कल्याणचा आवाज जरा मिळतें घेणारा होता. त्याच्या आवाजांत आर्जव होतें. मन वळवण्याचा गुण होता. विश्वास रागीट, तल्लख. त्याच्यानें हें जमले नसते. कल्याण तेल घेऊन आला व दिवा लागला.

“ये कल्याण, आईच्या हातची भाकरी खाऊं.”

“विश्वास, इथं राहायचा मला कंटाळा आला. मी मुंबईला जातों. तिथं काहीं तरी धडपड करीन. थोडं समाधान तरी मिळेल.”

“तूं गेल्यावर इथं मी एकटा काय करूं ?”

“आपण दोघे मुंबईला जाऊं.”

“परंतु मुबईला तरी राहायचं कुठं ? खायचं काय ?”

“आपण कांहीं दिवस थांबूं. मुंबईत जर संप करायचं ठरलं, तर त्या वेळीं आपण जाऊं. संपांतील कामाचा अनुभव येईल.”

“पण इथून जाण्यापूर्वी खोलीचं भाडं द्यावं लागेल. दुकानदाराचे पैसे चुकते केले पाहिजेत. जायलाहि भाडयासाठी पैसे हवेत. पैशाशिवाय काय करायचं ?”

“मला वाटतं कीं, बिनतिकिटानं जावं. धाडस करावं. जरा अडवतील, मग सोडतील.”

“कांहीं हरकत नाहीं. करूं प्रयोग.”

असें बोलत दोघे मित्र अंथरुणावर पडले. वाचीत वाचीत झोंपीं गेले. परंतु पहाटे कल्याण उठला. त्यानें संध्येला एक सुंदर पत्र लिहिलें. काय काय लिहिलें होतें ? तें त्यालाच माहीत.

आणि वर्तमानपत्रांत एके दिवशीं वार्ता आली. मुंबईला प्रचंड संप होणार होता. त्याची तयारी सुरू झाली. प्रचार सुरू झाला.

कल्याण व विश्वास यांचीं मनें मुंबईला जाण्यासाठीं तडफडूं लागलीं. आणि मुंबईच्या कार्यकर्त्यांकडून त्यांना बोलावणेंच आलें. दोघांचा उत्साह वाढला. परंतु पैसे नव्हते जायला. खोलीचें भाडें, दुकानदाराचे पैसे ?

परंतु संध्येकडून दहा रुपये आले. आणि कुपनांत काय लिहिलें होतें ? “आणखी दहा लौकरच धाडतें. चिंता नको करूं.” कल्याणचें मन उचंबळून आलें.

“कल्याण, तूं संध्येला पत्र लिहिलं होतंस ?”

“हो.”

“लग्न न करतांच संध्येला लुटीत आहेस ! “

“आमचं मनोमय लग्न लागलं आहे. मी तिच्या मनांत सदैव आहें.”

“आणि ती तुझ्या आहे का ?”

“आहे, आहे.”

“कल्याण, मग तुम्ही लग्न कां नाहीं करीत ?”

“वेळ आली म्हणजे होईल.”

संध्येकडून आणखी दहा रुपये आले. खोलीचें भाडें व दुकानदाराचे पैसे देण्यांत आले. खोलींतील पुस्तकें व सामान एका मित्राच्या घरीं ठेवून कल्याण व विश्वास मुंबईला जायला निघाले. ते आगगाडींत बसले. मुंबईच्या कामगारांची ते चळवळ पाहणार, त्या लढयांत लढणार ! मुंबईचा संप म्हणजे लाठीमार, अश्रुवायु, गोळीबार ! रोमहर्षण प्रसंग. आणि स्वत:च्याच डोक्यांत लाठी बसली तर ? अंगांत गोळी घुसली तर ? तर काय ? त्या वेळीं इन्किलाबची गर्जना करूं. दोघे मित्र कल्पनांत रंगून गेले होते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel