“विश्वास, अरे खरोखरच तो कानडी शब्द आहे. तुमच्या मराठींत किती तरी भाज्यांचीं नांवं कानडी आहेत. आम्हीं कानडी लोकांनीं तुम्हांला खाण्याची संस्कृति दिली. आम्हीं भाज्यापाले दिले. तुमची भाषा समृध्द केली.”

“आणखी काय दिलंत ?”

“आम्हीं तुम्हांला खेळ दिले. लहान मुलांचीं गाणीं दिलीं. एडिक बेडिक दामाडू व आटक माटक चन्ने चाटक हीं गाणीं व हे खेळ आमचेच. दिवा लावून मुलाला तीट लावतांना अडगुळं मडगुळं गाणं महाराष्ट्रीय माता म्हणतात तें कानडीच.”

“संध्ये, याचा अर्थ काय, माहीत आहे ? कानडी बायकांनीं महाराष्ट्रीय वीर पसंत केले. महाराष्ट्रीयांशीं लग्नं करून त्या महाराष्ट्रात आल्या. येतांना त्यांनीं आपलीं गाणीं बरोबर आणलीं. मुलांना खेळवतांना तीं गाणीं त्या म्हणूं लागल्या. “कानडीनं केला मराठी भ्रतार” हा तुकारामाचा चरण उगीच नाहीं. आम्ही महाराष्ट्रीय तुम्हां कर्नाटकी स्त्रियांना आवडत असूं, हीच गोष्ट खरी.”

“विश्वास, भाईजी एकदां म्हणाले कीं, मागं महाराष्ट्रांत चौदाव्या शतकांत दुर्गादेवीचा दुष्काळ पडला. बारा वर्षं तो दुष्काळ सतत होता. त्यावेळीं महाराष्ट्रांतले हजारों लोक घरंदारं सोडून खालीं कर्नाटकांत आले व कर्नाटकांतच राहिले. तिथं मग त्यांनीं लग्नं केलीं; संसार मांडले. परंतु पुढं पुन्हां महाराष्ट्रांत ते गेले. अर्थात् कानडी बायको बरोबर घेऊन ते गेले. आणि त्यामुळं ही कानडी संस्कृति महाराष्ट्रांत आली. भाज्यापाले, मुलांचे खेळ, गाणीं सारं आलं. तुम्ही दुष्काळी लोक कर्नाटकांत आलेत. कर्नाटकी स्त्रियांनीं तुमची कींव केली. तुमचे संसार त्यांनीं मांडले. आणि विश्वास, महाराष्ट्राची उगीच ऐट नको सांगूस. तुमचे अटकेवर झेंडे गेले. परंतु घोडे कुठले होते ? “

“कुठले म्हणजे ?”

“अरे, तीं भीमथडी घोडीं होतीं. माझ्या गांवचीं. अजूनहि आमच्याकडचीं घोडीं कणखर म्हणून प्रसिध्द आहेत.”

“संध्ये, तूं वेडी आहेस. अग, भीमथडी घोडीं म्हणजे पुणें जिल्ह्यांतल्या भीमथडी तालुक्यांतील. तुझ्या गांवच्या भीमानदीकांठचीं नाहींत कांहीं.”

“नाहीं कशीं ? आमच्याकडचींच घोडीं भीमथडी-भीमेच्या तीरचीं म्हणून प्रसिध्द आहेत.”

“संध्ये, जाऊं दे. घोडीं तुमच्याकडचीं कबूल; परंतु वर कोण बसले ? मराठी वीरच ना ?”

“विश्वास, काल रात्रीं जेवतांना तुला भाजी आणखी हवी होती. होय ना ?” एकदम आठवण होऊन संध्या म्हणाली.

“परंतु रंगा म्हणाला, मीं पातेलं उष्टं केलं. मग काय करणार ? काल माझ्या तोंडाला थोडी चव होती.”

“विश्वास, रंगानं युक्ति केली. उष्टी केली असं म्हटलं म्हणजे तूं घेणार नाहींस. उष्टी असली तरी चालेल असं तूं म्हणतास, म्हणजे रंगाची जिरली असती. आमची आजी होती. तिची एक गंमत सांगूं का ? एकदां कसली तरी पंगत होती आमच्याकडे. एक भाजी फारच छान झाली होती. लोक सारखी तीच मागायचे. भाजी संपत आली. इतक्यांत आजी मागीलदाराहून ओरडली,
“हड्  हड् ! अरे, कुत्रं शिवलं पातेल्याला. भाजींत तोंड घातलं. कुठून आलं मेलं ? तुमचं लक्ष कसं नाहीं कुणाचं ? हड् मेल्या.” मंडळींनीं तें शब्द ऐकले. ते काय काय म्हणून विचारूं लागले. शेवटी आजीनं येऊन सांगितलं कीं, “काय करणार ? कुत्रं शिवलं भाजीला.” लोक म्हणाले, “त्यालाहि ती आवडली वाटतं. त्यालाहि तिचा मोह सुटला. फार छान होती आजची भाजी.” अशी हो आजी मोठी शहाणी, समयसूचक.”

“संध्ये, तूं आजीची फार लाडकी होतीस, होय ना ?”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel