कल्याणला नाहीं म्हणवेना. देवाधर्मावरील त्याचा विश्वास उडाला होता. कोणी एखादी अतर्क्य शक्ति ह्या विश्वाचा पसारा चालवीत आहे हा विचार त्याला हास्यास्पद वाटे. परंतु तो आईला नकार देऊं शकला नाहीं. आईच्या श्रध्देला मीं कां हंसावें ? ज्या दिवशीं आईला देवाची जरूर वाटणार नाहीं, त्या दिवशीं तिचा देव आपोआप दूर होईल. कल्याण उठला व पूजा करूं लागला. तो भक्तीनें पूजा करीत नव्हता, परंतु नीटनेटकी करीत होता. त्यानें सुंदर रीतीनें फुलें लाविलीं. मधूनमधून दूर्वा, तुळशी ठेविल्या. त्या पूजेंत सौंदर्य-दृष्टि होती; कला होती. परंतु भक्तीचा आत्मा नव्हता.

पूजेनंतर सारीं जेवायला बसलीं. पिता बोलत नव्हता. थोडें जेवून तो उठून गेला. रंगा व कल्याण बोलत बोलत जेवत होते. आईच्या हातची कढत कढत भाकरी कल्याण खात होता. भाकरी तीच. परंतु भावनेला अर्थ आहे. तुरुंगांतील भाकरी वजनानें अधिक असेल. परंतु आईच्या हातचें प्रेम मिसळलेली ती भाकरी, तिचें वजन किती असेल ? तिच्याशीं कोणत्या भाकरीची बरोबरी होईल ? भावनेनें प्रचंड कार्ये होतात.

आई आतां जेवायला बसणार होती. जेवायला बसण्याआधीं ती देवाला फुलें तुळशी वाहायला गेली. किती सुंदर दिसत होती आजची पूजा ! आईला समाधान वाटलें. फुलें वाहून ती जेवायला आली.

“कल्याण, किती मनापासून तूं केली आहेस पूजा ! नाहीं तर रंगा कशीं तरी देतो फुलं ठेवून.” आई म्हणाली.

“परंतु आई, दादानं नमस्कार नाहीं केला. पूजा करतांना इन्किलाब जिन्दाबाद गाणं म्हणत होता ! मी पूजा करतांना स्तोत्रं म्हणतों. नमस्कार करतों.”

“अरे, दादाचं गाणंहि देवाचं असेल.”

“दादा, तें देवाचं होतं का रे गाणं ? “

“लोकांचे संसार सुखी करायचा तो नवीन मंत्र होता.”

“मंत्र तर संस्कृतांत असतात.”

“अरे, मंत्र सर्व भाषांतून असतात.”

“होय का ग आई ? “

“अरे, सर्वांचा धर्म असतोच. त्यांच्या त्यांच्या भाषेंत असतीलच मंत्र.”

“आई, आतां पोटभर जेव.” कल्याण म्हणाला.

“बाळ, आधींच पोट भरलं आहे. तुला पाहून पोट भरलं. तूं पत्रसुध्दां घरीं पाठवलं नाहींस. पाठवलंस तें त्या संध्येकडे. ती मुलगी खुशाली सांगायला आली. घरीं रे कां नाहीं पत्र पाठवलंस ?”

“बाबांनीं तें तुला थोडंच वाचून दाखवलं असतं ?”

“तुला माहीत होती वाटतं घरची स्थिति ?”

“आई, संध्येलासुध्दां खुशाली कळवायला हवी होती. तुम्ही कोणी संध्येकडे गेलां नसतां; पण ती तुमच्याकडे येईल अशी मला खात्री होती. शिवाय ही संध्या कोण वगैरे उगीच शंका घेता तुम्ही बसलां असतां. आई, तुझी का मला आठवण येत नव्हती ?”

“कल्याण, कोण रे ही संध्या ?”

“उडगी गांवची मुलगी.”

“रंगानं थोडीशी सांगितली तिची हकीकत. तिचं अजून लग्न व्हायचं आहे वाटतं ?”

“हो.”

“कल्याण, तूं कधीं करणार लग्न ?”

“लग्न करून राहूं कुठं, खाऊं काय ?”

“इथं घरींच राहा.”

“नाहीं आई. मी इथं नाहीं राहणार. मी तिकडे मुंबईला जाणार. कामगारांत राहणार. चळवळ करणार.”

“मला नाहीं हो कल्याण, तुमच्या चळवळी समजत. कुठंहि राहा. सुखी असा म्हणजे झालं.”

“आई, मी जरा जाऊन झोंपतों.”

“झोंप; गाडीचं जागरण असेल.”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel