३३. वेदविधीला कंटाळून जे तापसी अरण्यांत रहात, व ज्यांना निवापसुत्तांत दुसर्‍या कळपांतील मृगांची उपमा दिली आहे, अशा तापसी संघांपासूनच हे सहा संघ निर्माण झाले. अर्थात् वेदविधीला विशेषत: यज्ञयागांना विरोध करण्यांत या सगळ्या संघांत एकवाक्यता होती. दुसरी गोष्ट ही कीं, कमी-जास्त प्रमाणानें ते तपाचरण करीत, व गृहबंधनांत बद्ध होत नसत. सामान्य लोकाचें हित व्हावें हेंहि त्यांचें ध्येय असे. पण त्यांच्यातील मुख्य उणीव म्हटली म्हणजे ते आत्मवादांत शिरत. त्यांपैकी कांही आत्मा शाश्वत आहे असें मानीत, व कांहीं आत्मा मुळींच नाहीं असे समजत; आणि त्यामुळे त्यांच्यांत वाद उपस्थित होत असत. अशा एका प्रसंगाचें वर्णन उदानांत१  आलें आहे. त्यांत बुद्धानें अशा श्रमणांना जात्यंधांच्या हस्तिवर्णनाची उपमा लागू केली आहे; व निवापसुत्तांत त्यांना तिसर्‍या कळपांतील मृगांची उपमा लावली आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
( १ उदान, जच्चंघ वग्ग, सुत्त ४.)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
३४. या सहाहि संघांपैकीं आजला जैन संघाची तेवढी थोडीबहुत माहिती उपलब्ध आहे. पूरण कश्यपाचा अक्रियवाद व मक्खलि गोसालाचा नियतिवाद हे दोन्हीहि कालान्तरानें एक झाल्याचा दाखला अंगुत्तर निकायाच्या छक्कनिपातांत (सुत्त५७) सांपडतो. परन्तु त्यानन्तर दोन्ही पंथ नामशेष होऊन गेले. संजय बेलट्ठपुत्राचें तत्त्वज्ञान जैनांच्या स्याद्वादांत परिणत झालें असावें. हें तत्त्वज्ञान जैनांनी स्वीकारल्यावर त्याचा निराळा संघ असण्याचें कारण राहिलें नाही. उच्छेदवादाचा कांहींसा अंश सर्वदर्शनसंग्रहांत राहिला आहे, व त्याला चार्वाकमत म्हणतात. ह्या मताविषयीं आजकाल फारसा आदर राहिलेला नाहीं. तथापि एका काळीं तें प्रभावशाली होतें, व त्या मतापासूनच अर्थशास्त्रासारखे ग्रंथ निर्माण झाले. चाणाक्याच्या वेळीं कांही आचार्य ह्याच लोकायत विद्येला फार महत्त्व देत असत. चाणाक्यानें सांख्य, योग व लोकायत ह्या तिहींनाहि आन्वीक्षकी विद्या म्हटलें आहे.१.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
( १ सांख्यं योगो लोकायतं चेत्यान्वीक्षकी । अर्थशास्त्र, प्रक. १ अ २ )
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
३५. पकुध कात्यायनाचा ‘अन्योन्यवाद’ आजकाल अस्तित्वांत असलेल्या वैशेषिक शास्त्रांत परिणत झाला असावा. पण त्याच्या संघाने महत्वाची कामगिरी बजावली असेल असें वाटत नाहीं. ह्या सर्व संघाच्या श्रमणसंस्कृतींतून अत्यंन्त उज्वल असें जे मत निघालें, तें शाक्यपुत्र श्रमणाचें मत होय. त्याचा आतां थोडक्यांत विचार करूं.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel