दोघें पुन्हां टांग्यांत बसलीं; आणि बाळच्या घरीं आलीं. तेथून सारींजणें एका प्रख्यात उपाहारगृहांत गेलीं. तेथें सर्वांनीं अल्पाहार केला. मित्रांचीं अभिनंदनपर भाषणें झालीं. भाईजीहि थोडें बोलले. ते म्हणाले, “मी काय बोलूं ? माझं हृदय समाधानानं भरलेलं आहे. विश्वासबद्दल मला किती वाटतं तें तुम्हां सर्वांना माहीतच आहे. हरणीचाहि स्वभाव मी जाणतों. अति मोकळया स्वभावाची ती मुलगी आहे. कधीं कधीं बोलतां बोलतां पटकन् विश्वासलाहि ती थापट मारायची. ना संकोच, ना त्या खोटया लाजलज्जा. हरणीनें विश्वासला थापट मारली हें मीं पाहिलं व मला धन्य वाटलं. वाटलं, किती निष्पाप मनाची आहे ही मुलगी ! निष्पाप असल्याशिवाय असं कोणी करणार नाहीं. अशी सहज अकृत्रिमता प्रकट होणार नाहीं. जिथं अशी सहजता असते, तिथं मोकळेपणाचा अमोल आनंद असतो. माझा एक मित्र आहे. त्याच्या जीवनांत अशीच सहजता आहे. तो आपल्या पत्नीलाहि बोलतां बोलतां पटकन् चापटया मारील व “समजल का तुला, अग वेडे, समजलं का ?” असं मोठयानं हंसत म्हणेल. त्या चापटयांचं इतरांनाहि कांहीं वाटत नाहीं व त्याच्या पत्नीलाहि त्यांत कांहीं गैर आहे, सद्भिरुचीला सोडून आहे, असं वाटत नाहीं. कारण ती अकृत्रिम सहजता असते. परंतु माझ्या मित्राच्या ओळखीचा एक तरुण होता. त्याला वाटलं कीं, ते आपल्या पत्नीला अशा चापटया मारतात, तर आपणहि आपल्या पत्नीला प्रेमानं मारूं व जरा नवीन प्रेमाचा प्रकार दाखवूं; पराक्रम दाखवूं. एके दिवशीं माझा मित्र त्यांच्या घरीं गेला होता. त्या तरुणाला वाटलं कीं, आज करावा प्रयोग व आपलंहि धाडस दाखवावं. दुसरेहि एकदोन स्नेही तिथं होते. त्याच्या पत्नीनं चहा, केळीं वगैरे आणून ठेवलं. तेव्हां तो तरुण पटकन् म्हणतो, “बिस्किटं नाहीं आणलींस तीं ? वेडी कुठली ! आधीं बिस्किटं आण.” व त्यानं प्रेमाचा आविर्भाव आणून तिला चापट मारली. त्याबरोबर ती पत्नी लाल झाली ! हा काय पतीचा चमत्कारिकपणा ? चार मित्रांच्या देखत असं काय हें वेडंवांकडं वागणं असं तिला वाटलं. आणि तो प्रेमवीरहि शरमिंधा झाला. त्याचं तोंड फोटो घेण्यासारखं झालं. परंतु या हरणीच्या जीवनांत सहजता आहे. आणि सहजता निष्पाप जीवनांतच संभवते. हरणीला आढ्यता नाहीं. पटकन् केर काढूं लागेल, भाजी चिरूं लागेल. ती धीट आहे, निर्भय आहे. एखाद्या डॉक्टरचाहि हात इन्जेक्शन् देतांना थरथरेल. परंतु हरणीचा हात कसा स्थिर व पुन्हां हलका ! हरणे, वेळ आली तर विश्वासला अशींच इन्जेक्शन्स दे हो. विश्वास जरा रागीट आहे. त्याला तूं आवर. स्थिर व निश्चयी स्वभावानं परंतु सौम्य व हळुवार रीतीनं त्याला आवर. एकमेकांना सांभाळा. तुम्ही एकमेकांचे ब्रेक आहांत; लगाम आहांत. मनांत एकमेकांविषयीं संशय कधींहि आणूं नका. संशय आला, तर वेळींच बोला, तो निर्मूल करा. संशयाला एकदां जागा दिली तर तो वाढतो. आणि एकदां का त्याचीं मुळं खोल गेलीं, म्हणजे मग त्याचं निर्मूलन करणं कठिण जातं. सष्टींत नाना ऋतु आहेत. परंतु तुमच्या जीवनांत प्रेमाचा, सहकार्याचा एक वसंतऋतुच सदैव फुलो. तुम्ही ध्येयवादी आहांत. आजपर्यंत ध्येयाला पाणी घातलंत. आतां दुप्पट जोरानं पाणी घाला. तुमचीं जीवनं कृतार्थ होवोत. तुम्ही आतां स्वतंत्र राहाल. परंतु तुम्ही आपल्या घरीं जात येत जा. विश्वासचे वडील रागीट, परंतु त्यांनींच परवां “नसेल जागा मिळत तर इथं येऊन राहा” असं सांगितलं. विश्वासच्या लग्नांत त्यांनींच पुढाकार घेतला. आणि हरणीची आई ! तिची कदाचित् निराशा झाली असेल. परंतु निराशा गिळून शेवटीं तिनं तुमच्या तोंडांत गोड पेढाच घातला. जात जा आईकडे. आपण आपलं कर्तव्य करावं. येत जाऊं नका असंच म्हणाली, तर नये जाऊं. परंतु असं असूनहि आजारी वगैरे आहेत असं कळलं, तर सारा अभिमान विसरून जावं व त्यांची सेवा करावी. मी तुम्हांला काय सांगूं ? तुम्हां सर्वांचा मेळावा पाहून मला आनंद होतो. कल्याण-संध्या, विश्वास-हरणी अशा ह्या ध्येयवादी, त्यागी, कष्ट व आपत्ति, दारिद्रय व वाण यांना आनंदानं मिठी मारायला तयार असणा-या जोडया पाहिल्या, कीं हृदय उचंबळून येतं व हिंदुस्थानच्या उज्ज्वल भवितव्याविषयीं आशा वाटूं लागते. या आशा तुम्ही पूर्ण कराल, पूर्ण करण्यासाठीं धडपडाल, अशी मला आशा आहे. विवाह म्हणजे शेवटीं विलास नसून विकास आहे. परस्परांचा सर्वांगीण विकास व स्वत:च्या विकासानं समाजाचा विकास. विवाह म्हणजे सहकार्य, विवाह म्हणजे संयम, विवाह म्हणजे विकास, विवाह म्हणजे सेवा, विवाह म्हणजे दिवसेंदिवस पशुतेचा होम व ध्येयगिरीवर आरोहण. विश्वास-हरणे, मी तुम्हांला काय सांगूं ? तुमचं जीवन सुखमय, मंगलमय, सेवामय व इतरांनाहि आनंददायक व आदर्शरूप होवो असं मी इच्छितों. तुम्हांला आशीर्वाद देण्याइतका मी मोठा नाहीं. परंतु तुमचे मंगल मनोरथ पूर्ण होवोत, अशी मी माझ्या परमेश्वराला प्रार्थना करीत जाईन.”

भाईजींचें बोलणें संपलें आणि तिकडे रेडिओवर सुंदर गाणें सुरू झालें. कोणतें गाणें ?

“तुम जागो भारतवासी”

हें तें गाणें होतें. जणूं हरणी व विश्वास यांना सावध राहा, जागृत राहा, असा संदेश मिळत होता. शुभमंगल व्हायला हवें असेल, तर सावधान असलें पाहिजे. भारतांतील कोटयवधि बंधूंची उपासमार व दैन्य विसरूं नका, असा जणूं सावधानतेचा आदेश त्या गाण्यांतून मिळत होता !

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel