१७
करुण प्रसंग
ताराचंद रामनाथ दवाखान्यांत संध्येच्या बाळंतपणाची सोय करून ठेवण्यांत आली होती. संध्येची आई तिकडे हिंवतापानें आजारी होती. माहेरीं तरी कोण करणार बाळंतपण ? शिवाय खेडेगांवांत डॉक्टर वगैरे लागलाच तर एकदम कोठून मिळणार ? हें पहिलें बाळंतपण; शिवाय संध्या कल्याणच्या जवळ राहूं इच्छित होती. त्याला सोडून कोठेंहि जावयास ती तयार नव्हती. म्हणून पुण्यालाच व्यवस्था करून ठेवण्यांत आली होती.
एके दिवशीं कल्याण संध्येला घेऊन त्या दवाखान्यांत गेला. संध्येची प्रकृति वगैरे पाहण्यांत आली.
“अद्याप कांहीं दिवस जातील.” मुख्य सूतिका म्हणाली.
“इंजेक्शन्स वगैरे कांहीं द्यायला हवींत का ?” कल्याणनें विचारलें.
“दिलीं तर बरं; अंगांत रक्त जरा कमी आहे. कांहीं इंजेक्शन्स द्यावीं. मी नांवं लिहून देतें. तीं इंजेक्शन्स द्या.” ती सूतिका म्हणाली.
कल्याण व संध्या टांग्यांत बसून निघालीं. वाटेंत कल्याणनें तीं इंजेक्शन्स विकत घेतलीं.
“उगीच खर्च.” संध्या म्हणाली.
“या वेळीं नाहीं करायचा, तर केव्हां ?” तो म्हणाला.
“कोण देईल इंजेक्शन् ?” तिनें विचारलें.
“हरणी देईल. तिचा हात हलका आहे.”
“तिला येतं देतां ?”
“हो; ती आपल्या आजीला नेहमीं देत असे.”
“हरणीला भय नाहीं वाटत ?”
“भय कसचं ? धरायचा हात व सुई हळूच टोंचायची.”
“माझ्यानं नाहीं होणार हो असलं काम ! “
“तूं इन्जेक्शन् देणार नाहींस, परंतु घेशील ना ?”
“हवीं घ्यायला म्हणतोस, तर घेईन.”
टांगा घराजवळ थांबला. संध्या हळूहळू जिना चढत होती. एके ठिकाणीं ती बसली. थोडया वेळानें पुन्हां उठून वर आली. ती अंथरुणावर पडून राहिली.
विश्वासनें हरिणीची आज बरीच वाट पाहिली. शेवटीं तो बोलवायला निघाला. इतक्यांत दारांत हरिणी उभी.
“कुठं निघालास, विश्वास ?”
“तुलाच बोलवायला येत होतों. तूं आलीस. एक काम झालं. परंतु दुसरं एक काम आहे. हरणे, तुझी सायकल घेऊन मी जातों
हं. लौकरच येईन.”
“माझी नको सायकल नेऊं. माझ्यां दादानं ती पाहिली, तर तो मला बोलेल. नको नेऊं हं, विश्वास.”
“दादा का रस्त्यांतून सर्वांच्या सायकली बघत जातो ?”
“परंतु तुझी बघेल.”