पहिला तुरुंगवास


कल्याण व विश्वास मॅट्रिकच्या परीक्षेला बसले. परीक्षा झाली. महात्मा गांधींचा १९३२ सालांतील दुसरा सत्याग्रह सुरू होता. कल्याण व विश्वास या दोघांनीं त्यांत सामील होण्याचें ठरविलें. विश्वास क-हाडच्या बाजूला गेला. कल्याण ठाणें जिल्ह्यांत गेला. दोघांनीं घरीं कोणाला सांगितलें नाहीं. कल्याणला सत्याग्रहाबद्दल अटक झाली. त्याचा खटला सुरू झाला. खटल्याच्या वेळेला त्यानें तरुणाला साजेसा विक्षिप्तपणा दाखविला.

“तुमचा गांव कोणता ?”

“माझा अमुक एक गांव असा नाहीं. सारं हिंदुस्थान माझं. सात लाख गांवं माझींच गांवं.”

“तुम्ही उनाडटप्पू दिसतां.”

“हिंदुस्थानांत चार कोटि बेकार आहेत. बेकारांना काम द्यायची जबाबदारी सरकारवर आहे. काम पुरवण्याचं कर्तव्य न करतां बेकारांना पुन्हां उनाडटप्पू म्हणून पकडणं या चावटपणाला काय म्हणावं तें मला कळत नाहीं.”

“तुमचं वय काय ?”

“मला काय माहीत ?”

“तुमच्या वडिलांचं नांव काय ?”

“मी सांगणार नाहीं.”

“सांगितलं पाहिजे.”

“गांधीराम असं लिहा.”

“आणि तुमचं नांव ?”

“मला कोणी अण्णा म्हणतात, कोणी भाई म्हणतात, कोणी कल्याण म्हणतात, कोणी कांहीं-”

“तुम्हांला नीट उत्तर द्यायचं आहे कीं नाहीं ?”

“तुम्हांला नीट उत्तर काय म्हणून द्यावं ?”

“गांधीजींचा हा सविनय कायदेभंग आहे. सविनय शब्द ध्यानांत घ्या.”

“महात्माजींचं तत्त्वज्ञान तुमच्या तोंडून ऐकायची माझी इच्छा नाही.”

“तुम्ही तरुण आहांत. हे फंद सोडा. माफी मागा. मी सोडून देतों.”

“मी तरुण आहें म्हणून तर कचेरीवर झेंडा लावायला प्रवृत्त झालों. हा वेडा फंद नाही. मी कर्तव्य केलं. माफी कसली ? सोडून नका देऊं. जास्तींत जास्त शिक्षा द्या.”

कल्याणला एक वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा झाली. तुरुंगांत त्याची रवानगी झाली. तेथें शेंकडों सत्याग्रही होते. त्यांत तो मिसळला. तो आनंदला. लौकरच तेथून दुस-या जेलमध्यें सत्याग्रहींची तुकडी रवाना झाली. तींत कल्याण होता.

कल्याण तुरुंगांत गेला; परंतु विश्वास कोठें होता ? त्याला पकडून त्याच्या घरीं पोंचविण्यांत आलें. जर तुमचा मुलगा असा फाल्तूपणा करील, तर तुम्हांला दंड होईल अशी त्याच्या वडिलांना समज देण्यांत आली. विश्वास घरींच राहिला. तो मॅट्रिकच्या परीक्षेंत पास झाला. कल्याणहि झाला. विश्वासचे वडील प्रसन्न झाले.

“विश्वास, तूं पास झालास. कॉलेजांत नांव घाल. खूप शीक. बी.ए.हो; नाव काढ.” ते त्याला प्रेमानें म्हणाले. विश्वास आतां चैन करूं लागला. त्यानें सुंदर कपडे केले. तो आधींच गोरागोमटा होता. त्यानें केंस ठेवले. तो सुंदर भांग पाडी. तो रोज सिनेमा पाहूं लागला. त्याला दर आठवडयाला वडील दोन रुपये खाजगी खर्चाला देत. विश्वास हॉटेलमध्यें जाई. चहा पिई. विश्वासने आतांपर्यंत कधीं सुख भोगलें नव्हतें, स्वातंत्र्य भोगलें नव्हतें. आतां तो स्वच्छंद वागूं लागला. चैन करूं लागला. त्याला कर्तव्याची का विस्मृती पडली ? ओंकारेश्वराच्या घाटावरच्या कल्याणच्या व त्याच्या चर्चा, त्या का सा-या वाहून गेल्या ? आतां तो दुधें काढीत नसे. दुधें घालीत नसे. तो घरचें काम करीत नसे. तो कॉलेजांतील ऐटबाज विद्यार्थी झाला होता !
सुरुवातीला जेलमध्यें बरींच कामें देण्यांत आलीं. पुढे वातावरण निवळलें. पुस्तकें मिळूं लागलीं. कामाचा छकडा थोडा कमी झाला. रविवारीं सारे एकत्र जमूं लागले. चर्चा करूं लागले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel