विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति

अहिंसाधर्माचा उगम


१. घोर आंगिरसानें कृष्णाला आत्मयज्ञ शिकवला. त्या यज्ञाच्या दक्षिणा म्हटल्या म्हणजे तपश्चर्या, दान, ऋजुभाव, अहिंसा व सत्य वचन.१  कृष्णाचा गुरु नेमिनाथ नांवाचा तीर्थंकर होता असें जैन ग्रंथकरांचें म्हणणें आहे. हा नेमिनाथ व घोर आंगिरस एकच होते कीं काय?
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
( १ वि० १।७८ पहा.)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
२. दुसरा एक उतारा जैन ग्रंथांत सांपडतो तो असा – भरहेरवएसुं णं वासेसु पुरिमपच्छिमवज्जा मज्झिमगा बावीसं अरहंता चाउज्जामं धम्मं पण्णवेंति । तं जथा- सव्वातो पाणा- तिवायाओ वेरमणं, एवं मुसावायाओ वेरमणं, सव्वातो अदिन्ना- दाणावो वेरमणं, सव्वातो बहिध्दादाणाओ वेरमणं ।। स्थानांग सूत्र, क्रमांक २६६ ।। (भरत आणि एरवत या प्रदेशांत पहिला व शेवटचा खेरीज करून बाकी बावीस तीर्थंकर चातुर्याम धर्म उपदेशितात तो असा – सर्व प्राणघातापासून  विरति; याप्रमाणें असत्यासून विरति, सर्व अदत्तादानापासून ( चोरी पासून ) विरति, सर्व बहिर्धा आदानापासून ( परिग्रहापासून) विरति. ही नुसती दंतकथा असूं शकेल. परंतु छांदोग्य उपनिषदांतील घोर आंगिरसाचा उपदेश व ही परंपरागत आलेली जैनांची गोष्ट एकत्र केली तर असा निष्कर्ष कीं, निदान कृष्णाच्या वेळीं तरी उत्तर हिंदुस्थानांत अहिंसा म्हणजे काय हें माहीत होतें.

३. ऋषभदेवापासून नेमिनाथापर्यंत बावीस तीर्थंकर होतात. त्यांचीं चरित्र जैन ग्रंथांत विस्तारपूर्वक दिलीं आहेत. तीं पूर्णपणें दंतकथात्मक दिसतात. उदाहरणार्थ, ऋषभदेवाची उंची पांचशें धनुष्यें होती; आयुष्य चौसष्ट लक्ष वर्षें;  साधु शिष्य चौर्‍याऐशीं हजार, व साध्वी शिष्य तीन लाख; श्रावक शिष्य तीन लाख पांच हजार, व श्राविका शिष्य पांच लाख चौपन हजार. ही उंची कमी कमी होत  जाऊन बावीसाव्या तीर्थंकराची (नेमिनाथायी) दहा धनुष्यें झाली. ह्याचें आयुष्य एक हजार वर्षें; साधु शिष्य अठरा हजार; साध्वी शिष्य चाळीस हजार; श्रावक एक लक्ष एकुणसत्तर हजार, व श्राविका तीन लक्ष छत्तीस हजार.१ ( १ श्रीकाललोकप्रकाश, सर्ग ३२ ). हे आंकडे पाहिले म्हणजे हीं चरित्रें दंतकथात्मक आहेत असें सांगण्याचें कारणच रहात नाहीं. आपली परंपरा अतिप्राचीन काळाची आहे हें दाखविण्याच्या उद्देशानें तीं जैन साधूंनी रचलीं असावींत.

४. तीर्थंकरांच्या उंच्या व आयुर्मर्यादा सोडून दिल्या तरी देखील त्याजपाशीं लहान किंवा मोठे संघ होते, हें पण संभवत नाहीं. तसे संघ असते तर परिक्षित् राजापासून बुध्दकाळा पर्यंत कुरु देशांतून त्यांचा पूर्णपणें लोप होणें शक्य नव्हतें. याच कारणास्तव ह्या कथा ऐतिहासिक गणतां येत नाहींत. नेमिनाथ किंवा त्याच्यासारखे दुसरे तपस्वी रूपानें अहिंसेचें आचरण करीत, व जे कोणी भक्तीभावानें त्यांजपाशीं येत त्यांनाहि आशा गोष्टींचा उपदेश करीत, हें संभवनीय आहे.

५. मज्झिम निकायांतील (बाराव्या) महासीहनाद सुत्तांत बुध्दानें बोधिसत्वावस्थेंत चार तर्‍हेचें तप आचरण केल्याचें वर्णन आहे. चार तर्‍हेचें तप म्हणजे तपस्विता, रूक्षता, जुगुप्सा आणि प्रविविक्तता. नग्न रहाणें, ओंजळींतच भिक्षा घेऊन खाणें, केस उपटून काढणें, कंटकशय्येवर निजणें इत्यादि प्रकारांनी देह दंडन करणें याला तपस्विता म्हणत. अनेक वर्षांची धूळ तशीच अंगावर बसूं देणें व ती कोणाला काढूं न देणें याला रुक्षता म्हणत. तिची अतिशयोक्तीचीं उदाहरणें पुराणांतहि आढळातातच. ऋषींच्या शरीरांवर वारुळें वाढत असत, व त्यांचे डोळे मात्र बाहेरून दिसत, अशीं वर्णनें पुराणांत कित्येक ठिकाणीं आलीं आहेत. पाण्याच्या थेंबावर देखील दया करणें याला जुगुप्सा म्हणत. अर्थात् जुगुप्सा म्हणजे हिंसेचा तिटकारा. अरण्यांत एकाकी रहाणें याला प्रविविक्तता म्हणत.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel