“कांहीं तरी घोटाळा आहे.”
“कठिण का आहे ?”
“हो, देव काय करील तें खरं.”
“मी भाईजींना जाऊन सांगतों. ते वाट पाहात आहेत.”
“थांब, थोडा वेळ.”
“बरं तर.”
संध्येची अगतिक स्थिती झाली होती. अपार वेदना होत होत्या. तिचें तें जणूं बलिदान होतें. आणि शेवटी एकदांचे बाळ बाहेर आलें.
“झालं, आलं.” सूतिका म्हणाली.
परंतु हें काय ? बाळ सजीव नाहीं का ? रडलें नाहीं तें ? पहिला श्वास त्यानें घेतला नाहीं. सा-यांची धांदल उडाली. श्वासोच्छ्वास सुरू व्हावा म्हणून उपचार सुरू झाले. तें लहान अर्भक ! जनमाला आलें नाहीं तों त्याच्यावर प्रयोग. परंतु यश आलें नाहीं. कल्याण त्या बाळाकडे पाहात होता. संध्या बिछान्यावर मलूल होऊन पडली होती.
“आला का प्राण ?”
“चालले आहेत हो यत्न.” मुख्य सूतिका म्हणाली.
परंतु कांहीं नाहीं. सारे निराश झाले. तें बाळ तेथें स्वच्छ टॉवेलवर ठेवण्यांत आलें. किती सुंदर होतें बाळ ? डोकें जरा मोठें होतें. कल्याण पाहात राहिला. त्याला बोलवेना, रडवेना, तो जणूं दगड झाला होता !
“माझं बाळ, आणा ना तें माझ्याजवळ !” संध्या म्हणाली.
“संध्ये, बाळ गेलं हो.” कल्याण हळूच साश्रु स्वरानें म्हणाला.
“अरेरे ! असा कसा तो देव. अरेरे, अरेरे !” संध्या अरेरेशिवाय शब्द बोलेना.
“रंगा, तूं जा. भाईजींना सांग. काय करायचं ? आणि परत ये.” विश्वास म्हणाला.
“अरेरे, अरेरे. संध्येच्या किती आशा, किती मनोरथ, किती सुखस्वप्नें ! मातृत्वाच्या सुखाच्या कशा कल्पना ती रंगवी.
बाळाला पाजीन, पायांवर न्हाणीन, त्याला आंगडें घालीन, त्याच्या पाळण्यावर चिमण्या टांगीन, त्याला गाणें म्हणेन ! किती बेत, मनसुबे ! सारे एका क्षणांत मातींत गेले ! जीवनांतील आनंद, उत्साह, उमेद, आशा सारें कांहीं तेथें मरून पडलें होतें.
“कल्याण !” विश्वासनें हांक मारली.
“अरेरे !” तोहि तोच एक शब्द उद्गारला.
रंगा भाईजींना सांगून परत आला. भाईजींनीं इतर मित्रांनाहि तिकडे पाठविलें. परंतु ते स्वत: गेले नाहींत. त्यांना धीर आला नाहीं. ते घरींच राहिले. “देवा, या दु:खांतून संध्येला पार पाड, तिला हें दु:ख सहन करण्यास शक्ति दे. तिचं बाळ नेलंस, आतां धैर्य तरी दे.” अशी ते प्रार्थना करीत होते.
आणि तें मूल कल्याणनें शेवटीं उचललें. जे हात त्या बाळाला खेळवणार होते, नाचवणार होते, ते हात त्या बाळाला घेऊन ओंकारेश्वराकडे निघाले. संध्येनें टाहो फोडला. परंतु पुन्हां ती पडून राहिली. अरेरे, अरेरे, असें ती सारखें म्हणे व रडे. कल्याण, विश्वास, रंगा व इतर मित्र शांतपणें ओंकारेश्वरीं आले. वाटेंत कल्याणनें तें मृत बालक दुस-या कोणाजवळ दिलें नाहीं. मध्येंच त्या मुलाला तो हृदयाशीं धरी. आणि त्याच्या डोळयांतील पाणी त्या फडक्यावर पडे. जणूं स्वत:ची ऊब देऊन बाळाला तो सजीव करूं पाही.
भूमातेच्या पोटांत बाळाला ठेवण्यांत आलें. विश्वासचें घर जवळच होतें. तेथें विश्वास, कल्याण, सारे गेले. किती तरी दिवसांनीं विश्वास घरीं गेला होता. आणि आला तोहि अशा प्रसंगी ! करुण प्रसंगीं ! त्याची आई कल्याणचें सांत्वन करीत होती. क्रोधी वडील, परंतु तेहि या तरुणावर आलेल्या या सर्व आपत्तींनी रडले. ते म्हणाले, “कल्याण, विश्वास, तुम्हीं अद्याप अनुभव घेतलेला नाहीं. अजून तुम्ही तरुण आहांत; परंतु संसार हा असाच हो. या सर्व प्रसंगांना तोंड द्यावं लागतं. सहन करा सारं. शोक गिळा. तुम्हांला कुठं राहायला घर मिळत नसेल, तर इथं येऊन राहा. दोन खोल्या तुम्हांला मोकळया करून देईन. तिथं स्वतंत्रपणं राहा. बरं का विश्वास. बरं का कल्याण. आपल्या हातच्या थोडयाच आहेत या गोष्टी. उगी.”