कल्याण झोंपला. तिस-या प्रहरीं आईने कांहीं खायला केलें होतें तें खाऊन रंगा व कल्याण फिरायला गेले. गांवांतील तरुण मित्रमंडळहि बरोबर होतें. कल्याण त्यांना तुरुंगांतील गोष्टी सांगत होता. नवीन विचार देत होता. क्रांति काय, संस्कृति काय तें सांगत होता. ते मित्र तृषिताप्रमाणें तें विचारांचें अमृत पीत होते. कुस्ती खेळणारा कल्याण असें बोलायला, सांगायला कसा लागला तें मनांत येऊन त्यांना आश्चर्य वाटलें.

“कल्याण, तूं का आतां पुढारी होशील ?”

“तुझे किती विचार, किती वाचन--”

“आम्हांला कांहीसुध्दां कळत नाहीं.”

“तूं आम्हांला शिकवीत जा. सोपं करून सांगत जा.”

“कल्याण, आम्हीहि तुझ्या क्रांतींत येऊं.”

“कधीं होईल ही क्रान्ति ?”

“अरे, ती का एकदम होत असते ? असे लाखों कल्याण निघायला हवेत. नाही का रे ?”

“कल्याण, तूं का भाई झालास ?”

“परंतु त्याच्या डोक्यावर अजून टोपी आहे.”

“टोपी नसणं म्हणजे का रे कल्याण, भाई होणं ?”

मित्र बोलत होते. परभारें उत्तरें देत होते. कल्याण म्हणाला, “भाई तो, जो दु:खी दरिद्री जनतेचा भाई झाला. त्यांच्यासाठीं झगडायला, त्यांचे संसार सुखाचे करायला उभा राहिला. मग डोक्यावर टोपी असो वा नसो. धोतर असो, कीं पायजमा असो. विचार व आचार कोणते यांना महत्त्व आहे. पोषाखाला नाहीं. भाई व्हायची माझी इच्छा आहे. मी पुढारी नाहीं. गरिबांचं राज्य व्हावं म्हणून लढायची तळमळ असलेला मी एक सैनिक आहें. गांवोगांव अशीं नवयुवक मंडळं हवींत. जो कसील, त्याची जमीन; शेतसारे कमी करा. श्रमणारा तेवढा एक. ना हिंदु, ना मुसलमान; ना स्पृश्य, ना अस्पृश्य; अशा विचारांनीं भरलेलीं तरुण पथकं गांवोगांव पाहिजेत. अशी लाखों सेना तयार झाली पाहिजे. होईल. अशी सेना तयार होईल; अशा सेनेंतील मी एक सैनिक. समजलं ना ?”

“कल्याण, तूं इथं नाहीं राहणार ?”

“नाहीं; मी मुंबईला जाईन. तिथं क्रान्तीचे धडे घेईन.”

“आम्हांला गाणीं पाठवीत जा. पुस्तकं पाठवीत जा.”

“पाठवीन.”

अंधार पडूं लागला व मित्र घरीं जायला निघाले. कल्याण व रंगा घरीं आले. आई वाटच पाहात होती. रात्रींचीं जेवणें झालीं. मागील दारच्या अंगणांत कल्याण, रंगा, आई, इतर मित्र सारीं बसलीं होतीं. तुरुंगांतील कांहीं गोष्टी कल्याण आज सांगणार होता, म्हणून मित्रहि आले होते. कल्याणला किती तरी करुणगंभीर अनुभव तुरुंगांत मिळाले होते. किती करुण कठोर दृश्यें. कल्याणच्या गोष्टी ऐकून मंडळी कधीं रडूं लागे, कधीं संतापे. एक गोष्ट तर फारच हृदयद्रावक होती.

“आई, त्या वेळेला मी आजारी होतों. तुरुंगांतील दवाखान्यांत होतों. माझ्या खोलीपलीकडील एका गजांच्या खोलींत एक रोगी होता. तो क्रिमिनल होता. त्याला घटसर्प झाला होता. शस्त्रक्रिया करूं असं अधिकारी म्हणत होते. परंतु त्याला ना मिळालं औषधं, ना कांही. त्याला गिळवत नसे, पिववत नसे. मरायच्या आधीं दोनचार दिवस त्याला दूध देऊं लागले. तो रोग स्पर्शजन्य असतो. म्हणून त्याला अलग ठेवण्यांत आलं होतं. आमच्यांतील एक राजकीय कैदी त्याच्या शेजारीं रात्रीं असे; तो त्याला पाणी देई. आई, ती काळरात्र मी कधींहि विसरणार नाहीं. त्या रोग्याला पाणीहि पिववेना. घुट् घुट् सारखा आवाज होई. श्वासोच्छ्वासाची अडचण होई. मध्यरात्र असेल. तो घुट् घुट् आवाज आणि त्याच वेळेला तिकडे बोका मांजरीचीं पिलं मारीत होता. म्यँव, म्यँव, गुर्र असा त्या बोक्याचाहि भेसूर आवाज येई. एकीकडे रोग्याचं घुट्, तिकडे बोक्याचं घुर्र; आणि पिलांचं केविलवाणं ओरडणं. जणूं सर्वत्र मृत्यु येऊन बसला होता. आणि आई, त्या दिवशीं माझ्याहि मनांत मरणाचे विचार येत होते. आपल्या जीवनाचा कांहीं उपयोग होईल का, कशाला भूभार होऊन जगावं, असं माझ्या मनांत येत होतं. मनांत मरण, सभोंवतीं मरण. भीषण रात्र ! सकाळीं मांजरीचीं मेलेलीं पिलं तिथं पडलेलीं होतीं; आणि क्रिमिनलनंहि राम म्हटला होता.

“परंतु सर्वांत दु:खाची गोष्ट मरणानंतर आहे. त्याच्या घरीं त्याच्या आजाराचं पत्र गेलेलं होतं. आणि ज्या दिवशीं तो मेला, त्याच दिवशीं सकाळीं त्याची घरची मंडळी त्याला भेटायला आली. परंतु ज्याला भेटायला आली तो मरून पडला होता ! त्याच्या तोंडावर राजकीय कैद्यांनी तुळशीपत्र ठेवलं होतं. मृत देह तिथं होता. घरच्या मंडळींना ती वार्ता सांगण्यांत आली. बिचारे आशेनं आले होते.

“त्या प्रेताजवळ ती मंडळी बसली. बायको टाहो फोडून रडूं लागली. मुलं रडू लागलीं. पत्नी पतीच्या तोंडावरून हात फिरवीत होती. ती रडत होती. तें तोंड कायमचं मुकं झालं होतं. घरघर कायमची थांबली होती. मुलं बापाचा हात हातांत घेत. तो हात थंडगार होता. तीं किती वेळ रडणार व शोक करणार ?

“जा आतां तुम्हीं” शिपाई म्हणाला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel