“देवळाचा गुरव माझ्या चांगल्या परिचयाचा आहे. त्याचा माझ्यावर लोभ आहे. लहानपणीं वडिलांनीं मारलं तर तो धांवत येई व मला सोडवी. त्याच्याकडे नैवेद्य पुष्कळ येतात. आपण त्याच्याकडून भाकरी आणीत जाऊं. प्रश्न मिटेल.”

“माझ्याहि तो ओळखीचा आहे. तालमींत येत असे. बरी आहे योजना. देवाचा नैवेद्या खायचा आपणांला अधिकार आहेच.”

“आपणच देव. दुसरा देव आहे कुठं ?”

“मग जायचं का सायंकाळी प्रभूकडे ?”

“जाऊं.”

सायंकाळ झाली. दोघे मित्र ओंकारेश्वराकडे जायला निघाले. विश्वासच्या घरावरून ते जात होते. आईनें विश्वासला पाहिलें. विश्वासचेहि डोळे तिकडे गेले. विश्वासचीं सावत्र बहीण-भावंडें धांवत आलीं.

“विश्वास, चल ना रे घरांत.” तीं म्हणालीं.

“बाबा कुठं आहेत ?”

“ते बाहेर गेले आहेत. लौकर येणार नाहींत. चल.”

विश्वासच्यानें नाहीं म्हणवेना. कल्याण व तो दोघे घरांत गेले. विश्वासचा चेहरा गोरामोरा झाला होता. तो आईकडे बघे.

बोलवत नव्हतें त्याला.

“विश्वास, किती रे वाळलास ?” आई म्हणाली.

“शरीरानं वाळलों, पण मनानं बळकट झालों आहें.” तो म्हणाला.

“तूं का कल्हईचं काम करतोस ? हरिणी म्हणत होती.”

“हो, आई. मी व कल्याण दोघे मिळून करतों. मजा येते.”

“किती रे कष्ट तुम्हांला !”

“आई, बायकांच्या कष्टांपेक्षा कमीच. शेतक-यांच्या कष्टांपेक्षां कमीच. “कमाव और खाव” हें सूत्र म्हणजे खरं धर्मसूत्र.”

“विश्वास, तुम्ही दोघे इथं जेवतां का ? दुपारची भाकरी आहे.”

“बाबा येतील. आम्ही बांधून नेतों, आई.”

आईनें भाकरी, चटणी, लोणचे बांधून दिलें. दोघांना प्यायला दूध दिले.

“जातों, आई.”

कल्याण व विश्वास निघून गेले. ते ओंकारेश्वराच्या घाटावर बसले. याच घाटावर कल्याणची व विश्वासची प्रथम ओळख झाली होती. तेथें बराच वेळ दोघे बोलत बसले.

“विश्वास, प्रभूला मी बोलावून आणतों. तूं इथं बस.”

“कल्याण गेला. प्रभु तेथेंच एका खोलींत राहात असे.”

“प्रभु आहे का ?” कल्याणनें विचारलें.

“कोण आहे ?”

“मी कल्याण.”

“का रे कल्याण ? अलीकडे तालमींत येत नाहींस तो ? आणि आतां रात्रींचा कुठं आलास ? कांहीं काम का आहे ?”

“काम आहे म्हणून तर आलों आहें.”

“आधीं जेवायला ये.”

“आज लौकरसं जेवण ?”

“आज सोमवार नाहीं का ?”

“खरंच.”

“मग येतोस का जेवायला ?”

“मी एकटाच येऊं ?”

“दुसरं कोण आहे ?”

“एक मित्र तिकडे घाटावर बसला आहे. तो तुम्हांला बोलावीत आहे. तुम्हांला भेटायला तो आला आहे. “कोण मित्र ?”

“विश्वास.”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel