९१.  इ.स. चौथ्या शतकांत तर ह्या लिंगाला फारच महत्त्व आलें असें दिसतें. वाकाटक नांवाचे राजे होते. त्यांचे नातलग भारशिव राजे. ते आपल्या खांद्यावर शिवलिंग घेऊन फिरत असत; व त्यामुळें त्यांचा राजवंश स्थिर झाला, अशी त्यांची समजत होती.१ ( १ अंसभारसंनिवेशितशिवलिंगोद्वहनशिवसुपरितुष्टसमुत्पादितराजवंशानां... भराशिवानां इत्यादि. [Corpus Inscriptionum Indicarum, iii, 236-37, 245.]) याच वाकाटक वंशांतील दुसर्‍या रुद्रसेन राजाला गुप्त वंशांतील दुसर्‍या चंद्रगुप्तानें आपली कन्या प्रभावती दिल्याचा दाखला शिलालेखांत सांपडतो. म्हणजे गुप्त राजांमध्यें, भारशिवांमध्यें व वाकाटक राजांमध्ये लिंगाविषयीं आदर फार होता असें दिसतें.

९२. असें असलें तरी लिंगपूजा सर्वत्र प्रचारांत आली नव्हती. एक दोन शतकें तरी ती खाजगी असावी. कां कीं, ह्युएन् त्संग याच्या प्रवासवृत्तांत कुठेंहि लिंगपूजेचें वर्णन आढळत नाहीं, व महादेवाच्या मूर्तीचीं वर्णनें वाटेल तेवढीं आढळतात. काशीला तर त्यानें जवळ जवळ शंभर फूट उंचीची महादेवाची तांब्याची मूर्ति पाहिली. १. असें असतां आजला जी सर्व हिंदुस्थानांत लिंगपूजा दिसते, ती सार्वत्रिक झाली कशी? आणि ह्युएन् त्संगनें पाहिलेल्या मूर्ति गेल्या कुठें ?
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
( १ Buddhist Records, ii, 45)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
९३. महमूद गझनीच्या वेळीं लिंगाची सार्वजनिक पूजा अमलांत आली होती; तरी पण महादेवाच्या मूर्तिहि होत्या सोमनाथ येथें लिंगपूजा केली जात असे; व इतर कांहीं ठिकाणी महादेवाच्या मूर्तिहि पुजल्या जात असाव्या. त्या मूर्ति कशा करीत याचें वर्णन अलबेरूनीनें बहुत्संहितेच्या आधारें दिलें आहे. त्यावरून असें वाटतें कीं, मुसलमानांच्या स्वार्‍यांनंतर महादेवाच्या मूर्ति बनवण्याचा प्रघात बंद पडला असावा. हे लोक दगडी मूर्ति असल्या तर त्या छिन्न भिन्न करीत, व धातूच्या असल्या तर घेऊन जात. अशा वेळीं लिंगपूजा सोइस्कर झाली. जरी मुसलमानांनी लिंग फोडून टाकलें, तरी तें पुन्हा करण्यास फार प्रयास पडत नसत.

९४. येथें असा प्रश्न उपस्थित होतो कीं, अशा ह्या पंथाला आळा घालणें शक्य नव्हतें काय ? बौद्ध श्रमण जर सुखवस्तु बनले नसते तर तें शक्य झालें असतें; किंवा दुसरा मार्ग म्हटला म्हणजे जपानांतील सिंगोंजी पंथांतील भिक्षूंप्रमाणें ह्या देशांतहि भिक्षूंना लग्न करण्यास मुभा पाहिजे होती. हे जपानी भिक्षु एकदाच लग्न करतात. त्यांच्या हयातींत बायको मेली, तर ते दुसरें लग्न करीत नाहींत. जपानांत जे दहा बारा बौद्ध संप्रदाय आहेत त्या सर्वांत हा संप्रदाय मोठा आहे. अशा तर्‍हेचा संप्रदाय येथें निघाला असता, तर कदाचित् लिंगपूजेसारख्या बीभत्स प्रकारांना आळा घालतां आला असता.

९५. परंतु तसा संप्रदाय निर्माण करण्याचें धैर्य परंपरेचे दास बनलेल्या बौद्ध श्रमणांत राहिलें नव्हतें. तेव्हां तसा पंथ काढण्याऐवजीं आपल्या संघाला बचावण्यासाठीं त्यांनी तंत्रांच्या रूपानें असल्या वाममार्गांना एकतर्‍हेचें धार्मिक स्वरूप दिलें. सहाव्या किंवा सातव्या शतकांत बौद्ध श्रमणांनी लिहिलेली तंत्रें लिंगपूजेइतकींच बीभत्स आहेत. नग्न स्त्रीची पूजा करावयाची, मद्यमांसादिक येथेच्छ सेवन करावयाचें इत्यादिक बीभत्स प्रकार त्यांत भरपूर आहेत. अशा श्रमणांकडून लिंगपूजेला विरोध होणें शक्य नव्हतें, हें सांगवयालाच नको. ह्याच वाममार्गी श्रमणांपासून लिंगपूजा उत्पन्न झाली, व ती वाढत जाऊन गंज जसा लोखंडाला खाऊन टाकतो, त्याप्रमाणें त्याच लिंगपूजेनें श्रमणसंस्कृतीला गिळंकृत केलें !
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel