हरिणीनें सरबत केलें. सारीं प्यालीं. तिघें बोलत होतीं.

“संध्याताई. हा विश्वास अगदीं रागीट आहे.” हरिणी म्हणाली.

“तूं त्यांना सोशिक बनव, जरा शांत बनव.” संध्या हंसून बोलली.

“संध्याताई, ही हरिणीहि तशीच आहे-” विश्वासनें सांगितलें.

“तर मग जोडा अगदीं अनुरूप आहे तुमचा.” संध्या म्हणाली.

“संध्या व कल्याण यांच्यासारखा, होय ना ?” हरिणी हंसून म्हणाली. सारीं हंसलीं.

दुस-या दिवशीं जेलचें उत्तर आलें. “भेट देऊं. अन्नसत्याग्रह नाहीं.” असें पत्र होतें. संध्येचा जीव खालीं पडला. तिच्या तोंडावर आशा नाचूं लागली. उत्साह खेळूं लागला. डोळे एकदम हंसरे झाले, खेळकर झाले.

“संध्याताई, तुम्ही एकटया जाणार का विश्वास बरोबर येणार ?”

“मी एकटीच जाईन. उगीच खर्च कशाला वाढवा ? तेवढेच पैसे इथं कामाला येतील. वास्तविक मी सुध्दां जाणं योग्य नाहीं. ते पैसेहि इथं या मित्रांसाठीं देणें अधिक उचित झालं असतं. परंतु नाहीं मोह आवरत. जावंसं वाटतं. संध्या वेडी आहे हो.”

“आणि संध्याताई, मीहि वेडीच आहे. हा विश्वास मला बोलतो, तरी मी येतेंच कीं नाहीं ?”

“हरणे, कधीं ग मी तुला बोललों ?”

“कधीं रे बोलत नाहींस ? आणि चुकलं तर थापटया मारतोस.” असें म्हणून हरिणीनेंच विश्वासच्या पाठींत थापट दिली !

“तूं चुकतेस म्हणून मी देतों, परंतु तूं मला उगीचच्या उगीचहि देतेस. संध्याताई, पाहिलंत ना ?”

“खरंच का रे विश्वास थापट मारली ? माझ्या नव्हतं लक्षांत.”

“मीं मारलेली बरी तुझ्या लक्षांत राहते.”

“ती गोड असते म्हणून लक्षांत राहते, होय ना हरणे ?” संध्या म्हणाली.

“तुम्हांला अनुभव आहे वाटतं ? कल्याण मारकुटा आहे वाटतं ?”

हरिणीनें हंसत टोमणा मारला.

“हरणे, तो तालीमबाज होता.” विश्वास म्हणाला.

“परंतु आतां तुरुंगांत जाऊन तो अशक्त झाला असेल. नाहीं रे विश्वास ? नाहीं तर पूर्वीं माझा कल्याण कसा दिसे, जसं घवघवीत फूल.” संध्या म्हणाली.

हरिणी व संध्या दोघीं फिरायला गेल्या. विश्वास एकटाच घरीं हाता. दोघी मैत्रिणी खूप बोलल्या. मनांतील सुखदु:खें, आशानिराशा, भावि संसारांचे मनोरे सारें एकमेकींनीं एकमेकींना निवेदन केलें. हरिणी घरीं गेली. संध्या इकडे आली. परंतु ती आली तों विश्वास अंथरुणांत पांघरूण घेऊन झोंपला होता.

“काय हो विश्वास ?”

“ताप आला. चिरमित्र ! “

संध्या विश्वासजवळ बसली. तिनें त्याचें कपाळ चेपलें. त्याच्या अंगावर तिनें नीट पांघरूण घातलें.

“विश्वास, बराच आला हो ताप.”

“होईल कमी सकाळला.”

“तुम्ही काय खाल ?”

“कांहीं नको.”

“शाबूदाणा आणूं ? थोडी खीर करीन.”

“संध्याताई, किती तुम्ही कराल ? तुमची आमची ओळखसुध्दां फारशी नव्हती. किती एकदम तुम्ही एकरूप होतां ! तुमच्या जीवनांत परकेपणा नाहीं. कृत्रिमता नाहीं. सरळ स्वभाव. आम्ही सध्यां राजाप्रमाणं आयतं खात आहोंत व तुम्हांला राबवीत आहोंत. कुठल्या तुम्ही, कुठले आम्ही !”

“विश्वास, असं नका तुम्ही म्हणूं. कल्याणचे मित्र ते सारे माझे. ते मला जवळचेच आहेत. हो. असं तुम्ही मनाला लावून नका घेऊं. दुजाभाव नका मनांत आणूं. नाहीं तर मला वाईट वाटेल.”

“आज नकोच कांहीं खायला ?”

“मी मंडईंत जातें व फळं घेऊन येतें. कल्याणसाठींहि न्यायचींच आहेत. मी जाऊन येतें हं पटकंन्.”

संध्या मंडईंत गेली व फळांची करंडी घेऊन आली. तिनें दिवा लावला. मोसंबें सोलून त्याच्या फोडी तिनें विश्वासला दिल्या. रात्रीं त्याला प्यायला कढत पाणी तिनें दिलें. बाळ व संध्या दोघेंच जेवायचीं होतीं.

बाळ एके ठिकाणीं सभा होती, ती आटोपून आला जेवणें झालीं.

“विश्वास, तुम्ही बाहेर नका झोंपूं. मी तुमच्या बहिणीसारखी. वा-यावर नका निजूं. आंतच झोंपा. बाळहि आंत झोंपूं देत. आज थंडीहि आहे. तुम्ही बाहेर झोंपलेत म्हणून तर नाहीं ना ताप आला ? मी रोज सांगेन म्हणत असें. परंतु तुमचा संकोच पाहून मलाहि संकोच वाटे. संकोच शेवटीं संकट आणतो. नकोत हे संकोच, नकोत हे कृत्रिम संशय.”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel