“बोल, पाठवू चिठ्ठी ?”
“नका पाठवूं.”
“तर मग क्षमा माग व अकरा प्रदक्षिणा घालून ये.”
“शाळेच्या शिस्तीच्या दृष्टीन मी चुकलो, म्हणून मी क्षमा मागतों.”
“जा, प्रदक्षिणा घाल !”
विश्वास बाहेर गेला. तो सिंहाचा छावा तडफडत होता. रागानें मुठी वळीत होता. तो शाळेभोवतीं प्रदक्षिणा घालूं लागला. त्याच्या डोळयांतून दु:खसंतापाने पाणी गळूं लागले. मधून मधून तो दांतओठ खाई. त्याने वर पाहिले. हेडमास्तर गॅलरीतून बघत होते. त्याने प्रामाणिकपणें अकरा-प्रदक्षिणा घातल्या. तो पुन्हां वर गेला.
“झाल्या का प्रदक्षिणा ?”
“हो.”
“पुन्हां असं करूं नकोस. शाळेशी कृतघ्नपणा करूं नकोस. जा वर्गात !”
विश्वास वर्गांत जाऊन बसला. त्याचा गोरा गोरा चेहरा लालबुंद झाला होता. मुलांनीं त्याच्याकडे पाहिले. परंतु त्यानें कोणाकडेहि पाहिलें नाहीं. वर्गांतील मास्तर हंसले. कोणाला ते हंसले ? मुलांच्या सद्भावनांना हंसणारे शिक्षक देशाचे हंसे करीत असतात, प्रभूचा अपमान करीत असतात.
ते शिक्षक हंसूनच थांबले नाहींत. ते म्हणाले, “देशभक्ति अशा रडणा-याकडून होत नसते. झेंडा लावणा-याची मरणाची तयारी हवी. माफी मागणारानं झेंडा लावूं नये. तो झेंडयाचा अपमान होतो.”
“ते शब्द म्हणजे दु:खावर डागणी होती. विश्वास ताडकन् उभा राहिला व म्हणाला, “हा विश्वास देशासाठीं तुरुंगांत गेला असं एक दिवस तुम्ही ऐकाल.” त्या संस्फूर्त शब्दांचा विलक्षण परिणाम झाला. शिक्षण भरमले, विरमले. मुले गंभीर झालीं. वर्गांत सारी स्तब्धता होती. मुलें विश्वासकडे बघत राहिलीं. इतक्यांत घंटा झाली. तास संपला. शिक्षक निघून गेले.
विश्वासच्या शाळेंत असा प्रकार झाला; तिकडे कल्याणच्या शाळेंत कोणता झाला ? त्यानेंहि शाळेवर झेंडा लावला होता. मुले जमलीं. वन्दे मातरम् चा घोष गगनात गेला. रस्त्यावर जाणायेणारांची गर्दी जमली. कल्याण तेथे व्याख्यान देऊं लागला.
“आपण पुण्याचं नांव गमावतां कामा नये हें लोकमान्यांचं पुणं. येथील विद्यार्थी का केवळ पुस्तकं घोकीत बसणार ? पुण्यांतील मुलं करतील त्याप्रमाणं महाराष्ट्रांतील मुलं करतील. पुण्याची स्फूर्ति सर्वत्र जाईल. आपण मागं नये राहतां कामा. ज्या शाळेंत आपण शिकतों, तिच्यावर का झेंडा नसावा ? आपणांला लाज वाटली पाहिजे. तो पाहा आज शाळेवर झेंडा फडकत आहे. तसा मनांत फडकूं दे. हृदयांत फडकूं दे.”
असें कल्याणचें भाषण सुरू होतें. तो हेडमास्तर आले. “हा काय तमाशा ? जा सारे वर्गांत.” ते रागानें गरजले. मुलें पळालीं. घंटा झाली.
“निघा सारे. घंटा झाली ना ? बघतां काय ? तुम्हांला छडया दिल्या पाहिजेत.” ते संतापून म्हणाले.
“मग पोलिसांत व तुमच्यांत काय फरक ? तुम्ही शिक्षक काठीमार करता. शिक्षक म्हणजे का सरकारचे पोलिस ?” कल्याण रागावून म्हणाला.
“वर ऑफिसांत चल. तिथं काय तें सांगतों “असें हेडमास्तर गरजले. मुलें वर्गांत गेलीं. कल्याण ऑफिसांत गेला. तो तेथें उभा राहिला. आणि हेडमास्तर आले. क्षणभर कोणी बोललें नाही. हेडमास्तर थोडया वेळानें म्हणाले, “काय रे कल्याण ? अद्याप तुझी मान ताठच. चूक करून पुन्हां मान वर ?”
“राष्ट्राचा झेंडा राष्ट्रांतील लोकांची मान उंच होण्यासाठींच आहे. तो झेंडा लावणा-याची मान खालीं कशी होईल ? मीं का पाप केलं ? चूक केली ? मीं चूक केली असं मला वाटतं तर माझी मान आपोआप खालीं झाली असती. मी चूक केली आहे असं खरोखर तुम्हांला तरी वाटतं का ?”
“कल्याण ?”
“काय ?”