“संध्ये, मी तुला स्वातंत्र्य देतों. घे. तुला मी गुलाम करूं इच्छित नाहीं. गुलामगिरीविरुध्द तर आपण लढत आहों. तुला या लढयांत पडावं असं वाटत असेल, तर तूं खुशाल जा. परंतु कल्याणचा नाद सोडून मग जा. माझी आठवण काढून मग रडत बसूं नकोस. तूं तुझ्या कर्तव्याच्या आनंदांत मस्त राहा.”

“कल्याण, तुला सोडून मी कशी जाऊं, कुठं जाऊं ? नाहीं ती इच्छा; नाहीं तें मला धैर्य. संध्या शेवटीं तुझी आहे. तूं देशाचा आहेस, जगाचा आहेस. परंतु मी केवळ तुझी. तूं एक मला पुरेसा आहेस. भाईजींची आठवण येऊन वाईट वाटेल. देशांतील चिमुर ऐकून जीव तडफडेल. परंतु शेवटीं जीव तुझ्याभोंवतीं रुंझी घालीत राहील. मी माझ्या मनांत डोकावून पाहीन, तर सर्वत्र तूंच भरून राहिलेला दिसशील. खरं ना ?”

“संध्ये, उगीच मनाला लावून घेऊं नकोस. तुझी प्रकृतीहि बरी नाहीं. या वेळचं तरी बाळंतपण नीट पार पडो. प्रसन्न राहा.

माझं ऐक; तूं आतां जरा पड. मी बाहेर जाऊन येतों हो.”

संध्येला प्रेमानें निजवून कल्याण बाहेर गेला. परंतु संध्या निजली नव्हती. कल्याण बाहेर गेला नि तिचे अश्रूहि बाहेर धांवून आले.

एके दिवशीं वार्ता आली कीं भाईजी अचानक पकडले गेले. ती वार्ता ऐकून संध्या सचिंत झाली. इतक्यांत कल्याण बाहेरून आला.

“संध्ये, भाईजींना अटक झाली ही गोष्ट खरीच.”

“आणि आपण मात्र घरीं !”

“संध्ये, भाईजींना अटक झाली त्याचा आनंद मान. तुरुंगांत जाऊन बसले; बरं झालं. बाहेर कुठं मोर्च्यात जाते, गोळीबारांत, लाठीमारांत घुसते तर ? आतां बसतील तुरुंगांत देवाला आळवीत. शांतपणं विचार करतील, लिहितील, वाचतील.”

“नाहीं तर उपवास करायचे.”

“तेथील मित्र त्यांना तसं करूं देणार नाहींत. त्यांच्याभोवतीं तिथं नवीन तरुण गोळा होतील. त्यांचे नवे प्रेमबंध निर्माण होतील. तें प्रेम भाईजींना वांचवील.”

“कुणाला माहीत ? मला आपलं वाईट वाटतं. भाईजी बाहेर असते तर ? होणा-या बाळाला ते पाळण्यांत घालते; ते गाणीं करते.”

“ते सुटून आल्यावर तुझं बाळ पाहतील.”

“परंतु ते येतील का आपल्याकडे ?”

“आमच्याकडे नाहीं आले, तरी संध्येकडे येतील. तुझे अश्रु त्यांना ओढून आणतील.”

भाईजी तुरुंगांत होते. त्यांचें कशांत लक्ष नसे. ना वाचनांत, ना लेखनांत ते फारसें कोणाशीं बोलत नसत. त्यांचें हंसणें जणूं लोपलें. त्यांचा आनंद जणूं अस्ताला गेला. देशांतील स्वातंत्र्याचा महान् लढा मंदावला म्हणून का त्यांना वाईट वाटत होते ? परंतु यश का एकदम येतें ? आणि अहिंसक जनतेने एवढा मोठा लढा केला ही का अभिमानाची गोष्ट नव्हती ? १८५७ नंतर नि:शस्त्र झालेली हिंदी जनता इतक्या त्वेषानें अशी कधीं उठली होती का ? महायुध्दाच्या काळांत कोणत्या दडपलेल्या देशांतील जनता अशी उठली, इतके दिवस झगडत राहिली ? लढा मंदावला, तरी मान खालीं घालण्याची जरूरी नव्हती. दीडशें वर्षांत पारतंत्र्यांत राहिलेल्या हिंदी जनतेचा आत्मा जिवंत आहे हें जगाला पुन्हां दिसून आले. हे हिंदी राष्ट्र मुमूर्षु नाहीं, हें राष्ट्र मरणार नाहीं. चीन, हिंदुस्थान हीं राष्ट्रें हजारों वर्षे जगलीं तरी तीं म्हातारीं नाहींत. जणूं अद्याप बाल्यावस्थेंतच तीं आहेत. वाढत आहेत. नवीन प्रकाश घेऊन पुढें जात आहेत. नवीन ऐक्याकडे जात आहेत. आपसांत मुलांप्रमाणें भांडत असलीं, तरी तीं पुढें जातील. चीन, हिंदुस्थान ! महान् राष्ट्रें ! शांतिप्रिय राष्ट्रें ! सर्वांना जवळ घेणारीं राष्ट्रें ! जगाला कधींहि त्रास न देणारीं राष्ट्रें ! हीं राष्ट्रें स्वातंत्र्यानें शोभतील. आज ना उद्यां.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel