३७.  “वासिष्ठानें ‘नाहीं’ असें उत्तर दिलें. त्यावर भगवान् म्हणाला, ‘असें असतां त्रैविद्य ब्राह्मण ब्रह्मसायुज्यतेचा मार्ग दाखवतात हें विलक्षण नव्हे काय?’ वासिष्ट म्हणाला, ‘होय, भो गोतम.’ भगवान् म्हणाला, ‘मग ही ब्राह्मणांची अंधपरंपरा म्हणावयाची. हे वासिष्ठ, चंद्र आणि सूर्य यांना ब्राह्मण पहातात, त्यांची प्रार्थना करतात, स्तुति करतात, आणि त्यांना नमस्कार करतात. असें असतां त्यांच्या सायुज्यतेचा मार्ग ते दाखवू शकतील काय?’ वासिष्ठ म्हणाला, ‘नाहीं, भो गोतम.’
“भगवान् म्हणाला, ‘मग ज्या ब्रहम्याला ते पहात नाहींत, त्याच्या सायुज्यतेचा मार्ग ते दाखवूं शकतील हें शक्य नाहीं. उदाहरणार्थ, एकादा मनुष्य म्हणेल कीं, या प्रदेशांत जी अत्यंत सुखरूप तरुणी आहे तिच्यावर माझें प्रेम जडलें आहे. त्याला इतर लोक विचारतील कीं, बा मनुष्या, अशी सुन्दर तरुणी आहे तरी कोणच्या जातीची ? तिचें नांव काय, गोत्र काय, ती उंच आहे कीं ठेंगणी, तिची कांति कशा प्रकारची व तिचा पत्ता काय ? असें विचारलें असतां तो मनुष्य म्हणेल, तें कांहीं मला माहीत नाहीं. तर मग त्या माणसाचें बोलणें फोल ठरणार नाहीं काय ? दुसरा एकादा माणूस जेथें चार रस्ते मिळतात त्या ठिकाणीं एक जिना बांधण्यास आरंभ करील. त्याला लोक विचारतील कीं, हा जो तूं जिना बांधतोस तो कोणत्या प्रासादावर चढण्यासाठीं ? त्यावर तो म्हणेल कीं, तो प्रासाद मला माहीत नाहीं. अशा माणसाचें बोलणें फोल ठरणार नाहीं काय ? त्याचप्रमाणें ज्या त्रैविद्य ब्राह्मणांना ब्रह्मदेवाची मुळींच माहिती नाहीं, त्यांनी त्याच्या सायुज्यतेचा मार्ग सांगणें हें  व्यर्थ ठरत नाहीं काय ?’ वासिष्ट म्हणाला ‘होय, भो गोतम’.

३८.  “भगवान् म्हणाला, ‘हे वासिष्ठ, ही अचिरवती नदी पाण्यानें तुडुंब भरली आहे. एकादा मनुष्य ह्या बाजूला येऊन पलीकडल्या तीराला जाण्याच्या उद्देशानें प्रार्थना करील कीं, हे परतीरा, माझ्याकडे ये ! हे परतीरा, माझ्याकडे ये ! त्याच्या त्या प्रार्थनेमुळें (समोर दिसणारें) परतीर त्याच्याकडे येईल काय ?’ वासिष्ठ म्हणाला, ‘नाहीं, भो गोतम’. भगवान् म्हणाला, ‘ह्याच प्रमाणें, हे वासिष्ठ, ब्रह्मदेवाला युक्त अशा गुणांचा अंगीकार न करतां आणि ब्रह्मदेवाला न शोभण्यासारखे गुण अंगीकारून त्रैविद्य ब्राह्मण इंद्राची प्रार्थना करतात, वरुणाची प्रार्थना करतात, प्रजापतीची प्रार्थना करतात; परंतु या त्यांच्या प्रार्थनेमुळें ते ब्रह्मसायुज्यतेला जातील हें संभवत नाहीं.’

३९.  “पुन: भगवान् म्हणाला, ‘हे वासिष्ठ, एकादा मनुष्य परतीरीं जाण्याच्या हेतूनें ह्या कांठीं आला, व जर त्याला येथें घट्ट बांधून ठेवण्यांत आलें, तर तो परतीरीं जाऊं शकेल काय?’ वासिष्ठ म्हणाला, ‘नाहीं, भो गोतम.’ भगवान् म्हणाला, ‘ त्याच प्रमाणें, हे वासिष्ठ, पंचेंद्रियांचे पांच विषय इहलोकींचीं दृढ बंधनें आहेत. ह्या बंधनांनी त्रैविद्य ब्राह्मण बांधले गेले आहेत. ( म्हणजे ते ह्या पांच विषयांचा यथास्थित उपभोग घेत आहेत.) असें असतां ते ब्रह्मसायुज्यतेला जातील हें शक्य नाहीं.’
“पुन: भगवान् म्हणाला, ‘ हे वासिष्ठ, दुसरा एकादा माणूस ह्या अचिरवतीच्या कांठीं परतीराला जाण्याच्या उद्देशानें येईल, आणि डोक्यावरून पांघरूण घेऊन येथेंच निजेल. तो परतीरीं जाऊं शकेल काय?’ वासिष्ठ म्हणाला, ‘नाहीं, भो गोतम.’ भगवान् म्हणाला, ‘त्याचप्रमाणें, हे वासिष्ठ, कामच्छन्द, व्यापाद, स्त्यानामिद्ध (आळस), औधत्य (भ्रान्तचित्तता) आणि विचिकित्सा (शंका), हीं पांच बुद्धीचीं आवरणें आहेत. त्या आवरणांनी आवृत झालेले त्रैविद्य ब्राह्मण ब्रह्मसायुज्यतेला जातील, हें संभवत नाहीं.’

४०.  “पुन: भगवान् म्हणाला, ‘हे वासिष्ठ, आतां मी तुला हें विचारतो कीं, ब्रह्मा सपरिग्रह कीं अपरिग्रह ? सवैरचित्त कीं अवैरचित्त ? सव्यापादचित्त कीं अव्यापादचित्त ? संक्लिष्टचित्त कीं असंक्लिष्टचित्त ? वशवर्ती की अवशवर्ती ?’ वासिष्ठ म्हणाला, ‘भो गोतम, ब्रह्मा अपरिग्रह, अवैरचित्त, अव्यापादचित्त, असंक्लिष्टचित्त व वशवर्ती आहे.’ भगवान् म्हणाला, ‘हे वासिष्ठ, त्रैविद्य ब्राह्मण सपरिग्रह कीं अपरिग्रह ? सवैरचित्त कीं अवैरचित्त ? सव्यापादचित्त कीं अव्यापादचित्त ? संक्लिष्टचित्त कीं असंक्लिष्टचित्त ? वशवर्ती कीं अवशवर्ती ?” वासिष्ठ म्हणाला, ‘भो गोतम, त्रैविद्य ब्राह्मण सपरिग्रह, सवैरचित्त, सव्यापादचित्त, संक्लिष्टचित्त व अवशवर्ती आहेत.’ भगवान् म्हणाला, ‘तर मग, हे वासिष्ठ असे ब्राह्मण, अपरिग्रह, अवैरचित्त, अव्यापादचित्त, असंक्लिष्टचित्त आणि वशवर्ती ब्रहम्याच्या सायुज्यतेला जातील हें संभवत नाहीं.”
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel