परंतु एकदम दुसराच एक विचार तिच्या मनांत आला. मी भेटायला आलें आहें असें पाहून कल्याणला वाईट वाटेल. म्हणून तर नाहीं हे आकाशाचे अश्रु ? हा विचार मनांत येऊन संध्येला वाईट वाटलें. तिनें खिडकींत खिन्नपणें डोकें ठेवलें. परंतु ती पुन्हा हंसली. माझा कल्याण कठोर नाहीं. मला पाहून तो आनंदेल. तो आजारी पडला तर बरा होईल. मीं भेटायला गेलें नाहीं म्हणूनच तो आजारी पडला असेल. हो, खरेंच. आतां बरा होईल तो. तिनें आपलें डोकें पुसलें. तोंड, डोळे पुसले. तिनें अंथरूण घातलें. पांघरूण घेऊन ती झोंपली. मनांत कल्याणशीं बोलत बोलत ती झोंपली.

आतां उजाडलें होतें. वाटेंत एका स्टेशनवर तिनें वर्तमानपत्र विकत घेतलें. आयुष्यांतील पहिलाच हा प्रसंग. स्वत: वर्तमानपत्र विकत घेऊन वाचण्याची पहिलीच वेळ. जणूं नवीन जगांत संध्या येत होती. वर्तमानपत्र वाचीत ती बसली. आणि पुणें स्टेशन आलें. तिला नेण्यासाठीं विश्वास आला होता. दोघांनीं एकमेकांना कधीं पाहिलें नव्हतें. संध्या वळकटी घेऊन उभी राहिली. ती इकडे तिकडे पाहात होती. तों विश्वास धांवत आला.

“तुम्हीच ना संध्याताई ?” त्यानें विचारलें.

“आणि तुम्ही विश्वास ?” तिनें हंसून प्रश्न केला.

“हो, द्या ती वळकटी.”

“ती जड नाहीं. असूं दे माझ्याजवळ.”

“परंतु आम्ही बरोबर असतां तुमच्या हातांत सामान असणं बरं दिसत नाहीं.”

“विश्वासनें वळकटी घेतली. दोघें बाहेर आलीं. टांग्यांत बसलीं. विश्वासच्या बरोबर दुसरा एक मित्र होता. तो सायकलवर बसून पुढें गेला. आणि घरीं एक मित्र संध्येसाठीं स्वयंपाक करीत होता. संध्या व विश्वास खोलीवर आलीं. संध्येचें अंगधुणें झालें. विश्वासनें पाट मांडला. ताट मांडलें. संध्या जेवायला बसली. विश्वासचा घरीं असलेला मित्र वाढीत होता. सायकलवरचा मित्र आपल्या घरीं निघून गेला होता.

“यांचं नांव काय ?” संध्येनें विचारलें.

“बाळ.” विश्वास म्हणाला.

“आणि तो सायकलवरून पुढं गेला तो ?”

“त्याचं नांव लक्ष्मण.”

“बाळच्या हातचं मी आज जेवत आहें. तुम्ही रोज हातानंच करतां ?”

“कधीं कधीं करतों.”

“आणि कधीं कधीं कुठं जातां ?”

“कधीं कंटाळा येतो.”

“स्वयंपाक का हे बाळच करतात ?”

“मीहि करीत असें; परंतु हल्लीं बाळच करतो. कारण मलाहि बरं वाटत नाही. रोज ताप येतो; तसा फार नसतो. परंतु येतो; अशक्त वाटतं. पडून राहतो. बाळच सारं करतो.”

“माझ्याबरोबर कल्याणच्या भेटीला तुम्ही येणार ?”

“परंतु कल्याण मध्यंतरीं अन्नसत्याग्रह करीत होता, असं काल कळलं. त्याची भेट घेऊं देतात कीं नाहीं तें विचारलं पाहिजे. आपण जेलच्या सुपरिंटेंडंटला पत्र लिहूं. अन्नसत्याग्रह सुरू आहे कीं काय तेंहि विचारूं. आणि मग काय तें करूं.”

“तोंपर्यंत ?”

“तोंपर्यंत इथं राहा. मलाहि तोंवर बरं वाटेल. तुमच्याबरोबर येईन. “

“बरं तर इथं राहीन. तुमचा स्वयंपाक करीन. कल्याणचे तुम्ही मित्र. मला परकेपणा नाहीं.”

“आम्हांलाहि नाहीं.”

संध्येचें जेवण वगैरे झालें. ती तेथील पुस्तकें चाळीत बसली. इतक्यांत सायकलवरून एक मुलगी आली. ती आंत आली.

“ये हरिणे; या संध्याताई हो.” विश्वासनें सांगितलें.

“तुम्ही का हरिणाताई ! किती दिवस तुम्हांला पाहायची इच्छा होती.” संध्या आनंदानें म्हणाली.

दोघीजणी बसल्या. परंतु बोलणार काय ?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel