२८६. इंद्रानें सिंध देश काबीज केल्याबरोबर ब्राह्मणांनी इतर देवांच्याहि वर त्याला चढवून आपलें अस्तित्व कायम ठेवलें. त्यानंतर शक आले. त्यांच्या महादेवाला वेदाचा आधार देऊन व श्वेताश्वतर उपनिषद् रचून त्यांनी आपला पुजारीपणाचा धंदा कायम ठेवला. गुप्त राजांच्या वेळीं महाभारताची वृद्धि करून व भगवद्‍गीता रचून त्यांनी आणखी एक नवीन दैवत आपलेंसें करून घेतलें. परंतु मुसलमानांच्या कारकीर्दींत त्यांना कोठेंच ठाव मिळेना. इतक्यात अकबरासारखा उदारमनस्क राजा त्यांना सांपडला. त्या वेळीं त्यांचे पूर्वसंस्कार पुन्हा उभे राहिले; व अल्लाला मिसळून हें नवीन उपनिषद् त्यांनी तयार केलें. पण या लहानशा उपनिषदाला सगळें कुराण व अठरा पुराणें आपल्या ताब्यांत आणतां येणें शक्यच नव्हतें. अर्थात् तें जशाच्या तसें पडून राहिलें.

२८७. अकबराच्या मुसलमानी धर्मामागें कुराण मुळींच नव्हतें, व तो शकांच्या महादेवाप्रमाणें केवळ एका अल्लाला घेऊन हिंदुस्थानांत आला, अशी जरी कल्पना केली, तरी महादेव व वासुदेव यांना हटवून सर्वत्र अल्लाची स्थापना करतां आली नसती. कां कीं, वैष्णवांच्या आणि शैवांच्या मंदिरांपासून होणारी प्राप्ति सोडण्यास ब्राह्मण तयार झाले नसते. बुद्धाच्या काळीं जसा ब्रह्मा जगाचा आदिकर्ता झाला, शकांच्या राजवटींत जसा महादेव आदिकर्ता झाला, व गुप्तांच्या कारकीर्दींत जसा वासुदेव आदिकर्ता झाला, तसा मुसलमानी राजवटींत अल्ला जगाचा आदिकर्ता झाला असता; जगाचे तीन आदिकर्ते होते, त्यांत ह्या चौथ्याची भर पडली असती, एवढेंच कायतें. तात्पर्य मुसलमानी कारकीर्दीत पुराणांच्या पाशांतून मुक्त होणें हिंदी जनतेला मुळींच शक्य नव्हतें.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
समाप्त
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel