७२. पूर्वीच्या ऋषींच्या आश्रमांचीं जीं वर्णनें जातकादि बौद्ध ग्रंथांतून सांपडतात त्यांवरून असें दिसून येतें कीं, हे यति लोक अरण्याजवळ, नदीच्या काठीं, किंवा अशाच अन्य रम्य ठिकाणीं आश्रम करून रहात असत. वाङ्मयाचा आणि इतर शास्त्रांचा त्यांजपाशीं अभ्यास करण्यासाठीं दूर दूरच्या प्रदेशांतून विद्यार्थी येत, व त्यांना ते तयार करून पाठवीत असत.

७३. येथें असा प्रश्न येतों कीं, ज्या यतींना इन्द्रानें कुत्र्यांस खाऊं घातलें, त्यांच्याच परंपरेंतील यतींनी अरण्यांत राहून त्याच इन्द्राचीं स्तोत्रें गावीं हें विलक्षण नव्हे काय ?  पण त्याला इलाज नव्हता. इन्द्राचें साम्राज्य स्थापन झाल्यावर इन्द्राची पूजा सर्वत्र पसरली. ब्राम्हणांना देखील उपजीविकेसाठीं इन्द्राचीं स्तोत्रें रचावीं लागलीं, व आश्रयदात्या राजांच्या दरबारांत तीं गावीं लागलीं. तेव्हां अरण्याचा आश्रय करून रहाणार्‍या यतींनाहि तोच मार्ग पतकरावा लागला. आजकाल जे जटाधारी बुवा आहेत, त्यांचा बुद्धसमकाळीं अग्निपूजा करण्याचा धर्म होता. म्हणजे हे यतींनाच अनुसरणारे लोक होते. परंतु कालान्तरानें शिव आणि विष्णु या देवतांचें महत्त्व हिंदुस्थानांतील राजांच्या दरबारांत वाढत गेल्यावर ब्राम्हणांनीच नव्हे तर ह्या जटिलांनीहि शिवाची आणि विष्णुची पूजा स्वीकारली. तेव्हां यतींना सामान्य जनतेचा इंद्रादिकांना पुजण्याचा धर्म स्वीकारावा लागला असला, तर त्यांत आश्चर्य कोणतें ?

७४. हे यति किंवा अरण्यवासी ब्राम्हण वैदिक संस्कृतीचा फैलाव कसा करीत असत याचें एक उदाहरण बौद्ध वाङ्मयांतील सुत्तनिपातांत आलें आहे. बावरी नांवाचा एक ब्राम्हण कोसल देशांतून गोदावरीतीरावर जाऊन अरण्यांत एक आश्रम स्थापन करतो. हळू हळू त्या आश्रमाच्या आजूबाजूला लोकवस्ती वाढत जाते, व त्या लोकांच्या साहाय्यानें तो ब्राम्हण मोठा यज्ञ करतो. गोष्ट बुद्धसमकालीन आहे. तरी बुद्धापूर्वी कांहीं शतकें आरण्यक ब्राम्हण वैदिक संस्कृतीचा कसा प्रचार करीत असत, ह्याचा तो एक चांगला नमूना आहे.

७५. सप्तसिंधूंतील दास लोक बाबिलोनियन लोकांप्रमाणें मोठमोठालीं मन्दिरें बांधून त्यांत आपल्या देवतांची पूजा करीत असत. आजला जे दोन नगरावशेष सांपडलेले आहेत, त्यांतील मन्दिरें समजण्यांत आलेल्या इमारतींत कोणत्याहि देवतेच्या मूर्ति सांपडल्या नाहींत. एका ठिकाणीं लिंगाच्या आकाराचा एक स्तंभ सांपडला आहे असें म्हणतात. पण त्यावरून दास लोक लिंगपूजक होते असें समजणें चुकीचें होईल. ते आपल्या देवळांत कोणत्या प्रकारें पूजा करीत असत याचा अद्यापि थांग लागलेला नाहीं. कांहीं असो, त्यांचीं मन्दिरें होतीं असें गृहीत धरून चालण्यास हरकत नाहीं.

७६. इन्द्राची स्वारी आल्यावर हा प्रकार बदलला. एक मंडप घालून त्याच्यांत यज्ञयाग करण्याची प्रथा सुरू झाली. दास लोकांत जे यति असत, ते यज्ञ करीत होते किंवा नाहीं हें सांगतां येत नाहीं. शतपथ ब्राम्हणांत एके ठिकाणीं म्हटलें आहे कीं, ‘यज्ञ हा विष्णु होता, व तो वामन (ठेंगणा) होता. पुढें तो हळू हळू वाढत गेला, व त्याचा सर्वत्र प्रसार झाला.१ याच्यावरून असें दिसतें कीं, इन्द्राच्या आगमनानंतर यज्ञसंस्था फारशी जोरांत नव्हती. पण पुढें ती हळू हळू विस्तार पावत गेली. साध्या अग्निहोत्रापासून तहत पुरुषमेधापर्यंत तिची मजल पोंचली
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(१ यज्ञमेव विष्णुं पुरस्कृत्येयुः ।... वामनो ह विष्णुरास ।... तेनेमां सर्वां पृथिवीं समविन्दन्त ।... [शतपथ ब्रा० १।२।३।३-७])
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel