“होय. माझ्यापेक्षां ती मूर्ति तुला प्रिय आहे. या सजीव कल्याणपेक्षां ती निर्जीव मूर्ति तुला अधिक आवडते. आपणांस आपल्या दु:खांत ज्याची आठवण होते, तोच खरा आपला. त्यालाच आपण जीवन दिलं असं म्हणतां येईल. तुला हा कल्याण प्रिय नसून तो देव प्रिय आहे.”
“कल्याण, देव मला प्रिय आहे तोसुध्दां तुझ्यासाठीं. तुझ्यासाठींच ना मी त्याला आळवतें ? तुझ्याशिवाय जर मला देव मिळत असेल, तर तो मला नको. माझ्या कल्याणासाठीं मला देव पाहिजे आहे. मुख्य तूं, तुझ्यासाठीं इतर सारं.”
“संध्ये, आम्ही समुद्रावर गेलों होतों. भरती होती. वर चंद्र होता. समोर लाटांचा नाच चालला होता. सागरसंगीत चाललं होतं. वारा येई व लाटा अधिकच जोरानं येत.” विश्वास म्हणाला.
“समुद्रावर तुम्ही काय रे करीत होतेत ?”
“आम्ही दोघे, खूप खूप बोललों. सारी सृष्टि आम्ही विसरून गेलों होतों. आमचीं ध्येयं, आमचं तत्त्वज्ञान, पुढील कामाचं धोरण, सर्व गोष्टींची आम्हीं चर्चा केली. त्या आमच्या साध्या गप्पा नव्हत्या. जीवनांतील सर्वोत्कृष्ट असं तें संगीत होतं. हृदयापासून आम्ही बोलत होतों. आशा-निराशा बोलत होतों. भावी मनोरथ रचीत होतों. वाळूंत लाल झंडे की जय लिहीत होतों-” विश्वास कवीप्रमाणे जणूं बोलत होता.
“किती तरी दिवसांत संध्ये, असा अनुभव मला आला नाहीं. माझ्याशीं समरस न होणा-या ध्येयशून्य लोकांत माझा जीव गुदमरतो. तिथं मला चुकल्याचुकल्यासारखं वाटतं. विश्वास, तूं व मी ओंकारेश्वरावर असेच बोलत बसत असूं. चितेजवळ बसून बोलत असूं. आज सागराजवळ आपण बोलत होतों. ओंकारेश्वराजवळच्या चिता पाहून आपणांस गरिबांच्या संसारांच्या चिता दिसत व आपल्या मनांत आगडोंब उसळे. आज अनंत सागर पाहून अशाच अनंत भावना हृदयांत उसळल्या. संध्ये, आजचा आमचा आनंद स्वर्गीय होता-” कल्याण म्हणाला.
“परंतु त्या आनंदांत वांटेकरीण होण्यासाठीं मला नेलं नाहींत ना ? कदाचित् त्या आनंदाची गोडी मला चाखतां आली नसती. कल्याण, तुझ्याशीं समरस न होणा-या लोकांच्या संगतींत तुझा जीव गुदमरतो, म्हणजे माझ्या संगतींत ना ? मी ध्येयशून्य ना ? माझ्यामुळं शेवटीं तुझी निराशा, होय ना ? असंच ना तुला सांगायचं होतं.” संध्या दु:खानें विचारती झाली.
“संध्ये, प्रत्येक शब्द तूं स्वत:ला काय लावून घेतेस ? रोज सारखा का मी तुझ्याजवळ असतों ? तूंच का सारं जग ? अग, दिवसभर मी बाहेर असतों. निरनिराळया ठिकाणीं जातों. तिथं बोलणीं होतात. चर्चा निघतात. मतभेद होतात. त्रास होतो. गुदमरल्यासारखं होतं. तुझ्यामुळं नाहीं. तुझ्यामुळं माझा जीव जगला आहे. तूं मला जीवन देत आहेस. तूं माझ्या जीवनाचा ओलावा आहेस. आणखी काय सांगूं, संध्ये ?”
“संध्ये, आम्ही भाईजींना बोलावणार आहोंत.” विश्वास म्हणाला.
“तूं बोलाव. तुझ्या बोलावण्यानं ते येतील. तुझ्यावर त्यांचं प्रेम आहे.” संध्या म्हणाली.
“माझ्यापेक्षांहि तुझ्याविषयीं त्यांना फार वाटतं. संध्येची समाधानी वृत्ति स्वर्गीय आहे, अलौकिक आहे, असं भाईजी म्हणत.” विश्वास म्हणाला.
“ते आमचा संसार पाहायला येणार होते.” कल्याण म्हणाला.
“भाईजी आले म्हणजे तुम्ही दोघं जरा भांडा.” विश्वास हंसून म्हणाला.
“भांडणाचे नकोत डोहाळे.” संध्या म्हणाली.
“मग कसले होताहेत, संध्ये ?” विश्वासनें हंसून विचारलें.
“विश्वास ! “संध्या रागावल्यासारखें करून जरा लाजून म्हणाली.
“बरं, नाहीं मी बोलत.” विश्वास म्हणाला.