१६२. परन्तु यदाकदाचित् या शांततावादी परराष्ट्रमंत्र्याला थोडीबहुत शंका उपस्थित झाली कीं, चीनला दाबणें जरी सुलभ असलें, तरी आमच्या ह्या वर्तनानें दोन्ही राष्ट्रावर संकट येणार नाहीं कशावरून ? इकडे अमेरिका व इंग्लंड आणि तिकडे बोल्शेव्हिकांचें वाढतें सामर्थ्य, अशा कचाटींत आम्ही आहोंत. तेव्हां बौद्धांच्या तत्त्वाप्रमाणें प्रेमानें वागून परस्परांचा स्नेहसंबंध जोडणें हितावह नाहीं होणार कशावरून ? हा विचार लष्करी भगवंताला समजल्याबरोबर पांच दहा मोठमोठ्या अधिकार्‍यांचे खून करून तो आपलें विश्वरूप प्रकट करील. तें पाहिल्याबरोबर या परराष्ट्रमंत्र्याची खात्री होईल कीं, युद्धापेक्षां दुसरें कांहीं श्रेयस्कर नाहीं; व तो म्हणेल –

‘नष्टो मोह: स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत |
स्थितोSस्मि गतसंदेह:  करिष्ये वचनं तव ||’

हे कधींच च्युत न होणार्‍या लष्करी भगवंता, तुझ्या प्रसादानें माझा मोह गेला, व स्मृति उत्पन्न झाली. माझा संशय फिटला. आतां मी तुझ्या वचनाप्रमाणें चालतों.

१६३. अशा प्रकारें सर्व राष्ट्रांतील अधिकारी वर्गांच्या भगवंतांच्या तोंडीं ही गीता शोभण्यासारखी आहे. देशकालाप्रमाणें तींत थोडाबहुत फेरफार करावा लागेल, एवढेंच काय तें. त्या काळच्या स्त्रियांची, वैश्यांची व शुद्रांची जशी गीतेंत व्यवस्था लावण्यांत आली आहे, तशी भांडवलशाही जगांत आजहि लावतां येण्याजोगी आहे. या भांडवलशाही भगवंताची पूजा स्त्रियाहि करूं शकतात. त्यांना लढाईंत भाग घेतां आला नाहीं, तरी गिरणीमध्ये लढाऊ सामान वगैरे करण्याचें काम करतां येतें. ज्या म्हातार्‍याकोतार्‍या असतील त्यांना लष्करी लोकांसाठीं कपडे विणतां किंवा शिवतां येतात. त्याचप्रमाणे लढाईंत भाग न घेणार्‍या पुष्कळशा शूद्रांना खंदक खोदण्याचीं, रसद पुरवण्याचीं वगैरे कामें करतां येतात. वैश्यांना लढाईसाठीं कर्ज उभारतां येतें. एवंच अशा रीतीनें भांडवलशाही जगांतील सर्व वर्गांतील स्त्रीपुरुषांनी अनन्यभावें भगवंताची पूजा केली, तर कौरव-पांडवांप्रमाणे सर्वांनाच मोक्ष मिळणें शक्य आहे !

१६४. गीतेंत ब्राह्मी स्थिति बौद्धांपासून घेतली, हें वर सांगितलेंच आहे. पण बौद्धांच्या कांही तत्त्वांचा विपर्यास केला आहे. त्यांपैकीं मुख्य कर्मयोग आहे. बुद्धाचा कर्मयोग म्हटला म्हणजे, ‘कोँणत्याहि प्रकारें इतर जनांची हानि होईल अशीं कर्में करूं नयेत, सर्वांचें कल्याण होईल अशा कर्मांचा पूर्ण विकास करावा, आणि त्यांतहि चित्तशुद्धि ठेवावी, म्हणजे सत्कर्मांचाहि अभिमान बाळगूं नये.’१ ( सब्ब पापस्स अकरणं कुसलस्स उपसम्पदा ।
सचित्तपरियोदपनं एतं बुद्धान सासनं ।। धम्मपद ।। ) याचा विपर्यास गीतेंत असा केला आहे कीं, ‘बापानें चालविलेला जो धंदा असेल, तो स्वधर्म समजून करावा, व त्यांत आसक्ति ठेवूं नये; म्हणजे त्या कर्मांचा परिणाम का होईल, याचा मुळींच विचार करूं नयें.’

१६५. लोकसंग्रह याचाहि असाच विपर्यास झाला आहे. बौद्ध ग्रंथांत लोकसंग्रह चार सांगितलेले आहेत; ते असे –
दानं च पेय्यवज्जं च अत्थचरिया च या इध |
समानत्तता च धम्मेसु तत्थ तत्थ तथारहं |
एते खो संगहा लोके रथस्साणीव यायतो ||
एते च संगहा नास्सु न माता पुत्तकारणा |
लभेथ मानं पूजं वा पिता वा पुत्तकारणा ||१
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१ अंगुत्तरनिकाय, चतुक्कनिपात, पण्णासक १|४|२; दीघनिकाय, सिगालकसुत्त.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
( दान, प्रियवचन, अर्थचर्या आणि समभावानें वागणें, हे यथा-योग्य वेळीं आचारणांत येणारे चार संग्रह इहलोकीं – समाजाच्या - रथाच्या आंसाप्रमाणें आहेत. जर हे संग्रह नसते, तर केवळ मुलाला जन्म दिला म्हणून मातेला अथवा पित्याला मान व पूजा मिळाली नसती.)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel