रशियन क्रान्ति

५४. रशियन आणि हिंदी राजकीय चळवळींचा बराच संबंध दिसतो. १९०५ सालापूर्वी रशियांत बाँबचा प्रसार फार झाला होता. झारवर व बड्या बड्या ऑफिसरांवर बाँब टाकून त्यांचे खून करणार्‍या पुष्कळ गुप्त मंडळ्या त्या काळीं रशियांत अस्तित्वांत आल्या. त्यांचाच प्रतिध्वनि वंगभंगानंतर बंगाल्यांत उमटला; व त्याचे पडसाद आजलाहि ऐकूं येत आहेत. अशा तर्‍हेनें खून करण्यापासून गांजलेल्या जनतेची मुक्तता होणार नाहीं, हें बोल्शेव्हिकांचें ठाम मत. लेनिनसारखे पुढारी त्या मताचा जोरानें प्रसार करीत होते; तरी झारशाहीला कंटाळलेल्या तरुणांना त्यांचें म्हणणें पसंत पडेना. त्यांनी हें खुनाचें सत्र तसेंच चालू ठेवलें.

५५. इ.स. १९०५ सालीं रूसो-जपानी युद्धामुळें रशियांत जवळ जवळ दुष्काळाचीच परिस्थिती निर्माण झाली. अशावेळीं बोल्शेव्हिकांनी उचल करून देशभर सार्वत्रिक संप घडवून आणला. एक पाद्री पीटर्सबर्ग येथील बुभुक्षित लोकांना घेऊन झाराकडे अन्नाची याचना करावयास गेला असतां त्या नि:शस्त्र लोकांवर गोळ्या घालून झारनें त्यांची कत्तल केली. फ्रेंचांनी झारला मोठी रक्कम कर्जाऊ दिल्यामुळें सैन्याला समाधनांत ठेऊन सार्वत्रिक झालेला संप मोडतां आला. जिकडे तिकडे दडपशाही सुरू झाली, व गरीब लोकांच्या दु:खाला मर्यादा राहिली नाहीं. बोल्शेव्हिकांचें झारशाहीपुढें कांहीं चालत नाहीं, असें पाहून तरुण लोक निराश होऊन गेले. बाँबशाहीवरून त्यांचा विश्वास उडण्याऐवजीं तो अधिकच वाढला.

५६. परंतु आंतबट्टयाच्या व्यापारानें झारशाही ढिली होत जाऊन १९१७ सालीं ती आपोआपच ढांसळून पडली. रशियाचें धुरीणत्व एकाएकीं मध्यमवर्गाच्या हातीं आलें. केरेंस्की त्याचा पुढारी बनला. झारनें आपण होऊन राजिनामा दिला. पीटर्स-बर्ग येथें प्रजासत्ताक राज्याची स्थापना झाली. पण ती प्रजासत्ता टिकावी अशी? अमेरिकेनें जर कर्ज दिलें नाहीं तर केरेंस्कीचें राज्य चालावें कसें? अमेरिका त्या वेळीं जर्मनीविरुद्ध दोस्त राष्ट्रांना मिळालेली. तेव्हां रशियाला कर्ज द्यावयाचें म्हणजे रशियानें युद्धक्षेत्र सोडून मागें हटतां कामां नये अशा अटीवर. केरेंस्कीला अर्थातच ही अट मान्य करून कर्ज घ्यावें लागलें. परंतु रशियन शेतकरी लढाईला अत्यंत कंटाळून गेले होते. झार जसा राजिनामा देऊन मोकळा झाला, तसे तेहि आपापल्या बंदुका घेऊन आपल्या घरीं जाऊन लढाईपासून मोकळे झाले. आपल्या वक्तृत्वाच्या जोरावर लढाई चालू ठेवण्याचा केरेंस्कीचा उद्योग हास्यास्पद ठरला.

५७. ह्या संधीचा फायदा घेऊन लेनिन पुढें आला. पीटर्सबर्ग ताब्यांत घेण्यासाठीं लेनिनला मुळींच रक्तपात करावा लागला नाहीं. मास्को येथें तेवढा झारपक्षानें थोडासा विरोध केला. परंतु फारशा रक्तपाताशिवाय सर्व रशिया बोल्शेव्हिकांच्या हातीं आला. जमीनी शेतकर्‍यांच्या, गिरण्या मजुरांच्या, आणि लढाई बंद, ह्या तीनच वाक्यांत लेनिनचें सामर्थ्य सांठवलेलें होतें, असें म्हणण्यास हरकत नाहीं. लढाई तर बंद झालीच होती. आणि लढाईच्या वेळीं मिळालेल्या बंदुका व गोळ्या जमीनी आपल्या ताब्यांत घेण्याच्या कामीं शेतकर्‍यांनी उपयोगांत आणल्या. लेनिनचें वाक्य म्हणजे पडत्या फळाचीच आज्ञा असें त्यांस वाटलें असावें. आतां तेवढ्या गिरण्या मजुरांच्या ताब्यांत यावयाच्या होत्या. पण त्याबद्दल मजुरांना शंका राहिली नाहीं.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel