“त्यानं कांहीं बिघडत नाहीं. परंतु कल्याण येणार नाहीं.”
“तो माझ्याजवळ आहेच. यायला कशाला हवा ?”
“खरंच हो. आम्ही वेडीं आहोंत.”
भाईजी आले त्यावेळेपासून सर्वांनाच जरा बरें वाटलें. बाळची आई, विश्वासची आई ह्याहि समाचाराला येत, बसत व बघून जात. हरणीची आईहि मोसंबी वगैरे पाठवी. संध्येला हळूहळू आराम पडूं लागला. ताप उतरला. पुनर्जन्म झाला. तिकडे राजबंदींचा उपवासहि सुटला. संध्येला त्यामुळें अधिकच आनंद झाला. एकदम तिच्या प्रकृतींत फरक पडला.
“आतां मी लौकर बरी होईन, भाईजी.”
“होशील हो. परंतु हालचाल नाहीं हो करायची.”
“तुम्ही सांगाल तशी वागेन.”
“मी तुला तुझ्या आईकडे घेऊन जाणार आहें.”
“कशाला ?”
“म्हणजे बरं. लौकर सुधारशील. आईच्या जवळ असणं हेंच खरं टॉनिक.”
“बघूं पुढं.”
परंतु भाईजींनाच एके दिवशीं सकाळीं पकड-वॉरंट आलं. ते संध्येला मऊ भात भरवीत होते. तों दारांत पोलीस उभे.
“कोण पाहिजे ?”
“आपणच !”
“असं का ? ठीक तर. बसा हां !”
भाईजींनीं तयारी केली. संध्या, हरणी, रंगा सारीं खिन्न व उदास झालीं.
“रंगा, तूं संध्येला घरीं पोंचव; तिच्या आईकडे. हे पैसे घेऊन ठेव. संध्ये, नाहीं म्हणूं नकोस हां. प्रकृतीची काळजी घे. हरणे, जप ह; देव आहेच सर्वांना.” असें म्हणून ते निघाले. संध्येच्या केंसांवरून, डोक्यावरून त्यांनीं हात फिरविला. आणि गेले !
मोटरीचा आवाज आला. गेली मोटर.
आणि एके दिवशीं रंगा संध्येला माहेरीं घेऊन गेला. तिच्या आईकडे तिला पोंचवून तो परत आला. संध्या माहेरीं होती. किती तरी दिवसांनीं ती आईला भेटत होती. किती तरी दिवस म्हणजे, फारसे नाहींत कांहीं-वर्षा-दीड वर्षांतीलच सा-या कथा.
“संध्ये, काय तुझी दशा ?” तिची आई म्हणाली.
“आतां तूं कर हो मला जाडीजुडी.” संध्या बोलली.
इकडे हरणी दिवसेंदिवस अधिकाधिक अस्वस्थ होत चालली. इतके दिवस संध्येचें तिला बंधन होतें. ती एक जबाबदारी होती. आतां ती मोकळी झाली. कॉलेज सोडावें व गांवोगांव गाणीं म्हणत हिंडावें असें तिला वाटूं लागलें. तिनें संध्येला आपली मन:स्थिति कळवली. संध्येनें तिला लिहिलें, “जरा थांब, मला बरी होऊं दे. जायचंच, तर आपण दोघी जाऊं. माझ्याहि मनांत हेच विचार येत आहेत. कल्याण, विश्वास, यांची जीं ध्येयं, त्यांचीच आपणहि पूजा करूं. त्यांचे मंत्र घोषवीत आपण सर्वत्र हिंडूं. क्रांतीच्या यात्रेकरणी आपण होऊं. मी येईपर्यंत थांब. थोडी कळ सोस.”
हरणीनें घाई केली नाहीं. संध्येची वाट पाहात ती थांबली. थोडे दिवस गेले. संध्या बरी झाली. एके दिवशीं ती आईला म्हणाली,
“आई, आतां मला जाऊं दे. माझ्या कर्तव्यासाठीं मला जाऊं दे. कल्याणचं काम हातीं घ्यायला जाऊं दे.”
“जा हो, संध्ये. ज्यांत तुमचा आनंद, तें करा. माझ्या प्रेमाची तहान लागली, तर येत जा. घोटभर पिऊन जात जा.” ती माता म्हणाली.
एके दिवशीं संध्या पुण्याला आली. हरणी नि ती बराच वेळ रात्रीं बोलत बसल्या, शेवटीं प्रचारार्थ बाहेर पडण्याचें ठरविलें.
हरिणीनें आपल्या आईला किंवा विश्वासच्या घरीं कोणाला कांहीं सांगितलें नाहीं. त्यांनीं रंगाला फक्त सांगितलें होतें.
“उठाव झेंडा बंडाचा” हें गाणें गात त्या तेजस्वी भारतकन्या खेडयापाडयांतून हिंडू लागल्या. परंतु एका स्टेशनवर त्यांना अटक झाली. त्यांना कृतार्थ वाटलें. येरवडयाच्या तुरुंगांत त्यांना स्थानबध्द करून ठेवण्यांत आलें. कल्याण नि विश्वास यांनीं ती वार्ता वर्तमानपत्रांत वाचली. दोघांनीं आनंदानें उडया मारल्या.