“काय, वैनी ?”

तिघेंहि हंसलीं.

इतक्यांत आईनें हांक मारली. सारींजणें गेलीं.

“काय आई ?” कल्याणनें विचारलें.

“मग तूं नि संध्या जाणार का ?”

“हो, आई. परवां जाऊं. “

“रंगाचं काय ठरलं ?”

“तो पुढं येईल, आमचं कसं जमतं तें पाहूं.”

“कल्याण, तुम्ही मुंबईला जपा. संध्ये, तूं सुखांत वाढलेली. कसं होईल तुझं ?”

“आई, तुमच्या आशीर्वादानं सारं कल्याणच होईल.”

रात्रीं जेवतांना संध्याहि सर्वांबरोबरच जेवायला बसली. जणूं ती सून नसून माहेरवाशीणच होती. सासूबाई वाढीत होत्या. त्यांनीं संध्येच्या भातावर दूध वाढलें.

“आई, आम्हांला नाहीं वाढलंस तें ?” कल्याणनें हंसून विचारलें.

“अरे, तिला संवय आहे हो भातावर थोडं दूध घ्यायची. त्या दिवशीं सहज ती म्हणाली.” आई प्रेमानें म्हणाली.

“वैनी, मुंबईला भातावर दूध कोण वाढणार ?”

“तिचा कल्याण वाढील” आई म्हणाली.

रात्रीं मायलेंकरें किती तरी वेळ बोलत बसलीं होतीं. संध्येनें सुंदर गाणी म्हटलीं. त्या वेळीं कल्याणचे वडीलहि माडीवरून खालीं येऊन ऐकत बसले नि शेवटीं म्हणाले, “आनंदी मैना आहे. गुणी आहे पोर.”

ते गौरवाचे शब्द उच्चारून ते पुन्हां वर गेले. सर्वांना आश्चर्य वाटलें. संध्येनें मुक्यांनाहि वाचा फोडली.

दुस-या दिवशीं कल्याण नि संध्या उडगी गांवीं गेलीं. संध्येच्या आईचा निरोप घ्यायचा होता. संध्येच्या आईनें हातांतील बांगडया तिला दिल्या. पातळें दिलीं, पोलकीं दिलीं. अंथरुण, पांघरुण, कांहीं भांडी-सारें दिलें. जणूं ती माउली मुलीचा संसार मांडून देत होती. आणि शेवटीं सद्गदित होऊन म्हणाली:

“तुम्ही दोघं एकमेकांना जपा. मोठया शहरांत आतां राहणार. संध्ये, नीट हुशारीनं राहा. प्रकृतीला जपा. कधीं कांहीं लागलं सवरलं तर कळवीत जा. तुझ्या आईला जोंवर देतां येईल, तोंवर देत राहील हो बाळ.”

संध्येचे डोळे भरून आले. तिनें अनु व शरद् यांच्या पाठीवरून हात फिरविला. ती म्हणाली, “आईला त्रास नका देऊं. भांडूं नका. आईला पोथी वाचून दाखवीत जा. मी गोष्टींचीं पुस्तकं पाठवीन. गोड गोष्टींचीं. तीं आईला वाचून दाखवा.”

“ताई, चित्र असलेलीं पुस्तकं पाठव.”

“हो. पाठवीन.”

“आणि आम्हांला मुंबई पाहायला केव्हां नेशील ?”

“नेईन हं. पुढं नेईन.”

सर्वांचा निरोप घेऊन पुन्हां दोघं सुपाणीला आलीं ! आणि मुंबईला जाण्यासाठीं दुस-या दिवशीं निघालीं. कल्याणची आई ! ती त्यांना काय देणार ? तिच्याजवळ कांहींहि नव्हतें. तिनें त्यांना आशीर्वाद दिला. तिला फार वाईट वाटलें. पहिली सून. परंतु तिच्या अंगावर घालायला एकहि दागिना तिच्याजवळ नव्हता. ईश्वराची इच्छा. आणि प्रेमळ रंगालाहि रडूं आवरेना. पित्याचे डोळेहि निरोप देतांना ओले झाले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel