“हो. मला तिची किती आठवण येते म्हणून सांगूं. कधीं कधीं आपलं मला वाटतं कीं, आजी माझ्या अगदीं जवळ आहे. विश्वास, मेल्यावर माणसाचं काय रे होत असेल ? केवळ चिमूटभर का राख ? सारा खटाटोप, त्याचं सारं म्हणजे का मूठभर भुरी ? काय आहे हें जन्ममरणाचं कोडं ?”
“अद्याप शास्त्राला याचा नीट उलगडा करतां आल नाहीं. एक दिवस या सर्व गोष्टींवर नीट प्रकाश पडेल.”
असे दिवस जात होते. आणि एके दिवशीं कल्याण, बाळ वगैरे निघून गेले. कल्याणनें संध्येचा निरोप घेतला. जिन्याच्या तोंडाशी दोघें उभीं होतीं. संध्या थरथरत होती.
“कल्याण ! “
“रडूं नको. मला आनंदानं जा म्हण. मी तुझ्याजवळ आहें.”
“जा हो, कल्याण, संध्येचा तूं आहेस, त्यापेक्षां तूं क्रान्तीचा अधिक आहेस. दोन नद्या एकत्र मिळतात, परंतु तया एकमेकींतच घोटाळतां कामा नयेत. सागराकडे त्यांना जायचं असतं. आपल्या दोघांचे जीवनप्रवाह शेवटीं क्रान्तीसाठीं आहेत.”
“कसं ओळखलंस ? जप हो, संध्ये; आनंदी राहा.”
“जा हं, कल्याण; संध्येच्या विचारानं खिन्न होऊं नकोस.”
ते सारे मित्र गेले.
“संध्ये ! “विश्वासनें हांक मारली.
संध्या बोलेना. ती खिडकींत उभी होती. तिच्या डोळयांतून अश्रुधारा वाहात होत्या. तिला हुंदका आला. जोराचा हुंदका. इतक्यांत रंगाहि आला.
“वैनी, हें काय ?” रंगा म्हणाला.
“संध्ये, उगी ! “विश्वास म्हणाला.
संध्या गंभीर झाली. रंगाचें जेवण राहिलें होतें. तो जेवला. सारीं निजलीं. परंतु संध्या जागी होती. तिनें हळूच आपली ट्रंक उघडली. ट्रंकेंतील मूर्ति तिनें काढली. तिनें ती जवळ घेतली. स्वत:च्या अश्रूंचें तिनें तिला स्नान घातलें.
“देवा, माझी दया तुला !” एवढेंच ती म्हणाली. पुन्हां ती मूर्ति तिनें ट्रंकेंत ठेवली. ती अंथरुणावर पडून राहिली.
एके दिवशीं उजाडत संध्या आपले केंस विंचरीत होती, तों दारांत कोण ? कोण बरें आलें होतें ? कल्याण का ?
“भाईजी, या ना ? आतां कुठून तुम्ही आलेत ?”
“संध्ये, मी एकदम खानदेशांतून आलों. “
“कां बरं अकस्मात् ? तुम्हांलाहि तिकडे जायचं आहे कीं काय ?”
“तिकडे म्हणजे कुठं ?”
“बाळ व कल्याण गेले आहेत तिकडे.”
“तें मला कांहीं माहीत नाहीं. संध्ये, मी आलों, कारण माझ्या स्वप्नांत सारखी तूं दिसत असस. आणि तुझे डोळे एकदम भरून येत. मला कांहीं समजेना. तीन दिवस असं झालं. म्हणून मी आलों. वाटलं कीं तूं संकटांत आहेस. परंतु तूं बरी आहेस हें पाहून माझा जीव खालीं पडला. विश्वास, तुझं रे कसं आहे ?”
“बरं आहे. वजन वाढलं आहे. टी.बी. खास नाहीं.”