आणि शेतकरी उचंबळून स्फूर्तीनें टाळयांचा गजर करी.

तालुक्यांत हिंडतांना ठिकठिकाणच्या तरुणांशीं कल्याण व विश्वास यांनीं ओळखी केल्या होत्या. त्यांचीं नांवें त्यांनीं घेतलीं होतीं. त्यांच्याशीं पुढें परिचय वाढवूं असें ते मनांत म्हणत होते. परिषद् संपवून ते दोघे पुण्याला परत आले. परंतु पुण्याला निराळीच परिस्थिती उभी होती. मॅट्रिकच्या विद्यार्थ्यांना उद्देशून काढलेल्या पत्रकावर विश्वासची सही होती. त्याला कॉलेजांतून काढून टाकण्यांत आले होतें. कोणत्याच कॉलेजांत त्याला प्रवेश मिळणार नव्हता. आतां घरीं वडील राहूं देतील कीं नाहीं हा प्रश्नच होता. शेवटीं जून महिना आला. निम्मा संपलाहि.
“विश्वास, तुला कॉलेजांत घेणार नाहीं हें खरं का ?” एके दिवशीं वडिलांनीं विचारलें.

“हो.”

“कोणत्याच नाहीं ?”

“कोणत्याहि नाहीं.”

“तुला मीं सांगितलं होतं. तूं ऐकलं नाहींस.”

“तसं होईल असं मला वाटलं नव्हतं.”

“तूं माफी लिहून दे.”

“माफी कशाची ? मीं का गुन्हा केला ?”

“विश्वास, तुझीं लक्षणं ठीक नाहींत. या घरांत राहायचं असेल तर मी सांगेन त्याप्रमाणं वागलं पाहिजे. नाहीं तर निघून जा. एकामुळं सर्वांवर संकट नको. तुझी होईल देशभक्ति, परंतु आमच्या मानेला लागतील फांस, समजलास ? जा. तुझं तोंड पुन्हां दाखवूं नकोस. या घरांत राहायचं असेल तर माझं ऐकलंच पाहिजे. परंतु तुला आतां शिंगं फुटलीं. मोठे देशभक्त झालेत. महिनाभर भिका-यासारखा तिकडे हिंडत होतास. वाटेल तिथं खाल्लं असशील. धर्म तुला नकोसा झाला. जानवंहि अलीकडे दिसत नाहीं. अरे, कांही मर्यादा ?

“हा निघालों. तुमच्या पायां पडूं द.”

“हे सोंग कशाला ?”

“आजपर्यंत जें केलंत त्याविषयींची ही कृतज्ञता.”

विश्वास घरांत गेला. आईला भेटला. ती सावत्र आई, परंतु सख्ख्या आईहूनहि तिचें विश्वासवर अधिक प्रेम. तीं या घरांत प्रथम आली तेव्हां विश्वास लहान होता. तिनें त्याला आपल्या पायांवर दूध पाजलें. त्याला वाढवलें; तिचें त्याच्यावर अलोट प्रेम होतें. तिला हुंदका आवरेना.

“विश्वास, मधून मधून येत जा. भेटत जा.” ती रडत म्हणाली.

विश्वास बाहेर पडला. कल्याणच्या खोलींत तो राहायला गेला. दोघांचा वनवास सुरू झाला. ते दोघे मित्र कधीं जेवत, कधीं उपाशीं राहात. भूक लागली तर एखादें पुस्तक वाचीत बसत. इतर तरुण येत. त्यांच्याजवळ ते चर्चा करीत. विद्यार्थ्यांचीं अभ्यासमंडळें घेत. पुण्याजवळील एका खेडयांत कामगारांत संघटना करायला जात. पुण्यांतील छापखान्यांतील कामगारांत जात. त्यांचे साक्षरतेचे वर्ग चालवीत. कोणाला इंग्रजी शिकवीत. परंतु कधीं कधीं पोटांत मात्र पाण्याशिवाय कांहीं नसे.
एके दिवशीं ते दोघे मित्र मुकाटयाने बसले होते. कंदिल तेवत होता. दोघे भुकेले होते. जवळ दिडकी नव्हती. इतक्यांत कोणी तरी आलें.

“तुम्ही का कल्याण ?” येणा-यानें प्रश्न केला.

“हो, कां बरं ?” कल्याणनें विचारलें.

“तुमच्यासाठीं हा डबा संध्येनं दिला आहे.”

“तुम्ही कोण ?”

“संध्येच्याच गांवचा मी.”

“बसा ना.”

“नको, मी जातों; डबा पोंचल्याचं त्यांना कळवा.”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel