वैदिक  वाङ्मयाचा काळ

१०३. ऋग्वेदांत ख्रिस्तापूर्वीं साडेचार हजार वर्षांच्या ऋचा असणें संभवनीय आहे. पण त्या स्वतंत्र नसून त्यांचा निकट संबंध सुमेरियन ऋचांशीं असावयास पाहिजे. ऋग्वेदांतील पुष्कळशा ऋचा सुमेरियन ऋचांवरुन घेतल्या आहेत असें जें डॉ० प्राणनाथ ह्यांचे म्हणणें, त्यांत बरेंच तथ्य असावें असें वाटतें. ज्या ऋचांत घोड्याचा संबंध येतो त्या ऋचा ख्रिस्ती शतकापूर्वीं अठराव्या किंवा एकोणिसाव्या शतकापलिकडे जाऊं शकणार नाहींत. त्यांपैकीं एलाममध्ये किती व सप्तसिंधु प्रदेशांत किती रचल्या गेल्या हें सांगता येणें शक्य नाहीं. तथापि बाबिलोनियन वाङ्मयाच्या मदतीनें वैदिक ऋचांचा थोडा बहुत इतिहास मिळवतां येणें शक्य आहे.

१०४. यजुर्वेद व अथर्ववेद सप्तसिंधूच्या प्रदेशांत रचले गेले यांत शंका नाहीं. त्यांचा काळ ख्रिस्ती शकापूर्वीं चौदाव्यापासून नवव्या शतकापर्यंत असावा. परिक्षित् राजाच्या सुसंपन्न राज्याचें अथर्ववेदांत आलेलें वर्णन वर दिलेंच आहे. अर्थांत हे श्लोक परिक्षित् राजा गादीवर आल्यावर रचले गेले असें सिध्द होतें. परिक्षित् राजाच्या काळाची बरीच चर्चा करुन हेमचन्द्र रायचौधरी यानीं वैदिक वाङ्‌मयास अनुसरून असा सिध्दांत काढला आहे कीं, त्याचा काळ ख्रिस्ती शकापूर्वीं नवव्या शतकापलीकडे जाऊं शकत नाहीं.१ अर्थात् अथर्ववेद परिक्षित् राजाच्या वेळीं पुरा झाला असला पाहिजे. त्याच्या पूर्वीं एक दोन शतकें यजुर्वैद व सामवेद हे तयार झाले असावेत.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(१ Political History of Ancient India, p. 16-17 )
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१०५. ब्राह्मणें, आरण्यकें व उपनिषदें यांचा काळ बुध्दापूर्वींचा समजला जातो. परंतु ही समजूत फार चुकीची आहे. गुणाख्य शांख्यायन हा बुध्दसमकालीन होता असें हेमचन्द्र रायचौधरी याचें म्हणणें. त्याच्या गुरुचा गुरु उद्दालक आरुणी हा विदेहाच्या जनक राजाचा समकालीन. म्हणजे जनक राजा बुध्दापूर्वीं दोन पिढया होता असें ठरतें. आणि शतपथ ब्राह्मण व बृहदारण्यक उपनिषद् यांत जी गुरुपरंपरा सांगितली आहे तींत सांजीवीपुत्र हा उद्दालकापासून पांचव्या पिढींतील ऋषि आहे. त्यावरुन बुध्दनंतर तीन पिढयांनी शतपथ ब्राह्नाण व बृहदारण्यक उपनिषद् रचलें गेलें असें सिध्द होतें.

१०६. ह्याला दुसरा एक चांगला आधार ऐतेरेय आरण्यकांत सांपडतो तो असा -

तदुक्तमृषिणा-
प्रजा ह तिस्त्रो अत्यावमीयुर्न्यन्या अर्कमभितो विविश्रे।
बृहध्द तस्थौ भुवनेष्वन्त: पवमानो हरित आ विवेशेति ।। ऋ० ८।१०१।१४
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel