१४.ब्राह्मणी इन्द्र हिंसक होता हें सांगणें नलगे. यज्ञयागांत त्याच्या नांवें बलिदान होत असे. त्यायोगें त्याचा हिंसकपणा बुद्धकालानंतरहि शिल्लक होताच. तरी पण बुद्धाच्या शिष्यांनी त्याला अहिंसक बनविलेंच !

१५. इन्द्राच्या पूर्वजन्मीची कथा कुलावक जातकांत (क्रमांक ३१) आली आहे. “तो पूर्वजन्मीं मगध देशांत मचल नांवाच्या गांवीं एका मोठ्या कुटुंबांत जन्मला होता. त्याला मघकुमार किंवा मघमाणव म्हणत. त्या गांवांत तीस कुटुंबें रहात असत. एके दिवशीं ग्रामकृत्यासाठीं सर्व मंडळी एकत्र झाली असतां मघानें आपली जागा साफसूफ केली. ती दुसर्‍यानें घेतली. अशा रीतीनें त्यानें सर्वच जागा साफ केली. मंडळी उघड्या जागेंत जमत म्हणून तेथें त्यानें मंडप घातला; व काहीं काळानें तो मंडप काढून तेथें एक मोठी ग्रामशाळा बांधली, आणि तेथें आसनांची व पाण्याची व्यवस्था केली. ह्या कृत्यांनी मघानें त्या तीसहि कुटुंबाचीं मनें आकर्षून घेतलीं.

१६. “ते सर्व शेतांत जाण्यापूर्वीं एकत्र जमून गांवच्या रस्त्यांची डागडुजी करीत, पूल बांधीत, तलाव खणीत, धर्मशाळा बांधीत. या रीतीनें ते सर्वजण सुशील बनले. पण गांवच्या पाटलाला ( ग्रामभोजकाला) हें आवडलें नाहीं. कां कीं, पूर्वी जेव्हां ते दारू पिऊन आपसांत तंटाबखेडा करीत, तेव्हां त्याला दंडाच्या रूपानें बरीच कमाई होत असे, ती बंद झाली. त्यांच्या विरुद्ध त्यानें राजाकडे तक्रार केली कीं, हे चोर लोक मोठी बंडाळी करीत आहेत. राजानें विचार न करतां ताबडतोब त्यांना बांधून आणण्याचा हुकूम केला, आणि हत्तीच्या पायांखालीं तुडवावयास लाविलें. त्यांना बांधून राजांगणांत जमिनीवर पालथें पाडलें. तेव्हां बोधिसत्त्व आपल्या सहायकांना म्हणाला, ‘तुम्ही आपल्या शीलाचें चिंतन करा, व खोटी फिर्याद करणार्‍यावर, राजावर हत्तीवर व स्वत:च्या शरीरावर एकसमान मैत्रीची भावना करा.’ त्यांनी त्याप्रमाणे केलें.

१७.  “त्यांना तुडविण्यासाठीं हत्ती आणला. माहुतानें हत्तीला पुढें केलें. पण तो त्यांच्यावरून जाईना; एकदम मोठा क्रौंचनाद करून मागें पळाला. दुसर्‍या हत्तीला आणलें; तिसर्‍या हत्तीला आणलें; पण त्यांनीहि पहिल्या हत्तीचेंच अनुकरण केलें. मघाच्या मंडळीशीं हत्तीला पळवून लावण्याचे कांहीं औषध असावें असें वाटून त्यांची झडती घेण्यांत आली. पण कांहीं सांपडलें नाहीं. तेव्हां राजपुरुषांनी प्रश्न केला, ‘तुमच्याजवळ कांही मंत्र आहे कीं काय?’ मघानें ‘होय’ असे उत्तर दिल्यावर त्या सर्वांना राजासमोर नेऊन उभें करण्यांत आलें. तेव्हां राजा म्हणाला, ‘तुमचा मंत्र कोणता तो आम्हास सांगा.’ मघ म्हणाला, ‘महाराज, आमच्या जवळ विशेष मंत्र असा कोणताहि नाहीं. पण आम्ही तीस जण प्राणघात करीत नसतों, चोरी करीत नसतों, व्यभिचार करीत नसतों, खोटें बोलत नसतों, व दारू पीत नसतों. आम्ही मैत्रीची भावना करतों, दान देतों, रस्त्यांची डागडुजी करतों, तलाव खणतों, व धर्मशाळा बांधतों. हा आमचा मंत्र, ही आमची रक्षा, व हीच आमची संपत्ति.’ तें ऐकून राजानें पाटलाला हांकून दिलें, व त्या गांवचे सर्व अधिकार, तो गांव व तो हत्तीहि त्यांसच देऊन टाकला.

१. “याप्रमाणे मघानें त्या जन्मीं अनेक पुण्यकर्में केली. त्यानें हे सात व्रतनियम अंगिकारले होते:-
२. आमरण मी आई बापांचें पोषण करीन.
३. आमरण कुटुंबांतील वडील माणसांचा मान राखीन.
४. आमरण मृदुभाषी असेन.
५. आमरण चहाडी करणार नाहीं.
६. आमरण मात्सर्याशिवाय गृहस्थाश्रम चालवीन; उदारपणें दानधर्म करणारा होईन.
७. आमरण सत्यवचन बोलेन.
८. आमरण क्रोधविरहित राहीन; व जर एकाद्या वेळीं क्रोध उद्‍भवला तर तात्काळ त्याला दाबून टाकीन.१
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
( १ हे नियम सक्क संयुत्तांतील तीन सुत्तांत सांपडतात. त्यांतील गाथा जशाच्या तशा कुलावक जातकांत घेतल्या आहेत. पण नियमांचा क्रम बदलला आहे. येथें ते सुत्तांला अनुसरून दिले आहेत. )
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel