्स यांनी चालविलेली लुटालूट व ठकबाजी तशीच चालू राहिली असती, तर हिंदुस्थानांत इंग्रजांचा कारभार अत्यंत दु:सह झाला असता. परंतु इंग्रजांच्या सुदैवानें त्याच वेळीं अमेरिकन संस्थानें स्वतंत्र होण्याच्या खटपटीस लागलीं. त्यामुळें पार्लमेंटांतील प्रागतिक पक्षानें क्लाइव्हवर कडक टीका करून त्याला दोषी ठरविलें. क्लाइव्हनें १७७४ सालीं आत्महत्या केली. दुसर्‍याच वर्षीं अमेरिकन संस्थानांनी बंडाचा झेंडा उभारला; व त्यानंतर १७७६ सालच्या जुलै महिन्याच्या चौथ्या तारखेस स्वातंत्र्याचा प्रसिद्ध जाहीरनामा (Declaration of Independence) काढला. हें युद्ध सात वर्षें चाललें; व सरते शेवटीं अमेरिकन संस्थानांचें स्वातंत्र्य इंग्रजांना कबूल करावें लागलें. हा धडा जर त्यांना मिळाला नसता, तर हिंदुस्थानांत त्यांनी खात्रीनें कहर करून सोडला असता. तरी पण अमेरिकेंतील गोरे लोक व हिंदुस्थानांतील काळे लोक ह्यांत इंग्रजांना फरक दिसतच होता; व त्यामुळें वारन हेस्टिंग्सचे पुष्कळसे गुन्हे पुढें आले असतांहि इंग्लिश पार्लमेंटानें चार वर्षे चौकशी चालवून १७९२ सालीं त्याला दोषमुक्त ठरविलें.

२०. पोर्तुगीज, डच, फ्रेंच आणि इंग्लिश अशा चार युरोपियन लोकांनी हिंदुस्थानावर ताबा मिळवण्यासाठीं खटपट केली. त्यांत इंग्रज विजयी झाले, याचें कारण केवळ नशीब नसून इंग्रजांनी आपल्या देशांत घडवून आणलेली औद्योगिक क्रान्ति होय. कमजास्त प्रमाणानें पश्चिम युरोपांतील सर्व देशांत पंधराव्या शतकापासूनच औद्योगिक क्रान्तीला आरंभ झाला होता. पण तिच्यांत इंग्लंडानें आघाडी मारली. इंग्लंडांतील सरदार व मध्यमवर्गांतील श्रीमंत लोकांनी १२१५ सालीं आपल्या राजाकडून असा एक हक्क मिळवला कीं, प्रजेवर नवीन कर बसवायचे असले तर कॉमन्स आणि लॉर्डस या दोन सभांचीं संमति मिळवली पाहिजे. ह्याला ‘माग्ना कार्ता’ (Magna Charta = बडा फरमाना) म्हणतात. ह्याचा उपयोग इंग्लिश लोकांनी वारंवार केला असें नाहीं. तथापि व्यापारी क्रांतीला त्याची फार मदत झाली. त्यानंतर सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धांत इंग्लडनें मार्टिन लूथरच्या पंथाचा स्वीकारकरून पोपची धार्मिक सत्ता उडवून दिली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel