१३२. आतां हा दुसरा श्लोक घ्या.

हाहाकृता द्विजाश्चैव भयार्ता वृषलार्दिता: |
त्रातारं अलभन्तो वै भ्रमिष्यन्ति महीमिमाम् ||५९||


(वृषलांनी पीडित, भयभीत होऊन गेलेले ब्राह्मण लोक कोण संरक्षक न मिळाल्यामुळें हाहा:कार करीत सर्व जगभर भटकत फिरतील.) हा प्रकार बौद्धांच्या चढत्या काळांत झाला असल्याचें आम्हाला तरी माहीत नाहीं. अशोकानें तर, श्रमणांबरोबर ब्राह्मणांचाहि मान ठेवावा व त्यांना दान द्यावें, असें आपल्या शिलालेखांत अनेक ठिकाणीं सांगितलें आहे. ब्रह्मदेशांत व सयामांत, जेथें ब्राह्मण मुळींच नव्हते तेथें, बौद्ध राजांनी ब्राह्मणांना आणून त्यांना वर्षासनें देऊन आपल्या पदरीं ठेवलें. आतां ब्रह्मदेशांत राजाश्रय नसल्यामुळें ब्रह्मी ब्राह्मणांची बरीच दुर्दशा झाली आहे. तरी पण पूर्वींच्या राजगुरूच्या व इतर कांहीं ब्राह्मणांच्या कुटुंबांना ब्रह्मदेशांतील बौद्धांकडून अद्यापिहि मदत मिळते. सयामांत तर त्यांना राजाश्रय आहेच आहे. सिंहलद्वीपांत जर एकादा सुशिक्षित ब्राह्मण गेला तर त्याचा चांगला मान राखण्यांत येतो, असा माझा स्वत:चा अनुभव आहे. तेव्हां बौद्धांच्या वेळीं कोणी त्राता न मिळाल्यामुळें ब्राह्मण जिकडे तिकडे हाहा:कार करीत भटकत फिरणार, असें म्हणणें विलक्षण नव्हे काय?

१३३. विपरीतश्च लोकोsयं भविष्यत्यधरोत्तर:|
एडूकान्पूजयिष्यन्ति वर्जयिष्यन्ति देवता: |
शूद्रा परिचरिष्यन्ति१ न द्विजान्यगसंक्षये ||६५||
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१ कुंभकोण – शूद्रा प्रभविष्यन्ति न द्विजा युगसंक्षये |
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आश्रमेषु महार्षीणां ब्राह्मणावसथेषु च |
देवस्थानेषु चैत्येषु नागानामलयेषु च ||६६||

एडूकचिहा पृथिवी न देवगृहभूषिता |
भविष्यति युगे क्षीणे तद्युगान्तस्य लक्षणम् ||६७||२
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
२ श्लोकांक कुंभकोण संस्करणाला अनुसरून दिले आहेत.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
( हा लोकसमाज वरचा खालीं व खालचा वर असा विपरीत होणार आहे. लोक एडूकांची पूजा करतील, व देवतांवर बहिष्कार घालतील. युगान्ताच्या काळीं शूद्र द्विजांची सेवा करणार नाहींत. महर्षींच्या आश्रमामध्यें, ब्राह्मणांच्या छत्रांमध्यें, देवस्थानांत, चैत्यांत व नागांच्या गृहांत, या सर्व ठिकाणीं ते सेवा करणार नाहींत. जेव्हां युग क्षीण होत जाईल, तेव्हां पृथ्वी एडूकचिन्हांनी अंकित होईल; देवळांनी भूषित होणार नाहीं. तें युगान्ताचें लक्षण समजावें.) ह्या श्लोकांत महर्षीच्या आश्रमांत, ब्राह्मणांच्या छत्रात, देवस्थानांत आणि चैत्यांत शुद्र लोक सेवा करणार नाहींत, असें लेखक म्हणतो. चैत्य म्हणजे बौद्धांचे स्तूप. अर्थात् ह्या लेखकाचा बौद्धांविषयी विरोध नाहीं. त्याला उलट वाईट वाटतें कीं, चैत्यांच्या परिचर्येला शूद्र मिळत नाहींत.

१३४. ‘आश्रमेषु महर्षीणां’ या श्लोकाचा संबंध एका भाषांतरकारानें ‘एडूकचिन्हा पृथिवी’ ह्या श्लोकाशीं लावला आहे. तेव्हां त्याचा अर्थ असा होईल कीं, ‘महर्षींच्या आश्रमांत, ब्राह्मणांच्या छत्रांत, देवस्थानांत, चैत्यांत व नागगृहांत पृथ्वी एडूकचिन्हांनी अंकित होईल; या ठिकाणीं ती देवगृहांनी भूषित रहाणार नाहीं.’ कोणचाहि अर्थ घेतला तरी एडूक म्हणजे बौद्धांचे चैत्य ठरत नाहीं. उलट बौद्धांच्या चैत्यांतच एडूक होणार असें हा लेखक म्हणतो.

१३५. आतां एडूक कोणते हें सांगण्याची आवश्यकता आहे काय ? मुसलमान लोकांच्या या देशावर प्रथमत: जेव्हां स्वार्‍या होऊं लागल्या, तेव्हां त्यांनी या देशांत मोठमोठाल्या मशीदी न बांधतां इदगे बांधण्यास सुरुवात केली. इदगा म्हणजे एक भिंत, जिच्या समोर नमाज पढतात. इदगा काय किंवा मशीद काय नुसत्या भिंती. तेथें देवतांना मज्जाव असावयाचाच. इदग्याच्या किंवा मशीदीच्या आसपास वाद्यें वाजवून किंवा अन्य प्रकारें आनंदोत्सव केला, तर त्याचा परिणाम काय होतो हें आजलाहि सर्वांस माहीत आहेच. तेव्हां हा अध्याय मुसलमानांच्या स्वार्‍यांनंतर लिहिला गेला, यांत मुळींच शंका नाहीं.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel