१८

भितुरडें पुणें

दुस-या दिवशीं सकाळीं कल्याण दवाखान्यांत जायला निघाला. संध्येला काय न्यायचें ? खायला काय द्यायचें ? कांहीं तरी नेलें तर पाहिजे. तिच्या पोटांत दोन घांस दवडले तर पाहिजेत. काय बरें न्यावें संध्येला करून ?

“भाईजी, थोडा शिरा नेला करून तर ?” त्यानें विचारलें.

“चालेल. दोन पोळया ने व शिरा ने. लिंबाचें लोणचें आहे, तें ने.” भाईजी म्हणाले.

भाईजींनीं कढत कढत पोळया करून दिल्या. त्यांना त्यांनीं बरेंच तूप लावलें. सांजाहि त्यांनीं केला. एका डब्यांत भरून घेऊन कल्याण निघाला.

“कल्याण, संध्येला धीर दे. दोन घांस तरी खा म्हणावं. भाईजींनीं सांगितलं आहे असं सांग.” भाईजी म्हणाले.

कल्याण सायकलवर बसून गेला. रंगाहि दुकानांत गेला. भाईजी एकटेच घरीं होते. त्यांनीं केर काढला. भांडीं जरा स्वच्छ धुतलीं. आणि पुस्तक घेऊन वाचीत बसले. तों बाळची आई आली.

“कुठं गेलीं सारीं ?” तिनें विचारलें.

“कोणी तरी त्यांचे मित्र आले होते. ते सारेच बाहेर गेले आणि कल्याण संध्येकडे गेला आहे.”

“वाईट झालं हो संध्येचं. गुणी पोर; ऐकून माझ्या डोळयांना पाणी आलं. परंतु देवाची सत्ता, तिथं काय चालणार ! भाईजी, हें साजुक तूप आणलं आहे व हे जुन्याचे तांदूळ आणले आहेत. ह्यांचा भात जरा हलका असतो. संध्येसाठीं या तांदुळांचा वेगळा भात करीत जा. कांहीं दिवस संध्येला अगदीं हलका आहार द्यायला हवा. जपावं लागेल. आहांतच तुम्ही. संध्याकाळीं बाळबरोबर मी जाऊन येईन तिच्याकडे.” आई म्हणाली.

“किती तुमचा लोभ या सर्वांवर !” भाईजी म्हणाले.

“बाळचे हे सारे मित्र. आणि बाळ म्हणजे माझा प्राण. तो या अशा चळवळींत पडला. कधीं काय होईल त्याचा नेम नाहीं. मी तरी काय करूं ? बाळ कधीं घरीं आला म्हणजे मला समजावून सांगत असतो. जगासाठीं हीं मुलं धडपडत आहेत. धडपडूं दे. परंतु बाळची प्रकृतीहि बरी नसते. दमा, ताप, कांहीं ना कांहीं सुरू असतं. आजारीपणाची तो कधीं पर्वा करीत नाहीं. ताप अंगांत असूनहि तो तासन् तास चर्चा करीत बसेल, आपलं म्हणणं पटवूं पाहील. ध्येयासाठीं वेडीं झालेलीं मुलं पाहिलीं, म्हणजे आम्हांला स्वत:ची लाज वाटते. आमचं सुखाचं जीवन. आम्ही घरीं नीट खातपीत असतों; आणि ही पोरं हाल काढीत आहेत. बाकी आपण तरी कोण कोणाला किती पुरे पडणार ? शेवटीं देवच सर्वांना आहे. नाहीं का भाईजी ?” आई म्हणाली.

थोडया वेळानें ती माउली गेली. भाईजींनीं शेगडी पेटविली. ते विचारांत मग्न होते. ते मघां मित्र आले ते कोण ? या सर्व लोकांचे कांहीं तरी बेत दिसतात. सरकार यांना बाहेर राहूं देईल का ? आणि माझी काँग्रेस काय करणार ? युध्दासंबंधीं तें धीरोदात्त असें ऐतिहासिक पत्रक काँग्रेसनें काढलें. परंतु पुढें काय ? प्रत्यक्ष चळवळ होईल का ?

भाईजी जणूं समाधींत होते. आणि बाहेर पाऊस आला. ते उठले. बाहेरची अंथरुणें त्यांनीं घरांत आणून ठेवलीं. घरांत कोठें कोठें गळूं लागलें. ती नवीन जागा एरवीं बरी होती. भरपूर उजेड होता. बाहेर पत्र्यांवर उभें राहिलें म्हणजे सुंदर देखावा दिसे. भाईजी घरांतील आवराआवर करीत होते; तों दवाखान्यांतून कल्याण आला. पावसांतून भिजतच आला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel