“कल्याण, आपण जाऊं या दुसरीकडे. त्या म्हाता-याला कशाला त्रास ? रागावून काय होणार ? आपण त्यांची कींव करूं या. आपला देश किती मागं आहे त्याची यावरून कल्पना येईल; यापेक्षां किसान कामगारहि जरा धीट असतात. असं कसं हें पुणं ? आणि ही म्हणे महाराष्ट्राच्या राजकारणाची राजधानी !” भाईजी म्हणाले.

इतक्यांत त्या म्हाता-याची पत्नी आली. ती गोड बोलून सांगूं लागली. तिला वाईट वाटत होतें. तिनें नव-याची समजूत घालण्याचाहि प्रयत्न केला, परंतु तिला यश आलें नाहीं. ती विश्वासला म्हणाली, “हें पाहा विश्वास, तुम्ही उद्यांच जा असं नाहीं. चार दिशीं गेलेत, तरी चालेल. चांगली जागा मिळेपर्यंत राहा हो. परंतु कुठं तरी दुसरीकडे जागा बघा. त्यांचा स्वभाव हा असा. वयहि झालं. कशाला त्यांना त्रास देतां ? इथं पुन्हां दुसरं कोणी नाहीं कीं पोलीसबिलीस आले तर त्यांना जरा कोणी दरडावील; खरं ना ? मला वाटलं कीं चांगला आधार व शेजार आला मुलांचा. घर भरलेलं दिसेल. जा-ये सुरू राहील. आम्ही घरांत दोघं. सारं सुनं सुनं वाटतं. तुम्हांला भाजीसुध्दां दुपारची ठेवून दिली आहे; मुद्दाम थोडी जास्त केली होती. म्हटलं, होईल मुलांना; हातांनीं करतात. तिची बरी आहे ना प्रकृति ? जरा संभाळा हो. वाईट झालं. तुम्ही सारे दु:खांत मी समजतें; परंतु काय करायचं ? चार दिशीं गेलेत तरी चालेल हो.”

असें म्हणून ती म्हातारी गेली. विश्वास तिला नाहीं म्हणूं शकला नाहीं. म्हाता-याचा त्याला राग आला. परंतु या म्हाता-याच्या पत्नीचें बोलणें कसें सरळ ! तिनें भाजीहि त्यांच्यासाठीं ठेवून दिली होती ! तिला हीं मुलें जावीं असें वाटत नव्हतें. परंतु नवरा म्हातारा. उगीच मनाला लावून घ्यायचा म्हणूनहि तिला काळजी.

विश्वास व कल्याण दुपारीं पुन्हां फिरतीस जायला निघाले. परंतु भाईजी म्हणाले, “कल्याण, जें घर पाहाल, तिथं आधीं सांगून ठेवा कीं, “कदाचित् आमची चौकशी करण्याला पोलीस येतील. तुम्हांला तसा त्रास नाहीं. परंतु लगेच उठवा बि-हाड म्हणाल; द्यायची असेल जागा तर द्या,” असं हडसूनखडसून मग ठरवा घर. नाहीं तर रोज सामान न्यायचं, नीट लावायचं आणि पुन्हां उचलायचं, असं किती दिवस करणार ?”

“दादा, वैनीकडे तुला नाहीं का जायचं ?” रंगानें विचारलें.

“आतां आधीं घर जातों पाहायला, चारपांच वाजल्यानंतर संध्येकडे जाईन. हरणी व बाळची आई जाणारच आहेत. भाईजी, भात निराळा करून ठेवा. तूपभात व लोणचं घेऊन जाईन. तुम्ही जरा विश्रांति घ्या. आमच्यासाठीं तुम्हांला ही दगदग.” कल्याण काकुळतीनें म्हणाला.

“कल्याण, पुन्हां असें बोलणार असशील तर मी आजच निघून जातों. माझ्यामुळं तुम्हांला आभार का वाटतात ? कितीदां सांगायचं कीं माझे व तुमचे संबंध केवळ औपचारिक नाहींत.” भाईजींना वाईट वाटून ते बोलले.

“भाईजी, आभार नाहीं हो वाटत. परंतु तुम्ही किती काम करतां, आम्हांला कांहींच का वाटणार नाहीं ? जातों हं आम्ही.” असें म्हणून कल्याण व विश्वास गेले. रंगाहि निघून गेला. भाईजी तें भाषांतर पुरें करीत बसले. त्यांना आतां येथून जावें असें वाटूं लागलें. आपला आणखी यांच्यावर भार कशाला ? त्यांच्याहि जवळचे पैसे संपत आले होते. पुढें या सर्वांचं कसें होईल, कोठें राहतील, काय खातील, भाडें कोठून देतील ? किती तरी विचार त्यांच्या मनांत आले. आपण जावें कोठें तरी, रोज भिक्षा मागावी व मिळेल तें या तरुणांना पाठवावें, असें त्यांच्या मनांत आलें. तें भाषांतर तसेंच ठेवून ते या खोलींत येरझारा करीत राहिले.

तिस-या प्रहरीं कल्याण व विश्वास घरीं आले. दोनतीन तास ते हिंडहिंड हिंडले. अनेक घरें त्यांनीं ठोठावलीं. परंतु यश आलें नाहीं. कंटाळून ते घरीं आले, अंथरुणावर पडले.

“विश्वास, मिळाली का जागा ?” भाईजींनीं विचारलें.

“या पुण्यांत जागा मिळणं शक्य नाहीं.” कल्याण म्हणाला.

“नमस्कार असो या पुण्याला !” विश्वास संतापानें म्हणाला.

“नाहीं का मिळत घर ?”

“नाहीं मिळत. तुमच्या सल्ल्याप्रमाणं वागूं तर कुठंहि घर मिळणार नाहीं. अनेक घरांतून गेलों. भाडं वगैरे सारं ठरे. परंतु “पोलीस वगैरे येतील हो एखादे” असं आम्ही म्हणतांच “तर मग नको” असं म्हणत. काय करायचं ?” विश्वास म्हणाला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel