पाश्चात्यांचें अधिदैवत

४८. वेदकाळीं इंद्र, अशोकाच्या वेळीं बुद्ध, शकांच्या वेळीं महादेव व गुप्तांच्या वेळीं वासुदेव हीं दैवतें जशीं पुढें आलीं, तसें इंग्रजांच्या कारकीर्दींत स्वदेशाभिमान हें दैवत पुढें येऊं पहात आहे. हिंदु समाजांतील मध्यमवर्गांत त्याची उपासना प्रिय होच चालली आहे. मुसलमानांनी लोकांवर अल्लाला लादण्याचे महत्प्रयास केले; हिंदूंवर नानातर्‍हेचे कर बसवलें; तथापि राजीखुषीनें हिंदु लोकांनी क्वचितच अल्लाचा स्वीकार केला. मुसलमानांना त्या कामीं बळजबरी करावी लागली. परंतु या पाश्चात्य दैवताचा हिंदु समाज मोठ्या संतोषानें स्वीकार करीत आहे. ब्राह्मसमाज, आर्यसमाज, गणपति, अहिंसा हीं सर्व ह्या आराध्य देवतेच्या पूजेचीं साधनें गणलीं जातात. ह्या सर्व पंथांच्या उपासकांना जर तुम्ही म्हणाल कीं,  तुमच्यांत स्वदेशाभिमान नाहीं, तर ते त्याचा तीव्र निषेध करतील; आणि म्हणतील कीं, लोकांत खराखुरा देशाभिमान जागृत करण्यासाठींच आमचा पंथ आहे. म्हणजे देशाभिमान हें खरें दैवत असून हे लहान सहान पंथ त्याच्या पूजेचीं साधनें आहेत असें म्हणावें लागतें.

४९. पाश्चात्य राष्ट्रांत प्रामुख्यानें याच दैवताची पूजा होत आहे हें सांगणें नलगे. जर्मन कॅथलिकांनी महायुद्धांत आपले व फ्रेंच कॅथलिकांचे बलि ह्याच देवतेसाठीं दिले. जर्मन अमेरिकनांनी जर्मन देशांत रहाणार्‍या आपल्या बांधवांना त्यांचा कांहीं एक अपराध नसतां ह्याच देवतेच्या नादीं लागून ठार केलें. यावरून हें सिद्ध होतें कीं, धर्म किंवा जात या देशाभिमानाच्या आड येत असली, तर त्यांचा उच्छेद करण्याला कोणतेंहि पाश्चात्य राष्ट्र माघार घेणार नाहीं. बायबलांतील देवाचें महत्त्व तेथवरच, जेथवर तो देव देशाभिमानाच्या आड येत नाहीं!

५०. पाश्चात्यांच्या कारकीर्दींत मध्यमवर्गीय हिंदु लोकांत देशाभिमानाचा प्रसार होणें साहजिक होतें. मुलाला जसें पहिल्यानें मधाचें बोट लाऊन मग ब्राँडीसारखें औषध पाजण्यांत येतें, त्याप्रमाणें आमच्या पुढार्‍यांनी आम्हाला पाश्चात्यांसारखे उत्साही बनविण्याचा उद्देशानें प्रथमत: धार्मिक पंथांच्या व गणपतिउत्सवाच्या मिषानें या देशाभिमानाचें मद्य पाजण्यास सुरुवात केली. पण आतां आमचा समाज वयांत येत चालल्यामुळें त्याला अशा आमिषांची मुळींच गरज राहिली नाहीं. देशाभिमानाचे कितीहि प्याले झोकले, तरी त्याची तृप्ति होत नाहीं. ‘एके काळीं आम्ही इतके चांगले होतों, पण ह्या इंग्रजांच्या कारकीर्दींत फारच खालावलों,’ असें म्हटलें कीं ताबडतोब देशाभिमानाची पिपासा जागृत होते!

५१.  परंतु या देशाभिमानाला हिंदुस्थानांत मारक असा दुसरा एक अभिमान आहे; आणि तो आमच्या मुसलमान बांधवांचा. मुसलमान जरी हिंदुस्थानांत बरींच शतकें रहात आहेत, तरी त्यांचें सगळें लक्ष्य मक्केकडे आहे. आपल्या हातून कांहीं चुका घडल्या व आपलें राज्य गेलें, असें हिंदूंप्रमाणें मुसलमानांनाहि वाटतें; व तें पुन्हा मिळवण्याची त्यांना उमेद आहे. हिंदुस्थानांत ते जरी अल्पसंख्यांक आहेत, तरी अफगाणीस्तान, पर्शिया, तुर्क वगैरे सर्व देशांतील मुसलमान एकवटले, तर बंगालपासून कांस्टांटिनोपलपर्यंत एकछत्री मुसलमानी बादशाही स्थापन करतां येणें शक्य आहे असें त्यांस वाटतें; आणि याचसाठीं सिंध प्रांत विभक्त करणें, बंगालांत व पंजाबांत बहुमत मिळवणें इत्यादि सर्व खटपटी चालू आहेत.

५२. हिंदूंना या उद्देशाचा वास आला आहे. आपलें बहुमत करण्यासाठीं अस्पृश्यांना स्पृश्य करून घेण्याचा त्यांचा प्रयत्‍न तर चालूच आहे. याशिवाय ब्रह्मदेश, सयाम, चीन, जपान इत्यादि देशांतील बौद्धांचें आपणांस साहाय्य मिळावें एकदर्थ बौद्ध संस्कृतीलाहि हिंदु संस्कृतींत दाखल करून घेण्याची त्यांनी खटपट चालवली आहे. भिक्षु उत्तमांना हिंदु सभेनें आपले अध्यक्ष निवडलें, हें त्या खटपटीचें ताजें चिन्ह आहे.

५३. मुसलमानांचा प्रयत्‍न जसा देशाभिमानाला घातक आहे, तसा तो हिंदूंचाहि होऊं लागला आहे. हिंदुस्थानच्या पलीकडे जाऊन तुम्ही चीन, जपानची अपेक्षा करूं लागलां, तर त्यांत देशाभिमान राहिला कोठें?  शुद्ध देशाभिमान म्हटला म्हणजे पाश्चात्यांसारखा असला पाहिजे. स्वदेशाभिमानांनें जर्मन कॅथलिक फ्रेंच कॅथलिकनांना मारीत होते. त्याचप्रमाणें इंग्रज फ्रेंचांशीं असलेलें हाडवैर विसरून त्यांच्या साहाय्यानें आपल्या जर्मन धर्मबांधवांना ठार करीत होते. तसा देशाभिमान हिंदुस्थानांत आला, तर हिंदु व मुसलमान एक होऊन एका बाजूला बौद्धांना व दुसर्‍या बाजूला हिंदुस्थानाबाहेरील मुसलमानांना पादाक्रांत करून टाकतील. तेव्हां एका अर्थी तशा देशाभिमानाची दृढ स्थापना या देशांत होत नाहीं, हें आजूबाजूच्या देशांचें एक मोठें भाग्यच समजलें पाहिजे!
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel