१७. एलामच्या दक्षिणेला असलेल्या बाबिलोनियन लोकांशीं ह्या आर्य लोकांची बरीच दोस्ती दिसते. उर् ( Ur ) आणि उम्मा ( Umma ) या शहरांत रहाणार्‍या लोकांचा ऋग्वेदांत बर्‍याच ठिकाणीं उल्लेख आहे. ‘ चित्रसेना इषुबला अमृध्राः सतोवीरा उरवो व्रातसाहाः ’ ऋ० ६।७५।९, ‘ ये आश्रमास उरवो वहिष्ठास्तेभिर्न इन्द्राभि वक्षि वाजम् ’ ऋ० ६।२१।१२, इत्यादि ऋचांतून ह्या उरु लोकांचीं वर्णनें व
‘ विश्वेभिरूमेभिरा गहि ’ ऋ० ५।५१।१, ‘ प्रथमास ऊमाः ’ ऋ० १०।६।७, ‘ अनु यं विश्वे मदन्त्यूमाः ’ ऋ० १०।१२०।१, इत्यादि ठिकाणीं उम्मामधील लोकांचीं वर्णनें सांपडतात;  आणि त्यांवरून आर्य लोकांचा ह्या शहरांतील लोकांविषयीं किती आदर होता याचें चांगलें अनुमान करतां येतें.

१८. पश्चिमेकडील मितज्ञु किंवा मितान्नि आणि दक्षिणेकडील उरु, ऊमा इत्यादिक शहरांतील बाबिलोनियन लोक यांच्यांशीं आर्यांचें सख्य असलें, तरी उत्तरेकडील त्यांच्याच पैकीं पर्शियन लोकांशीं त्यांचें हाडवैर होतें, असें ‘ सं मा तपन्त्यभितः सपत्‍नीरिव पर्शवः’ ऋ० १।१०५।८ या ऋचेवरून दिसतें. आवेस्ता ग्रंथांत इन्द्राचा उल्लेख दोन ठिकाणीं आला आहे; व तेथें त्याला दैत्य किंवा राक्षस म्हटलें आहे. देव म्हणजे कुकृत्यांत प्रवृत्त करणारे राक्षस; अहुर मज्दाच्या प्रार्थनेनें व यज्ञादिक साधनांनी त्यांना घालवून देऊन सुख कसे मिलवावें याचीं वर्णनें आवेस्तांत अनेक ठिकाणीं सांपडतात. यावरूनहि वरील विधानाला बळकटी येते.

१९. एका काळीं एलाममधील आर्य आणि पर्शियांतील आर्य मित्र व वरुण या देवतांची प्रार्थना करीत होते. पैकी मित्र म्हणजे सूर्य. त्याची उपासना भिन्न भिन्न रूपांनी त्या काळच्या सर्व लोकांत पसरली होती. वरुण आर्यांना एक वटणारा अतिप्राचीन कालचा एक पुढारी किंवा राजा असावा. एलाममध्यें इन्द्रानें आपलें राज्य स्थापित केल्यानें त्याचें महत्व वाढलें. पण त्यामुळें पर्शियन लोकांना तो अत्यन्त अप्रिय झाला असावा.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel