“दादा, तुला बक्षिस मिळालं ?”

“होय रंगा. ही बघ ढाल, हीं पदकं.”

“मला देशील का एक पदक ?”

“एक रे कां ? ही सारींच घे. माझं तें तुझंच आहे.”

“आणि हें रे काय रुमालांत ?”

“फुलांची माळ.”

“तूं पुढारी झालास वाटतं ?”

“मी तुझा भाऊ आहें.”

“कोणीं दिली माळ ?”

“गर्दीत कोणीं तरी घातली. माझं नव्हतं लक्ष.”

“आई, दादाला बघ किती पदकं ! “

“आई, तुझा आशीर्वाद म्हणून मी विजयी झालों.”

“बाळ, तूं पुण्याला गेलास म्हणजे कुस्त्या खेळत जाऊं नकोस नदींत जाऊं नकोस. मला तुझी नेहमीं काळजी वाटते.”

“आई. तुझा आशीर्वाद असला म्हणजे मी नेहमी सुखी असेन.”

“आई, दादा का खरंच पुण्याला जाणार ?”

“होय.” असे म्हणून आई रडूं लागली.

“हे काय आई ? रडूं नकोस. मी पुण्याला जाऊन हुशार होईन.”

“कल्याण, तुझे चुलते कठोर आहेत. तुझी काकू निष्ठुर आहे. तिला स्वत:च्या मुलांबाळांचीहि माया नाहीं.”

“अशी आई जगांत का असूं शकते ?”

“जगांत बाळ, सारे चमत्कार आहेत.”

“स्वत:च्या मुलांबाळांवर प्रेम न करणारा कधीं कधीं दुस-याच्या मुलांबाळांवर प्रेम करतो. असाहि चमत्कार होतो.”

“तुझ्या बाबतींत तो खरा ठरो.”

असें म्हणून आईनें कल्याणच्या पाठीवरून हात फिरविला. त्या सा-या पदकांपेक्षां तो आईचा हात त्याला सहस्त्र पटीनें अधिक मोलवान वाटला. पुण्याला गेल्यावर कोण फिरवणार असा पाठीवरून हात, असे त्याच्या मनांत आलें. आई आतां कामाला गेली. रंगा दादाचीं बक्षिसे घेऊन शेजारीं दाखवावयास गेला. आणि कल्याण माडीवर गेला. तो त्या खिडकींत बसला. ती फुलांची माळ त्याच्या हातांत होती. त्याने आतांपर्यंत त्या फुलांचा वास घेतला नव्हता. आतां त्याने त्यांचा वास घेतला. ती माळ त्याने आपल्या ट्रंकेत ठेवून दिली. गोड, सुगंधी, प्रेमळ माळ ! कल्याण जाणार होता म्हणून कितीजणांना तरी वाईट वाटत होते. त्याची शाळा बंद झाल्यापासून तो नेहमीं हिंडत असे. गरिबांच्या वस्तींत जाई. अस्पृश्यांच्या वस्तींत जाई. तेथील लहान मुलांना तो खाऊ देई. कल्याण दिसतांच तीं सारीं मुले त्याच्याभोवतीं जमत.

“काय आणलांत खाऊ ?”

“खारीक कीं वडी ?”

“गूळ-खोबरं असेल नाहीं तर ?”

असें तीं मुलें विचारीत. कल्याण त्या सर्वांचा आवडता होता.

एके दिवशीं वडिलांनीं त्याला हांक मारली.

“काय बाबा ?”

“येत्या शनिवारीं तुझी पुण्याला रवानगी करणार आहें. तिथं नीट अभ्यास कर. चुलत्याचं ऐकत जा.”

“अभ्यास करीन, नीट राहीन.”

“फार उनाडूं नकोस. नुसती तालीम करून पोट भरणार नाहीं.”

“मॅट्रिक होऊन तरी काय भरतं ? मी कांही नोकरीसाठीं नाहीं शिकूं इच्छित.”

“फाजिलपणं बोलूं नकोस ! “

“मनांतील विचार तुमच्यापासून कां लपवूं ?”

“तुझ्यापेक्षां मला अधिक समजतं. तयारी करून ठेव.”

“बरं.”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel