“विश्वास, तो आमच्या शेजारचा ? वडिलांनीं घालवून दिलेला ? फार हट्टी व करारी बुवा. कुठं आहे तो ?”

“चला दाखवतों” प्रभूनें पटकन् जेवण आटोपलें व कल्याणच्या बरोबर तो घाटावर आला.

“काय रे विश्वास ?”

“प्रभु, तुला भेटायला आलों आहें ! “

“का रे विश्वास, असा कांपरा कां आवाज ?”

“प्रभु, तूं माझा शेजारी. तूं माझ्यावर प्रेम करीत असस. तूंच मला पोहायला शिकवलंस. तूंच वडिलांच्या रागापासून वांचवीत असस. प्रभु, तुझा विश्वास हल्लीं उपाशी असतो. काम तरी काय करायचं ? कल्हई लावायला आम्ही जातों. परंतु त्यांतच वेळ जातो. विद्यार्थ्यांत जायचं. त्यांचं अभ्यासमंडळ चालवायचं. वाचायचं. कामगारांत जायचं. सभा असतातच. कल्हई लावणंहि नीट जमत नाहीं. कल्याणचीं तर बोट भाजलीं. एक दिवस माझा पाय भाजला. भांडीहि कधीं मिळतात, कधीं नाहीं. म्हणून म्हणतों कीं, आम्ही ज्या दिवशीं उपाशीं असू त्या दिवशीं तुझ्याकडे जेवायला येत जाऊं. आमच्यासाठीं तूं भाकरी राखून ठेवीत जा. रात्री दहापर्यंत भाकरी ठेवीत जा. तोंवर नाहीं आलों तर मग गाईला घाल. प्रभु, तुला सांगायला संकोच नाहीं वाटत. आईबापांजवळ स्वाभिमान दाखवणारा हा विश्वास तुझ्याजवळ भीक मागत आहे. कां ? तर तूं मजवर प्रेम करीत होतास म्हणून. तें प्रेम अद्याप असेल अशी आशा आहे म्हणून.”

“विश्वास, तूं उपाशी असतोस, मग इतके दिवस कां आला नाहींस ? आजपर्यंत तुम्ही कां उपाशी राहिलेत ? आजपर्यंत कां संकोच केलास ?”

“परंतु आज आलों ना संकोच सोडून ?”

“विश्वास येत जा हो. तुमच्यासाठीं ठेवीत जाईन. आणि आतां हल्लीं काय रे करतां काम ?”

“विचार-प्रसाराचं.”

“तुम्ही का सारे भाई होणार ?”

“हो.”

“चांगलं आहे. पण भाई लोकांचं एक मला आवडत नाहीं. “

“तें काय ?”

“ते धर्म नको म्हणतात; ते जाऊं दे; तुम्ही येत जा माझ्याकडे. सुखाचे जीव तुम्ही दु:खांत घातले आहेत. तुम्ही कष्ट करीत आहांत. मला तुमच्याविषयीं आदर आहे, आपलेपणाहि आहे.”

कल्याण व विश्वास आपल्या खोलीवर गेले. परंतु खोलींतील कंदिलांत तेल नव्हते. त्यांच्या खोलीत विद्युद्दीप नव्हता. ती साधी खोली होती. खोलींत अंधार. अंधारांत दोघे बसले.

“विश्वास, तेल आणतोस ?”

“मी नाहीं जात. तो दुकानदार मागचे पैसे मागेल.”

“बरं, मी जातों.”

“कल्याण बाटली घेऊन वाण्याच्या दुकानांत गेला. त्याच्याच नांवावर खातें होते. त्यानें तेल मागितलें.

“तेल मिळत नाहीं. पहिली बाकी चुकती करा ! “

“अरे, आम्ही का कुठं जातों ? आतां घरून मनिऑर्डर आली कीं देऊन टाकूं पैसे. पैसे का बुडतील तुझे ? दे लवकर तेल. तिकडे खोलींत नाहीं दिवा. मित्र आले आहेत.”

“मनिऑर्डर एक महिन्यापासून येत आहे तुमची. का विलायतेंतून यायची आहे ?”

“दे रे बाबा. घे ही बाटली.”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel