“वा, छान; म्हणजे फुटणार नाही, फाटणार नाहीं, मळणार नाहीं. तो दुस-या कुणाला मिळणार नाहीं. त्याला फ्रेम करायची जरूर नाही. गंमतीचा फोटो. खरं ना कल्याण ! “
“कशी छान बोलतेस.”
“आजीसुध्दां मला असंच म्हणते. तुम्ही पुण्याला गेलेत म्हणजे परत कधीं याल ?”
“मोठा होईन तेव्हां.”
“कधीं व्हाल मोठे ?”
“तूं मोठी होशील तेव्हां.”
“मी आजच आहें मोठी.”
“कांहींतरीच.”
“मी आतां जाते. कल्याण, पत्र पाठव. लौकर नको हो मोठा होऊंस”
“तूं सुध्दा लौकर नको मोठी होऊं. नाही तर जाशील सासरीं. करतील तुझं लग्न.”
“लग्न ?”
“मोठीस झालीस म्हणजे लग्न नाहीं का करणार ?”
“माझं लग्न नाहींच होणार.”
“वेडी आहेस.”
“तुमचंसुध्दा होईल का लग्न ?”
“माणसं मोठीं झालीं म्हणजे त्यांचीं लग्नं होतात.”
“मग आपण लहानच राहूं.”
“तें का आपल्या हातांत असतं ? वय वाढतं.”
“खरंच.”
“संध्ये, आतां मी जातो. माझ्या पत्राचं उत्तर पाठवशील ना ?”
“पाठवीन. माझं अक्षर छान आहे.”
“कोण म्हणतं ?”
“आमचे काका म्हणतात.”
“संध्ये, तूं सर्वांची आवडती असशील ?”
“आजीची आहे.”
“आणखी कोणाची ?”
“ते नाहीं माहीत.”
“तूं मलाहि आवडतेस.”
“एकदम का कुणी कुणाला आवडतं ?”
“मग मी का खोटं सांगतों ?”
“असं कुठं मीं म्हटलं ?”
“जातो आतां मी. संध्ये, ते बघ आकाशांत रंग.”
“रंग बघत बघत जा. शेवटी रंग जातील व अंधार राहील.”
“अंधारांत लाखो नक्षत्रं दिसतील. अंधारांतच आकाशाची खरी मौज. संध्ये, प्रकाशापेक्षां संध्याकाळ सुंदर व संध्याकाळापेक्षां रात्र
सुंदर.”
“जा आतां. जपून जा; अंधारांतून जपून जा.”
“तूहि जा.”