१८५. अदैवं दैवतं कुर्युरर्दैवतं चाप्यदैवतम् |
यमिच्छेयु: स राजास्याद्यो नेष्ट: स पराभवेत् ||२
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
संक्षिप्तमहाभारत, अनुशासन प० अ० २।६६;  कुंभकोण अनु० प० अ० ६८।१७. ह्या पर्वांत अ० ६८-७१ ब्राह्मणमहात्म्यावर आहेत, ते मुळांत पहावे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(ब्राह्मण अदैवाला दैवत आणि दैवताला अदैवत बनवतील; पाहिजे त्याला राजा करतील; जो नको असेल त्याचा पराभव होईल.) कांहीं वीस वर्षांमागें जेव्हां हा श्लोक श्री. चि. वि. वैद्य यांच्या संक्षिप्त महाभारतांत माझ्या वाचनांत आला, तेव्हां मला वाटलें कीं, बौद्ध आणि जैन श्रमणांच्या रागानें ब्राह्मणांनी लिंगाला देव बनवलें. पण आतां बर्‍याच विचाराअंतीं दिसून येतें कीं, शकांच्या स्वार्‍यानंतर काय किंवा पूर्वी काय ब्राह्मणांच्या अंगीं हें सामर्थ्य मुळींच नव्हतें.

१८६. इंद्रासारख्याला ब्राह्मणांनी केवळ निरुपायानें देव केलें. शक राजांनी आपलीच उपासना करण्यास लावलें असतें, तरी ब्राह्मणांनी त्यांची पूजा करण्यास कमी केलें नसतें. पण शक महादेवाचे भक्त असल्याकारणानें त्यांना आत्मपूजेपेक्षां आपल्या कुलदेवतेची पूजा विशेष महत्त्वाची वाटली, व ती त्यांना पाहिजे होती त्याप्रमाणें ब्राह्मणांनी उचलली. ती पचनीं पडते न पडते तोंच गुप्तांनी वासुदेवाला पुढें आणलें, व ब्राह्मणांनी त्याचीहि पूजा सुरू केली. एवढेंच नव्हे, तर त्या काळीं जेवढीं देवदैवतें होतीं त्या सर्वांवर पुराणें रचून आपला योगक्षेम नीट चालावा हाच काय तो धोपट मार्ग त्यांनी स्वीकारला. यज्ञ करून दक्षिणा मिळाली तरी ठीक, आणि कोणत्याहि दैवताची पूजा करून मिळाली तर ठीक, अशी त्यांची कायमची समजूत झाली असावी.

१८७. लोकमान्य टिळकांनी एके वेळीं,
प्रामाण्यबुद्धिर्वेदेषु साधनानामनेकता |
उपास्यानामनियम एतद्धर्मस्य लक्षणम् ||

अशी वैदिक धर्माची व्याख्या केली होती. त्याच्याहिपेक्षां
योगक्षेमो ब्राह्मणांना जायते येन केनचित् |
तदेव वैदिकं कर्म स धर्मो वैदिक: स्मृत: ||

अशी व्याख्या केली असती, तर ती विशेष शोभली असती. आणि वरच्या महाभारताच्या श्लोकाबद्दल

अदैवं दैवतं कुर्युर्लभेरन्यदि दक्षिणाम् |
राज्ञां प्रियाण्यासृजेयु: पुराणान्यपि चार्थिन: ||

असा श्लोक असता, तर तो इतिहासानुरूप म्हणतां आला असता.

१८८. ब्राह्मणांना ह्याबद्दल दोष देतां येत नाहीं. कां की, वेदकालापासून राजानुवर्तित्व हें त्यांचें शीलच बनलें होतें. ‘राजा कालस्य कारणम्’, ‘ना विष्णु: पृथिवीपति:’ इत्यादि म्हणी प्रसिद्धच आहेत. पण श्रमणांची गोष्ट अशी नव्हती. कष्टी जनतेसाठीं त्यांचे पंथ निघाले. लोकांमध्ये समता घडवून आणावी, हें त्यांचें मुख्य ध्येय. तेव्हां अशा प्रसंगीं पुढें येऊन त्यांनी या प्रकाराला विरोध करावयास पाहिजे होता. ब्राह्मण वाटेल त्या देवतेची पूजा करूं लागले, राजे लोक खांद्यावर शिवलिंग घेऊन फिरूं लागले, श्रमणांनी पाशुपतासारखा बीभत्स पंथ काढला, जातिभेदाला फांटे फुटूं लागले, अस्पृश्यांचा छळ होऊं लागला, तरी पण श्रमण स्वस्थ बसलेले! अशा परिस्थितींत आजकालच्या सामान्य माणसालाहि उद्वेग उत्पन्न झाला असता; पण त्या काळच्या श्रमणांना कांहींच विषाद वाटेना. त्यांच्या विहारांचीं इनामें चालू होतींच, राजे लोक त्यांना मानीत होते, आणि मध्यम वर्गांतील जनतेकडून यथास्थित भिक्षा मिळून चांगलें आदरातिथ्य होत होतेंच; मग शूद्र आणि चांडाल जर पिळून निघत असेल, व वाटेल त्या देवतांची पूजा होत असली, तरी ह्या सुखवस्तु श्रमणांना त्याची काय परवा?
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel