“संध्याताई, मी तुम्हांला एक विचारूं ?”

“विचारा.”

“तुमचं का दादावर प्रेम आहे ?”

“रंगा, काय सांगूं मी ?”

“तुमची माळ ट्रंकेंत घालून दादा घेऊन गेला होता.”

“खरंच का ?”

“मी का खोटं सांगेन ?”

“रंगा, त्या वेळीं आम्ही लहान होतों. चारपांच वर्षांपूर्वीची गोष्टी. लहानपणच्या त्या गंमती.”

“परंतु आज दादाचं तुम्हांलाच पत्र आलं. “

“रंगा, तुमचे दादा देशभक्त होणार. ते का लग्नाच्या फंदांत पडतील ?”

“सारे देशभक्त का अविवाहित होते ?”

“विवेकानंद अविवाहित होते. सुभाषचंद्र अविवाहित आहेत. परंतु बहुतेक सारे विवाहितच दिसतात.”

“मग दादा कां नाहीं होणार विवाहित ?”

“ते क्रांतिकारक देशभक्त होणार आहेत.”

“क्रांतिकारक का अविवाहित होते ?”

“क्रांतिकारकांचे महर्षि मार्क्स विवाहित होते. क्रांतिकारकांचा मुकुटमणि लेनिन विवाहित होता.”

“मग दादा कां नाहीं लग्न करणार ?”

“मला काय माहीत ? मला आपलं वाटतं; तें जाऊं दे रंगा. मी आतां जातें. तुम्ही कुठं निघून जाऊं नका. दादा येईपर्यंत आईला धीर द्या. जातें हं. मी.”

संध्या माघारी गेली. तिच्या मनांत किती तरी विचार खेळत होते. ती अशांत झाली होती. तिला कांही सुचत नव्हतें. शरद् व अनु सायंकाळी खेळून आलीं. सर्वांची जेवणें-खाणें झालीं. संध्या व आई दोघींनीं मिळून भांडीं घांसलीं. संध्येनें आईला कांहीं वाचून दाखविलें. नंतर सारीं हळूहळू झोंपीं गेलीं. परंतु संध्येला झोंप येईना. डोळयांसमोर तिला भविष्यकाळ दिसत होता. कल्याण चळवळींत पडणार ? मला नाहीं का पडतां येणार ? मी नाहीं का तुरुंगांत जाणार ? मी का भित्री आहें ? मी नाहीं कामगारांच्या बायांत जाऊं शकणार ? मी त्यांना त्यांचीं सुखदु:खें विचारीन. त्यांच्या मुलांचे फाटके कपडे शिवीन. कल्याणच्या जीवनाशी मला नाहीं का अंतर्बाह्य एकरूप होतां येणार ?

परंतु माझा स्वभाव चळवळया नाहीं असें मला वाटूं लागलें आहे. मला चळवळ जमणार नाहीं. घर स्वच्छ ठेवावे, स्वयंपाक नीट करावा, हंसावें, प्रेम द्यावें, सेवा करावी, आजा-याची शुश्रूषा, हेंच माझें ध्येय. कल्याणचे मित्र असतील त्यांना जेवायला वाढीन, त्यांची काळजी घेईन. मी सर्वांची दाई होईन, सेविका बनेन. मुकी सेवा हे माझें ध्येय. आदळआपट, चळवळ, तें नाहीं मला जमणार. खरेंच, कोणता आहे माझा स्वभाव ?

लहानपणीं मी नदींत नाचे, झाडावर चढें, अंगणांत खेळे. कोकिळा कुठें कूऊ करते तें शोधीत मी रानोमाळ भटकें. त्यासाठीं मीं मार खाल्ले. परंतु तो नाचरा बागडणारा माझा स्वभाव, आज कोठें आहे ? ती संध्या संपली, लोपली, मावळली. संध्येची आतां गंभीर निशा झाली आहे. गंभीर रात्रीची पुन्हां मंगल उषा नाहीं का होणार ? रात्र का अनंत, न संपणारी अशीच राहणार ? होईल. निशेची उषा होईल, प्रात:संध्या होईल. घरटयांतील पांखरें पुन्हां चिंचचिंव करीत नाचतील, उडतील. माझें मन पुन्हा पूर्वीप्रमाणें मोकळें होऊन सर्वत्र नाहीं का हिंडणार खेळणार ?

असे विचार संध्या करीत होती. ती अंथरुणांत तळमळत होती. ती हळूच उठून बाहेर आली. तुळशीच्या अंगणांत बसली. आम्रवृक्षांच्या छाया चांदण्यांत नाचत होत्या. तिच्या मनांत भावना नाचत होत्या. तिला एकदम आजीची आठवण आली. तिने एकदम मागें पाहिलें. आजी अगदी आपल्याजवळ आहे असा तिला भास झाला. “भिऊं नको बाळ, रडूं नको. तुझा ठेवा तुला मिळेल.” असें आजी आशीर्वादपर आश्वासन देत आहे असें तिला वाटलें. कोणी तरी प्रेमानें डोक्यावरून हात फिरवीत आहे असा तिला भास झाला. ती आनंदली; परंतु बावरली, घाबरली. ती एकदम घरांत गेली. अंथरुण घेऊन ती झोंपली. तिकडे तुरुंगांत कल्याणहि अशाच विचार तंद्रींत तळमळत होता !

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel