“संध्ये, इथं काय अशी बसलीस ?” आई येऊन म्हणाली.

“काय बिघडलं बसलें म्हणून ?”

“लोक तुला वेडी म्हणतील”

“तूं नाहीं ना म्हणणार ? लागूं दे, मला वेड लागूं दे. अजून पुरं वेड लागत नाहीं म्हणून मला वाईट वाटतं. पुरं वेड लागलं तर
इथं अशी बसलें नसतें.”

“ऊठ, तिन्हीसांजा रडूं नये.”

“मग केव्हां रडायचं ?”

“कधींच रडूं नये.”

“आई, तूं कधीं नाहीं का ग रडलीस ? सांग, सांग.”

“घरीं चल. ऊठ. वेडी आहेस तूं. ऊठ.”

आईनें घागर कमरेवर घेतली. संध्येनें कळशी घेतली. संध्या येऊन अंगणांतच बसली.

“ताई, घरांत चल ना ग ! “अनु म्हणाली.

“आम्हांला गाणं शिकव. कल्याणचं गाणं.” शरद् म्हणाला.

“मला इथंच बसूं दे. तुम्ही जा घरांत.” संध्या म्हणाली.

“तुला घेऊं तेव्हांच घरांत जाऊं. चल ना ग !” दोघें म्हणालीं.

संध्येला कल्याणचें वचन आठवलें. आपण दुस-याला तकलीफ देऊं नये. ती उठली. हंसली. तिनें भावंडे जवळ घेतलीं. ती त्यांना गाणें शिकवूं लागली. शरद् नाचूं लागला; अनु टाळया वाजवूं लागली. चुलीजवळून आईहि बाहेर आली. तिन्ही मुलांचा आनंद पाहून तीहि आनंदली. तीसुध्दां टाळया वाजवूं लागली. वातावरण प्रसन्न झालें जरा. जेवणें झालीं. संध्येनें लहान भावंडाना एक गोष्ट सांगितली. शरद् व अनु झोंपीं गेलीं. संध्येनें आईला कांहीं वाचून दाखविले.

“संध्ये, नीज आतां. नको त्रास करून घेऊं.” आई म्हणाली.

“आई, कल्याण आजारी आहे. त्याला भेटावंसं मला वाटतं. तुझ्याजवळ पुन्हां पैसे मागायचे. जिवावर येतं माझ्या. परंतु आई, यंदा मला नवीन लुगडीं घेऊं नकोस. हींच मी पुरवीन. कुणाला दाखवायचं आहे नवीन लुगडं ? फाटक असलं म्हणून काय झालं ? कुठं जायच आहे मला ? कामगारांत काम करणा-याची राणी फाटक्या लुगडयांतच शोभते. आई, देशील का पैसे ? माझ्या लग्नांत तुम्ही नसतेत का पैसे खर्च केलेत ? हुंडे दिले असतेत. मग मला कल्याणला भेटून येण्यासाठीं नाहीं देणार ?”

“तूं का एकटी जाणार ?”

“दुसरं कोण कशाला हवं ? प्रेम आहे ना बरोबर ? प्रेम सारं शिकवील. पुण्याला विश्वास असेल; कल्याणचा मित्र. त्याला बरोबर घेईन. आणि मी कांहीं आतां लहान नाहीं. वाटेल तिथं एकटी जाईन. आई, दे पैसे, दे परवानगी. कल्याणला पाहून येईन, गडे.”

असें म्हणून संध्येनें आईच्या खांद्यावर मान ठेवली. आईनें तिचे अश्रु पुसले. केंस सारखे केले. मांडीवर तिचें डोकें घेतलें. संध्या पडून राहिली. पुन: दीनवाणें तोड करून आईकडे वर बघत ती म्हणाली,

“देशील ना आई पैसे ?”

“देईन हो.”

“किती माझी ममताळु आई !” असें म्हणून संध्येनें आईच्या मांडींत तोंड खुपसलें.

आणि एके दिवशी संध्या कल्याणला भेटायला निघाली. नदी सागराला भेटायला निघाली. त्या दिवशीं अकस्मात् पाऊस आला. संध्या भिजली. ती स्टेशनमध्यें कुडकुडत बसली. ती मनांत प्रेमस्नेहानें आर्द्र झाली होती. बाहेरून आकाशानें तिला ओलें केलें. मनांतील प्रेमाचा ओलावा ऊब देत होता. परंतु बाहेरचा ओलावा गारठवीत होता. मनावर आनंदाचे रोमांच उभारले होते. शरीरावर थंडीचा कांटा उठला होता. गाडी आली. संध्या बायकांच्या डब्यांत जाऊन बसली. बाहेर पाणी पडत होतें. इंजिनांतून ठिणग्या उडत व पटकन् विझून जात. हृदयांतून आशेचे स्फुलिंग असेच नाचत बाहेर येत असतात; परंतु परिस्थितीनें विझून जात असतात.

संध्येला वाटलें कीं कल्याण असाच रडत असेल. हें आकाश नाहीं वर्षत. हें माझ्या कल्याणचें हृदयच जणूं पाझरून राहिलें आहे. माझ्या कल्याणचें विशाल हृदय, गरिबांसाठीं तळमळणारें तें थोर हृदय ! असा विचार मनांत आला व संध्येनें डोकें बाहेर काढलें. तिच्या केंसांवर पाणी पडत होतें. तोंडावर उडत होतें. ती हात पुढें करी. तें पाणी ओंजळीत घेऊन ती पिई. कल्याणच्या प्रेमामृतासाठीं तहानेलेली संध्या ! ती तें पाणी पीत होती. कल्याणच्या हृदयांतील प्रेमवर्षाव ती प्राशीत होती.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel