“तूं मला आवडतोस हे तुला माहीत आहे. तुझी पाणीदार मुद्रा मला आवडते. आंतरशालेत खेळांत तूं शाळेला मोठेपणा दिलास. आणि आज तूंच ही गोष्ट करावीस का ? तुला शिक्षा करणं माझ्या जिवावर येतं. मी तुला छडी मारणार नाहीं. क्षमा माग असं म्हणणार नाहीं. कल्याण, आम्हां शिक्षकांना, शाळाचालकांना स्वाभिमान नाहीं असं का तुला वाटतं ? आम्हीहि माणसं आहोंत. देशाची मान उंच व्हावी असं आम्हांला का वाटत नाहीं ? परंतु सारं मनांत ठेवावं लागतं; तुम्ही आमची हृदयं समजून घेत जा. मला संस्था चालवायची आहे. शाळेंत नका कांही करूं; त्यामुळं आमची चमत्कारिक परिस्थिती होते; मनाची कुचंबणा होते. कल्याण, जा वर्गांत. तूं माझी संस्था सांभाळ.”

हेडमास्तरांचे प्रांजळ, प्रेमळ शब्द कल्याणच्या हृदयांत गेले. त्यांचें त्याच्यावर प्रेम होतें. परंतु त्यांनाच तो सरकारी पोलिस म्हणाला. त्याला वाईट वाटलें. देशभक्ति म्हणजे का अहंकार ? परंतु कल्याण अल्लड तरुण होता. त्याला कोठला एवढा पोंच ? त्यानें हेडमास्तरांकडे क्षमायाचक दृष्टीनें पाहिलें. त्या पाहण्यांत त्याचें निर्मळ हृदय होतें. तो आपल्या वर्गांत गेला. शाळेवरचा झेंडा दूर करण्यांत आला. रस्त्यावरून कोणी “शेम शेम” म्हणून ओरडले !

रोजच्याप्रमाणें दुस-या दिवशीं सकाळीं विश्वास हरिणीकडे दूध घालावयास गेला होता. ती दारांतच होती. “लावलास का रे झेंडा ?” तिनें विचारलें.

“लावल्याशिवाय राहीन वाटतं ?” त्यानें उत्तर दिलें.

“शाबास, विश्वासची शाबास” ती टाळया वाजवून म्हणाली. पुढील हकीकत कोणी विचारूं नये, म्हणून विश्वास पटकन निघून गेला. कल्याणनें हें सारें झेंडाप्रकरण संध्येला कळविले. “मी भाषण केलं, मुलांनी टाळया वाजवल्या, रस्त्यावर गर्दी जमली,

“वन्दे मातरम्, महात्मा गांधी की जय” वगैरे घोषणांनीं, दशदिशा दुमदुमल्या” वगैरे किती तरी त्याने लिहिलें होतें. संध्येनें तें पत्र कितीदां तरी वाचले. तिलाहि उत्साह आला. आपणहि कांहीं करावे असे तिला वाटलें. ती प्रभातफेरी रोज काढीतच असे. ती गाणी सांगे, मुलेंमुली म्हणत. वडील मंडळीहि हंसतखेळत जरा भीतभीत त्यांच्या मागून येत असे.

परंतु त्या दिवशीं सकाळी संध्येनें प्रभातफेरी शाळेकडे नेली. शाळेजवळ सारी आलीं. संध्या उभी राहिली. ती म्हणाली:

“शाळेवर आज आपण झेंडा चढवूं या. मोठमोठया शहरांतून जिकडे तिकडे झेंडेच झेंडे होत आहेत. आपला गांव मागं नये राहतां कामा. लावायचा झेंडा ?”

“हो, हो.” सारीं मुलें गरजलीं.

शाळेवर झेंडा चढला. झेंडागीत झालें. गर्जना दुमदुमल्या. गांवांतील स्त्री-पुरुष झेंडा पाहण्यासाठीं जमले. झेंडयाला प्रणाम करीत व निघून जात.

“आजी, तूं चल ना झेंडा पाहायला ? कसा छान दिसतो आहे. चल, नमस्कार करून परत येऊं.” संध्या म्हणाली.

“चल” आजी बोलली.

आजीला घेऊन संध्या आली. आजीनें तो तिरंगी झेंडा पाहिला. तिनें प्रणाम केला.”

“महात्मा गांधींना देव यश देवो.” आजी म्हणाली.

“आजी, तुमच्या संध्येला आतां तुरुंगांत घालतील. तुम्हालाहि घालतील.” कोणीं तरी हंसत म्हणाले.

“होय का ग आजी ?” संध्येनें विचारले.

“मी जिवंत आहें तोंपर्यंत कोण येणार आहे आपल्या घरांत ? पोलिसाला पायरी चढूं देणार नाहीं.” ती तेजस्वी आजी बोलली.

“महात्मा गांधी की जय, वन्दे मातरम् “मुलांनी गर्जना केली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel